Connect with us

साहित्य

शिवकालीन ७२ खेड्यांचे जागृत देवस्थान – खारेपाटणची दुर्गा देवी

Published

on

Kharepatan Durga Devi

दुर्गा देवी, खारेपाटण

आपल्या प्राचीन, पवित्र आणि सर्वसमावेशक अशा हिंदुधर्मात जीवनातील प्रत्येक अंगाचे व्यवस्थित आणि परिपूर्ण असे विवेचन केलेले आढळते. मनुष्य जन्मापासून ते केवळ त्याच्या मृत्यूपर्यंतच्या नव्हे तर त्यानंतरच्या अवस्थांचेही अभ्यासपूर्ण विश्लेषण आपल्या धर्म व संस्कृतीत प्राचीन ऋषीमुनींनी व तत्त्ववेत्त्यानी प्रत्यक्ष अनुभव घेऊन लिहून ठेवलेले आहे. या दृष्टीने पहाता आपला हिंदु धर्म हा जागातील सर्व धर्मांत एमेवाद्वितिय व परिपूर्ण आहे, असे म्हणता येईल.

ब्रह्म, विष्णू, महेश हे उत्पत्ती, स्थिती व लय म्हणजेच जन्म, पालनपोषण व मृत्यू यांच्या देवता मानल्या जातात. विश्वात परमेश्वरी तत्व एकाच आहे. परंतु कामाची विभागणी करण्यासाठी त्या परमेश्वरी शक्तीनेच त्या त्या कामानुसार वेगवेगळी रूपे घेतलेली आहेत.

तसे पहाता शिवपासूनच शक्ति ही निर्मिली गेली. या शक्तीच्या आधारानेच मायेचा व्यापार चालतो. अखिल सृष्टीचे व्यवहार सुसंबद्धपणे आणि आखून दिलेल्या नियमानुसार चालविण्याचे कार्य ह्या शिवाच्या शक्तीद्वारेच होत असते. शिव हे अचल आहेत तर शक्ति हि चाल आहे. शिवाच्या इच्छेनुसार शक्ती कार्य करीत असते.

अशा ह्या शक्तीची विविध प्रसंगी विविध रूपे प्रकट होतात. कधी ती सौम्य रुपधारिणी असते. उदा. गौरी, हरततालिका. कात्यायनी इत्यादी विश्वातील सर्वसामान्य कामगिरी पाड पडताना ती मंगल व सौम्य रूप धारण करते.

तर जेव्हा दृष्ट प्रवृत्ती बळावतात; भ्रष्टाचार बोकाळतो, असुर, दैत्य अमानवीशक्ती हैदोस घालून संतसज्जनांचे, संसारी माणसांचे जगणे असह्य करून सोडतात, अराजकता माजवता काम, क्रोध, लोह, मोह, मद, मत्सर यांचा एकंदरित अतिरेक होऊन ईश्वरी तत्वांचा पाडाव करू पहातात तेंव्हा मात्र शिवाची ही शक्तीच महारौद्र रुप धारण करून येते; आणि दृष्टांचा संहार करून सज्जनांचे रक्षण करते.

तेव्हा तिला जगदंबा म्हणतात, दुर्गा, चामुंडा, महाकाली, भद्रकाली, महिषासुरमर्दिनी, भवानी इत्यादी नावाने ती पप्रसिद्ध होते. दुर्गती दूर करते ती दुर्गादेवी असे देवी भागवतात दुर्गा देवीचे वर्णन करण्यात आले आहे.

नवरात्रीचा उत्सव म्हणजे अध्यात्मातून शांतता व समाधान देणारा एक प्रकारचा संजीवनी मंत्रच आहे! या उत्सवाचा महत्व आणणारी देवी वेग वेगळ्याप्रकारे प्रचलित आहे. उमा, गौरी, पार्वती, चंडी, चंडिका, चामुंडा, काली, कृपालिनी, भवानी, तसंच विजया अशा अनेक मानांनी ओळखली जाणारी देवी म्हणजे जगदंबा.

या जगदंबेची शारदीय नवरात्रौत्सवात भक्तिभावाने पूजा केली जाते.  नवरात्रांत महत्व असलेली सडे तीन शक्तीपीठ महाराष्ट्रात आहेत. तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरगडची, रेणुकादेवी आणि सप्तशृंगी वणी देवता हीच ती साडेतीन शक्तीपीठ.

