साहित्यकथा

कथा विघ्नहर्ता गणेश जन्माच्या – भाग 2

(भाग एक वाचण्यासाठी येथे क्लिक करा)इंद्राने मात्र गर्वाने आपली शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला पण त्याचे काही चालले नाही. नंतर इंद्रही शरण आला व त्याने महोत्कटला अंकुश व कल्पवृक्ष देऊन त्याचे नाव विनायक असे ठेवले.

कथा – ३

गृत्समद ऋषींनी श्री गजाननाच्या वक्रतुंड अवताराची कथा सांगितली आहे. हा अवतार श्री गजाननाने घेतला तो दुरासद नावाच्या असुराचा वध करण्यासाठी. भगवान शंकर तसे भोले. कुणाच्याही कडक तपस्येने प्रसन्न होत असत आणि वर देऊन मोकळे होत. पुढे हेच असुर उन्मत्त होत आणि देवांना पळता भुई थोडी करीत. अशा अनेक प्रसंगामध्ये पार्वतीची शक्ती कमी येई. एकदा असे घडले. भस्मासुराचा पुत्र दुरासन याने शुक्राचार्यांचा उपदेश घेऊन खडतर तपश्चर्या केली.

शंकर प्रसन्न झाले व त्यांनी वर मागण्यास सांगितले. तेंव्हा दुरासनाने त्यांची स्तुती केली आणि वर मागितला की, आपणांस अंडज, स्वदेज इत्यादी चार वर्णातील कोणत्याही प्राण्याच्या हातून किंवा देव, दानव, राक्षस इत्यादींच्या हातून मृत्यू येऊ नये. शंकर म्हणाले एका शक्ती वाचून तुला कोणीच मारू शकणार नाही. या वराने दुरासनाची सत्ता आणि ताकद वाढत चालली. तो उन्मत्त झाला.

सामान्य प्रजेवर अत्याचार करू लागला. त्याने पृथ्वी जिंकली. इंद्रलोक, वैकुंठलोक जिंकला. खुद्द शंकरही त्याच्या भीतीने काशी जाऊन बसले. सर्व देव शंकराच्या आश्रयाला आले. दुरासनाने उन्मत्त पणे गर्जना केली. दहावे खंड काशी आता मी जिंकणार आहे. देव घाबरून गेले. त्यांनी ब्रह्मदेवाला विचारले, आता आपण काय करावे म्हणजे या दुरासनाचा विनाश होईल? ब्रह्मदेव म्हणाले, शंकराच्या वराने हा शिरजोर झाला आहे.

आता माता भवानीची व श्री गजाननाची प्रार्थना करणे हाच उपाय शिल्लक आहे. त्याप्रमाणे त्यांनी प्रथम भवानीची व श्री गजाननाची स्तवने करण्यास सुरुवात केली. ह्याचवेळी आकाशवाणी झाली की दुरासनाच्या नाशाची तजवीज होईल.  यानंतर देव भगवती – पार्वतीकडे आले त्यांनी तिला सर्व हकीकत सांगितली. ती म्हणाली हा दैत्य मरावा हीच योजना आहे.

हळू हळू तिच्या आमंत्रणावरून तिच्या अंगी क्रोधाचा संचार झाला. त्याचवेळी तिच्या श्वासोच्छसाबरोबर आणि तिच्या डोळ्यांतून दिव्य शक्तिशाली तेज बाहेर पडू लागले. त्या तेजात देवांना अंतर्ज्ञानाने वस्त्रालंकार, दोन दंत इत्यादींनी विराजमान अशी विनायकाची मूर्ती दिसली.

देवांना अतिशय आनंद झाला. त्यांनी त्याचे नाव वक्रतुंड ठेवले. वक्रतुंड सिंहासन आरूढ झाला. त्याचे व दुरासनाचे भीषण युद्ध झाले. मल्ल युद्धात वक्रतुंडाने त्याचे तोंड फोडले. अग्न्यस्त्र, पर्जन्यास अशा शस्त्रांचा अस्त्रांचा प्रयोग करून शेवटी दुरासनाचे सारे सैन्य वक्रतुंडाने ठार केले.

शेवटी वक्रतुंडाने विराट स्वरूप धारण करून दुरासनची शेंडी धरली. एक पाय काशी नगरीत ठेवून दुसरा राक्षसाच्या डोक्यावर ठेवून म्हटले शंकराच्या वराने तुला मृत्यू येणार नाही, म्हणून तू काशीनगरी समीप पर्वतरूपाने राहा. काशीचे रक्षण कर. दुरासन आनंदाने म्हणाला आपला पाय नेहमीच माझ्या मस्तकी राहू द्या. मी येथून हलणार नाही. ते गजाननाने मान्य केले. तो ढुंढीराज गणेश म्हणून काशीस वास्तव करू लागला.

