ब्लॉगलाईफ स्टाईल

कोकणातल्या शेतकऱ्यांची सक्सेस स्टोरी

आता आंबा बंगायतदार फक्त वाशी मार्केट वर अवलंबून नाहीत

22 मार्च रोजी पहिलं लॉकडाऊन सुरू झालं. आणि कोकणातल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. आंब्याचं सर्वात मोठं मार्केट वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये आंबा पोहोचवणं कठीण झालं. तळकोकणातला शेतकरी हवालदिल झाला. आंब्याचा हंगाम नुकताच सुरू झाला होता. अनेकांच्या पहिल्या तोडीला सुरूवात झाली होती.

अनेक शेतकऱ्यांनी खाजगी विक्री कशी करता येईल याची चाचपणी करायला सुरूवात केली. तेव्हा आंब्याचा भाव प्रचंड पडला. किमान खर्च तरी निघावा अशा अपेक्षा व्यक्त होऊ लागल्या. 800 रूपयापर्यंत पाच डझनाच्या पेटीची विक्री सुरू झाली.

अनेक शेतकऱ्यांनी, वेट अँड वॉचची भूमिका घेतली. कोकणातल्या माणसांमध्ये तसेही पेशंस भरपूर. घाई कधीच नाही. ” जा काय करूचा ता आरामात “.. मागच्या तीस वर्षांत जे घडलं नव्हतं ते यावर्षी घडणार,आंबा बागायतदारांचं प्रचंड नुकसान होणार, असच सगळ्यांना वाटत होतं. पण शेतीमालाच्या वाहतुकीला शासनानं परवानगी दिली, आणि निराशेचं,चिंतेचं वातावरण बदलून गेलं.

शेतकऱ्यांनी मोठ्या शहरात थेट आंबा विक्री करायला सुरूवात केली. मुंबई पुण्यातल्या, अनेक नातेवाईकांनी, मित्रांनी, शेतकऱ्याला आंबा विक्रीच्या मदतीसाठी विचारणा केली. अनेकांनी ते रहात असलेल्या भागात, त्यांच्या गृहसंकुलांमध्ये आंब्याची जाहिरात केली. कोकणातल्या बागायतदारांची चिंता, शहरातल्या अनेक सुहृदांनी वाटून घेतली. आंब्याची थेट विक्री हळूहळू वाढू लागली.

माझ्यासोबत अनेक शेतकऱ्यांना, शहरातून फोन आले, यावर्षी आंब्याचं काय होणार?
आंबा विकला जाईल का? त्यांनी अनेक प्रश्न विचारले. दरवर्षी ज्यांना आंबा देत होतो. त्यांना आंबा मिळेल का? हा प्रश्न होताच. यापेक्षाही आंबा विक्री झाली पाहिजे, आंबा फुकट जाऊ नये, कमीतकमी ऩुकसान व्हावं याची कळकळ, अनेकांच्या बोलण्यातून जाणवत होती.

अनेक आंबाप्रेमी होते ज्यांनी, मदतीचा हात पुढे केला आणि मग या सर्वांच्या मदतीने, थेट आंबाविक्रीचा धडाका सुरू झाला. कोकणातल्या शेतकऱ्यांनी कधी रस्त्यावर उतरून आंदोलनं नाही केली, किंवा शेतमाल रस्त्यावर फेकून नाही दिला.

महाराष्ट्रात आहे की नाही, माहीत नाही. पण अख्खा चांगला आंबा थोडातरी खाल्ल्याशिवाय टाकायचा नसतो ,असं ‘शास्त्र’ आहे कोकणात. ज्यामुळे आपलं पोट भरतं, ते रस्त्यावर फेकून देण्याचा विचार बागायतदारांना कधी केला नव्हता आणि यापुढेही नाही करणार.

जे काही मिळेल त्यात समाधानी रहायचं ही कोकणी वृत्ती,संकटाच्या – अडचणीच्या काळात कोकणातल्या जनतेला सुखी ठेवते. त्यासाठी आंदोलनं नको किंवा किंवा कोणत्याही प्रकारचं आततायी कृत्य नको. पण पिढ्यानपिढ्यांचा चिवटपणा वापरत, आपणच आपला मार्ग शोधायचा, पर्याय शोधायचा .आणि असे पर्याय यावर्षी शोधले गेले.

शेतीचं नुकसान होतंय, अशा बातम्या सगळीकडून ते असताना. कोकणातून हे असं काहीच ऐकू येत नव्हतं. कोकणात महत्वाची जेमतेम दोनच नगदी पिकं, एक आंबा आणि दुसरा काजू. त्यातही आंबा नाशवंत. झाडावरून उतरवल्यापासून पाच ते सहा दिवसात त्याची विक्री झालीच पाहिजे.
वर्षातून दोन महिन्याचा हंगाम,यासाठी वर्षभर मेहनत करायची, आणि या दोन ते अडीच महिन्यात कमाई करायची.

असं असताना कोरोनाच्या या अडचणीच्या काळात ,कोकणातल्या शेतकऱ्यासमोर मोठं दिव्य होतं. कारण प्रशासनाची किंवा पुढाऱ्यांची मदत होणार नव्हती. या दोन्ही घटकांनी मदतीचे प्रयत्न नक्की केले. पण तो खारीचा वाटा होता.