छत्रपती शिवाजी महाराज तर तुळजा भवानीचा आशीर्वाद घेऊनच कोणत्याही मोहिमेवर निघत. सर्व मावळ्यांचा ‘जय भवानी! जय शिवाजी!’ हाच संजीवनी मंत्र होता. कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणजेचज अंबादेवी.

काळ्या पाषाणाची ही मूर्ती चतुर्भुज असून तिच्या हातात मातृलिंग, गदा, खेटके, पाणपत्र या वस्तू आहेत. तिने कोल्हापूर या दैत्याचा वध केला. काशीचा राजा रेणू आणि तिची पत्नी भोगवती यांना संतान नव्हते.

म्हणून राजाने पुत्रकामेष्टी यज्ञ केल्यानंतर पार्वतीने तेंव्हा त्यांच्या पोटी जन्म घेईन असा दृष्टांत दिला. तीच माहूरची रेणुकादेवी. नाशिकपासून ६० कि. मी. अंतरावर सप्तशृंगीचे मंदिर आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी हे अर्धे शक्तीपीठ मानलं जातं

‘दुर्ग’ नावाच्या दैत्याचा नाश केल्यामुळे भगवती देवीला दुर्गा हे नाव मिळालं अशी एक कथा आहे. परंतु मार्कंडेय पुराणात मात्र दुर्गेच्या अवयव निर्मितीची कथा आहे. विविध ज्येष्ठ दैवतांच्या तेजातून दुर्गेचे वेगवेगळे अवयव निर्माण झाले.

शंकराच्या तेजाने मुख यमाच्या तेजाने डोक्यावरचे केस, विष्णूच्या तेजाने भुजा, चंद्राच्या तेजाने स्तन, इंद्राच्या तेजाने कटिप्रदेश, वरुणाचा तेजाने जांघा व पिंढ्या, भूमीच्या तेजाने नितंब भाग, ब्रह्माच्या तेजानं पाय, सूर्याच्या तेजाने पायाची दोट, कुबेराच्या तेजानं नाक, प्रजापतीच्या तेजानं रात, अग्नीच्या तेजानं तीन नेत्र, सांध्यतेजानं भुवया, वायू तेजानं कान, तसंच अन्य अवयवांचे भाग इतर देवतांच्या तेजाने निर्माण झाले.

अशी ही सर्वांग परिपूर्ण दुर्गामाता राष्ट्रशक्ति मानली गेली आहे. ही बाब यथार्थच म्हणावी लागेल. मनोबल, समृद्धी आणि अध्यात्म यांचा इतका सुरेख संगम इतर कोणत्याही देवतेत आढळत नाही. मोहाच्या महिषासुराचा नाश करून ती भक्तांना, संसारी जनाना सन्मार्ग दाखविते.

दुर्गा सप्तशतीमध्ये दुर्गेची तीन रूपं  सांगितली आहेत. महाकाली हे दुर्गेचं तमोगुणी रूपं, महालक्ष्मी हे रजोगुणी रुप तर महासरस्वती हे सत्वगुणी रुप आहे.

अशा या तिन्ही रूपांनी नटलेल्या श्री दुर्गादेवीचे प्राचीन मंदिर भारतात सात ठिकाणी आहेत. केवळ मंदिराचं नव्हे तर ती शक्तीची सात पिठाचं मनाली जातात आणि आठवे शक्तिपीठ जे शासनाच्या आणि पुरातत्व विभागाच्या हेळसांडीमुळे, निष्क्रियतेमुळे आजवर दुर्लक्षित राहिले ते म्हणेज खारेपाटण व आजूबाजूच्या बहात्तर खेड्यांचे जागृत व अतिप्राचीन असे श्री दुर्गादेवीचे देवस्थान होय.

खारेपाटण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्तरेकडील प्रवेशद्वार असलेले विजयदुर्ग खाडीकाठचे गाव. गावात अनेक पुरातन ऐतिहासिक व पांडव कालीन मंदिर आहेत. शिलाहार राजा चौदाव्या शतकाच्या अखेरीस होऊन गेला. तो शंकराचा भक्त होता.

ततयाने ही मंदिरे उभारली. खारेपाटणवर मोघलांचे, डचांचे राज्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजापूर व खारेपाटण यावर स्वारी करून ही महत्वाची बाजारपेठ केंद्र आपल्या ताब्यात घेतली. दुर्गादेवीच्या किल्ल्यात भवानी मातेचं मंदिर बांधलं आणि धार्मिक प्रथा उत्सव सुरु केले.