कथा – ४

माता पार्वतीने सिंध दैत्याचा वध करण्यासाठी कडक तपचश्चर्या केली आणि गजाननाने तिच्या पोटी परत अवतार घेतला. हा सिंधू दैत्य फार माजला होता. सूर्याने त्याला अमृत भोजन दिले होते. ते जो पर्यंत उदरात आहे, तो पर्यंत मरण येणार नाही. असा वर दिला होता.

सगळीकडे सिंधू दैत्याने अनाचार माजविला. सर्व देवांना नजरकैदेत टाकले. देवांनी कैदेत असताना दहा हातांमध्ये दहा आयुधे धारण केलेली आणि सिंहासनावर बसलेली विनायकाची मूर्ती स्थापन केली. तिची पूजा व भक्ती सुरु केली. एक दिवस त्यांचे डोळे दिपवणारे तेज उत्पन्न होऊन त्यातून विनायक प्रकट झाला.

त्याने पार्वतीच्या पोटी जन्म घेऊन सिंधूचा नाश करण्याचे वाचन दिले. नंतर पार्वतीला हे तेज उदरात धारण करता यावे म्हणून शंकराने तिला गणेशाचा एकाक्षर मंत्र दिला. त्या मंत्रासह तिने बारा वर्षे कडक तपश्चर्या केली. म्हणजेच सिंधू दैत्याचा वधासाठी पुत्राला विद्या तर प्राप्त केलीच पण बालक पराक्रमी सुद्धा निपजावायासाठी सर्वतापी प्रयत्न केले.

नंतर गजाननाने तिला दर्शन दिले. तिने त्याला वर मागितला की तू माझा पुत्र हो. श्री गणेश अंतर्धान पावले. पार्वती त्यांचे चिंतन करत राहिली. एकदा भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी तिने गजाननाची मातीची मूर्ती केली व तिचे यथा विधी पूजन केले. इतक्यातच ती मूर्ती सजीव होऊन पार्वतीसमोर उभी राहिली. तो बालक तिला म्हणाला, मीच तो गुणांचा ईश. सिंधू दैत्याच्या वधासाठी हा माझा अवतार आहे.

तिने त्या बालकाला जवळ घेतले. शिवशंकरानी त्याचे नाव गणेश ठेवले. हे कळल्यावर सिंधू दैत्याने गणेशाला मारण्यास गृधदैत्य, क्षेम, क्रूर, बालासूर इत्यादी अनेक दैत्य पाठविले. त्या सर्वांचा त्याने नाश केला व शेवटी सिंधूचा वध करून देवांना दिलेलं वाचन पूर्ण केले.

श्री गजानन गजमुखाने कसे जन्मले याच्या दोन गंमतीदार पुराणकथा आहेत. गजाननाचे रुप हे ओंकार स्वरूप दिसते. हे गजाननाचे ब्रह्म स्वरूप आणि त्याची तत्वचर्चा बाजूला ठेऊन या आदिबंधात्मक कथा ऐंकण्याने खरोखर मनोरंजन होते आणि प्रत्यक्षपाणे तत्वबोध होतो.

कथा – ५

तर या पूर्ण कथांपैकी सुप्रभेदागमातील एक कथा असं सांगते की, सोमेश्वर लिंगाचे अर्चन करून मोठाले पापी स्वर्गात जाऊ लागले. देवांनी शंकराकडे तक्रार केली. त्याने देवांना पार्वतीकडे पाठविले. तिला त्यांची दया आली. तिने विघेणेश्वर दृष्टी निर्माण करायचे ठरविले.

तिने आपल्या अंगाला उटणी चोळून त्याचे पुन्हा गोळे केले आणि ती अंगसागरावर गेली. तिथे मालिनी नावाच्या गजमुखी राक्षसीने ते गोळे खाल्ले, तिला गर्भ राहिला आणि पाच सोंडांचा पुत्र झाला. शंकर पार्वतीने पाच सोंडांची एक सोंड केली व सोमेश्वराचे अर्चन करणाऱ्या पाताक्यांच्या अर्चनात विघ्न आणण्याचे काम दिले. शिव पार्वतीने त्याला आपला पुत्र मानून त्यानुसार शक्ती दिली.

जन्म होताच या विघ्नेश्वराने शंकराला नमन करून नृत्य करण्यास प्रारंभ केला. दुष्ट कार्यसिद्दीसाठी अर्चन करणाऱ्या लोकांच्या कामात त्याने विघ्ने आणली आणि विघ्नहर्ता श्री गजाननाने या अवतारात विघ्नकर्त्याची भूमिका बजावली.

कथा – ६

हीच कथा वराहपुराणात थोड्या वेगळ्या प्रकाराने येते. या कथेनुसार सोमेश्वर लिंगाने अर्चन करून पापी स्वर्गात येऊ लागले. देवांनी हे संकट दूर करण्यासाठी शंकराची प्रार्थना केली. ते ऐकून शंकरानी ध्यान करण्यास सुरुवात केली. त्यांच्या मस्तकातून एक तेजस्वी ज्योत निघाली.

त्यातून शिवसारखाच देदिप्यमान सुंदर पुत्र निर्माण झाला. आपल्याशिवाय एकट्या शंकराने हा पुत्र निर्माण केला म्हणून पार्वतीला राग आला. तिने त्या पुत्राला शाप दिला तू गजमुख होशील व बाकीचे शरीर बेढब होईल. शंकराने पार्वतीचा शाप मान्य केला. पण आपल्या पुत्राला वर दिला की तुला गजमुख, गणेश, विनायक अशी नवे प्राप्त होतील आणि सर्व कार्यांमध्ये तुला प्रथम पूजेचा मान मिळेल.

आपल्या शिवाय पुत्र जन्म पार्वती सहन करू शकली नाही या गोष्टीची गंमत वाटते. शिवशंकरानी तीचा राग समजून घेतला. पण आपल्या पुत्राला योग्य कार्यासाठी उचित शक्ती दिली असे ही कथा सांगते.

कथा – ७

गजानन जन्माची आणखी एक कथा असे सांगते. सिंदूर दैत्य फार मताला त्याने ब्रह्मदेव, विष्णू, शंकर यांना आपल्या पराक्रमाने घाबरे केले. पृथ्वीवर अधर्म मजला. प्रजा अन्यायाखाली भरडली जाऊ लागली. तेंव्हा देवगुरु बृहस्पतीच्या सूचनेवरून सर्वानी गजानन स्तुती केली. ती प्रार्थना ऐकून तेजस्वी रूपात श्री गजानन प्रकट झाला. त्याने देवांना आश्वासन दिले की, मी गजानन रूपात पार्वतीच्या उदरी जन्म घेऊन सिंदुराचा नाश करिन. लवकरच पार्वती गर्भवती झाली.

तिला सुंदर अरण्यात राहण्याचे डोहाळे लागले. शंकराने तिच्यासह सुंदर निसर्गरम्य वनात मुक्काम केला. पथावकाश पार्वती प्रसूत झाली व शुंडे सारखे नाक, चार हात व मस्तकी चंद्र असलेले बालक जन्मले. शंकरासह सर्व देवांना आनंद झाला. हा प्रत्यक्ष परमात्मा आपल्या उदरी जन्माला आहे. हा मूषकावर आरूढ होऊन सिंदुराचा वध करील.

कथा – ८

हीच कथा आणखी थोड्या वेगळ्या वळणाने सांगतात की, आपला वध करणारा पार्वतीच्या उदरी वाढतो हे काळातच सिंदुराने पार्वतीच्या उदात शिरून गर्भाचे मस्तक चाटले व ते नर्मदेत टाकले, त्यामुळे नर्मदेचे पाणी आणि तिच्यातले गोटे लाल झाले.

पार्वती प्रसूत होताच मस्तकाशिवाय बालक बघून तिने एकच आकांत मांडला. तेंव्हा आपल्या उन्मत्त झालेल्या ऐरावताचे मस्तक कापून श्री विष्णूने ते बालकाच्या धडास जोडले. म्हणून तो गजवदन झाला. या गजाननाने अतुलनीय पराक्रम गाजवून सिंदुराला ठार मारले. गणेश जन्माच्या अशा अनेक आख्यायिका आहेत. त्यातल्या चमत्कारांचा भाग वगळला तर लक्षात येते की, शंकर पार्वतीच्या पोटी जन्मलेल्या श्री गणेशाला शंकर पार्वतीने उत्तम संस्कार, विद्या, शस्त्रास्त्रे इत्यादी देऊन शूरवीर विवेकशील केले.

त्रिखंडाला त्राही भगवान करून सोडणाऱ्या अनेक असुरांचा त्याने नाश केला. जप तप विद्यार्जन पूजा, सदाचरण यासाठी लोकांना त्यांचे आयुष्य निर्विघ्न करून दिले. म्हणूनच त्याला प्रथमेशचे स्थान मिळाले. या प्रथमेशच्या चरणी मनोभावे माथा टेकून जगाच्या कल्याणाची प्रार्थना करूया.

Tags
Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close