कोकणात सहकार चळवळ रुजली नाही. एका अर्थाने हे चांगलंच आहे. आमच्याकडे कोकणात सम्राट, प्रणेते, महर्षी, शिल्पकार,प्रेरणास्थान नाहीत, हे चांगलंच आहे. पण गरज असेल तेव्हा चळवळ कशी उभी करायची, कशी पुढे न्यायची, हे अशा महनीयांशिवाय कोकणातल्या शेतकऱ्याने साध्य केलं.

“दिल्यान तर गावच्या देवान, नायतर आवशीच्या घोवान” या सिद्धांतावर कोकणातल्या माणसांचा जबरदस्त विश्वास. त्यामुळे गुरं हाकणारा कुणी नसला तरी चालतो. आमची गुरं आम्हीच हाकतो. असो.

त्याच्यामुळे स्वातंत्र्या मिळाल्यापासून कोकणातल्या नेत्यांनी ,पुढाऱ्यांनी कोकणाचा किती विचार केला हा अभ्यासाचा विषय आहे. याला अपवाद दोन, माजी खासदार कै.मधु दंडवते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे बाकी सगळे, (यात खूप मोठमोठी नावं आहेत, ज्यांचं मूळ आणि कूळ कोकणातलं ) एकतर राज्याचं, देशाचं, धर्माचं भलं कसं होणार या चिंतेत होते, ऩाहीतर आपलं भलं कसं होणार या चिंतेत होते. कोकणाचं कसं होणार याची चिंता कुणालाच नव्हती, असो…

तर मुद्दा आंब्याचा होता… आंब्याचं सगळ्यात मोठं मार्केट, म्हणजे वाशीतील एपीएमसी मार्केट… तिथल्या आडत्यांवर ( कोकणात, या आडत्यांसाठी, दलाल हा शब्द आहे. तो नको वापरायला) बहुतांश शेतकरी अवलंबून.

वाशीतूनच हापूस आंबा संपूर्ण भारतात आणि परदेशातही पाठवला जातो. लॉकडाऊनमुळे या आडत्यांसाठी आंबा एक्स्पोर्ट करणं ,ऱाज्यात-परराज्यात विकणं कठीण होतं. त्यांनीही पूर्ण क्षमतेने आंबा विकण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही जिल्ह्यातला काही मेट्रीक टन आंबा विकणं त्यांनाही शक्य झालं नाही. आणि कोरोनाचे रूग्ण वाशी मार्केटमध्ये आढळल्यानंतर, तेही पूर्ण बंद झालं.

मग पुन्हा एकदा या थेट विक्रीची व्याप्ती वाढली. मुंबई – पुण्यात विकला जाणारा आंबा, नाशिक, औरंगाबाद, ऩागपूरपर्यंत विकला जाऊ लागला. यादरम्यान कोकणातल्या आंबा वाहतूक करणाऱ्या अनेक ड्रा़यव्हर्सना क्वारंटीन केलं गेलं, जे गरजेचंही होतं. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न उभा राहिला.

यावर मार्ग काढत ,कोल्हापूर,पुणे ,मुंबई इथून गाड्या आणि ड्रायव्हर्स येऊन वाहतूक करू लागले.
हे सगळं बागायतदारांनी केलं , ते वैयक्तिक नेटवर्कच्या माध्यमातून. जी जी अडचण आली, त्या प्रत्येक अडचणीतून मार्ग काढला. यासाठी कोकणातल्या शेतकऱ्यांची पाठ कुणीतरी थोपटायला हवी.

सगळी माध्यमं सध्या प्रचंड व्यग्र आहेत. दोन जिल्ह्यातले शेतकरी, बागायतदार काय करतायत ते फार महत्वाचं नाहीये. असो.. वाईटातून चांगलं घडतं असं म्हणतात, तसं यावर्षी घडलं.

कोकणातल्या शेतकऱ्यांचं आंबा विक्रीचं एक नेटवर्क ऩिर्माण झालं. थेट आंबा विकू शकतो, हा आत्मविश्वास अनेक बागायतदारांमध्ये निर्माण झाला. वाशी मार्केटवरचं अवलंबित्व कमी झालं, थेट विक्री करायची असेल तर, आंबा दर्जेदार हवा याची जाणीव झाली. थेट ग्राहकांशी जोडल्यामुळे, काय चुकतंय हेही कळलं.

या सगळ्याचा अनुभव , पुढच्या काळात,पुढच्या अनेक हंगामासाठी फायदेशीर ठरणार हे निश्चित.
आत्मनिर्भरतेची सुरूवात,त्याची घोषणा व्हायच्या आधीपासूनच कोकणातल्या बागायतदारांनी केली.

अंतु बर्वा , कालही करेक्ट होता ,आजही आहे…
(थोडं अनुनासिक…)

” अरे ,तें शिकवायला येतोच कोण कोकणात , इथे सगळेच ‘आत्मनिर्भर’ …

श्रीजीत मराठे

Tags
Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close