चौदाव्या शतकात बांधलेल्या ह्या श्री दुर्गा  देवीच्या मंदिरात आजही दसऱ्या दिवशी परंपरागत व जुन्या चालीरीती रिवाजानुसार वार्षिक उत्सव मोठ्या भक्ती भावाने उत्साहात साजरा करण्यात येतो. कालभैरव – दुर्गादेवी उत्सव ट्रस्ट मार्फत केला जातो.

येथील गुरव मंडळी ही देवीची पुजारी आहे. दसऱ्याच्या दिवशी दुर्गा देवीच्या दर्शनासाठी कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई तसेच वलारपट्टी व खालारपट्टीतील अनेक भाविक भक्तगण या नवरात्रौत्सवात येतात. दुर्गादेवी भक्तांच्या हाकेला धावते.

सुवासिनी महिला, माहेरवाशिणी देवीची ओटी भरण्यासाठी येतात. ह्या दिवशी संबंध परिसरात जत्रेचे स्वरूप येते. देवी नवसाला पावते. या दिवशी नवस बोलणे व नवस फेडणे चालू असते. अनेक भाविकांची ही कुलस्वामिनी आहे. आता तर हे सर्वांचेच श्रद्धास्थान झाले आहे.

खारेपाटण हे निसर्गरम्य असून अनेक प्रेक्षणीय स्थळांनी नटलेले आहे. महाराष्ट्र शासनाने पर्यटन स्थळांत खारेपाटणचा समावेश करून बरीच वर्षे लोटली. तरीही शासनाला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांना तसेच पुरातत्व व संशोधन विभागाला खारेपाटाच्या शिलाहार कालीन प्राचीन दुर्गा देवी – कालभैरव इत्यादी ऐतिहासिक मंदिरांच्या अवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ मिळू नये ही दुर्दैवाची बाब होय.

ह्या दुर्दैवाला महाराष्ट्र शासनाची  अनास्था व निष्क्रियता कारणीभूत आहे. पर्यटनविकास क्षेत्र म्हणून जाहीर करायचं, बोलबाला, गाजावाजा करायचा आणि प्रत्येक्षात मात्र भकासपणा दूर करण्यासाठी काही करायचं नाही.

ऐतिहासिक – प्रेक्षणीय वास्तूच्या जतन व संवर्धन यासाठी काही पावलं उचलायचो नाहीत. इतकंच काय तर या ठिकाणी महाराष्ट्र शासन पर्यटन विकास केंद्रांच छोटंसं कार्यालय हे आजतागायत सुरु करण्यात आलेलं नाही.

मग सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री, पर्यटन विकास विभाग पुरातत्व संवर्धन – संशोधन विभाग यांच्या कार्यालयातील संबंधित अधिकारी करतात तरी काय? असा प्रश्न खारेपाटणवासियांना पडला तर नवल नाही.

शासनाने याची दखल घेऊन जतन, संवर्धन सुधारणा याकडे लक्ष दिले तर पर्यटन व्यवसाय वाढवून पर्यटकांद्वारे महसुलाच्या उत्पन्नात वाढ होईल. त्याचप्रमाणे स्थानिक लोकांना रोजगार मिळेल आणि ऐतिहासिक वास्तू जतन केल्या जाऊन महाराष्ट्राची पर्यायाने भारताची शान वाढेल. तरी संबंधितांनी यात लक्ष घालणे अगत्याचे आहे.

७२० कि. मी. लांबीचा किनारा लाभलेल्या निसर्ग समृद्ध कोकणाचा खरा विकास निसर्ग संपत्तीचा, दैवी देणगीचा, ऐतिहासिक शिल्प, किल्ले, अप्रतिम प्राचीन पुरातन मंदिर, वास्तू यांचे जतन, संवर्धन आणि संगोपन केल्यानेच होणार आहे.

या भूमीत विनाशकारी प्रकल्प उदा. अणुऊर्जा, मायनिंग, रासायनिक उत्खनन, निसर्ग तोड, इत्यादींशी संबंधित असलेले उद्योग राबविल्याने होणार नाही उलट विकासाऐवजी सारं निसर्गरम्य कोकण भकास होऊन जाईल याचं भान राजकर्त्यांनी राखायला हवं असं आवर्जून सांगावंसं वाटतं.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *