Connect with us

साहित्य

कथा विघ्नहर्ता गणेश जन्माच्या – भाग १

Published

on

Ganesh Born Stories 1

कथा विघ्नहर्ता गणेश जन्माच्या – भाग १

विघ्नहर्ता श्री गजाननाला वंदन करतांना ह्याच प्रसन्न आनंददायक रुप नेहमी आपल्या नजरे समोर येत. खरा तर श्री गजानन हा सार्वजगाचा मूलाधार आहे. योगी मुनी ऋषी त्याला निर्गुण निराकार ब्रह्मस्वरूप मानतात. आधी हे परमेश्वराचे चैतन्य अव्यक्त होते. सृष्टीच्या निर्मितीनंतर ते चैतन्य कांही प्रमाणात व्यक्त झाले. त्यानंतर सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय हे चक्र अव्याहत चालू झाले. प्रलयाच्यावेळी सूक्ष्म रूपाने हा गजानन वडाच्या पानावर निवास करून राहतो. पुन्हा एकदा मग सृष्टीची निर्माती करतो असे आपली पुराणे सांगतात.

एकदा श्री गजानाने प्रलयानंतर ब्रह्मा, विष्णू, महेश आदी देवतांचे निर्मिती केली. या देवतांच्या मनात प्रश्न आला आपले काय कार्य आहे? आपण नेमके काय करायचे आहे. हा प्रश्न आपल्या निर्मात्या परमेश्वराला विचारावा म्हणून त्यांनी सर्वत्र शोध केला. त्यांना त्यांचा निर्माता काही केल्या भेटेना. शेवटी त्यांनी उग्र तपश्चर्या केली. त्यानंतर श्री गजाननाने दर्शन दिले. त्याचे दिव्य स्वरूप पाहून सर्वजण भरून गेले.

त्याची नखे कमळून आरक्त होती. अंगाची कांती रक्तवर्णी होती. ती सायंकालीन सूर्याप्रमाणे सुंदर तेजस्वी होती. त्याच्या चार हातात खडग, खेड, धनुष्य व  शक्ती अशी शस्त्रे होती. नाक हत्तीच्या सोंडेप्रमाणे सुंदर असून त्याच्या तेजस्वी प्रसन्न कांतीमुळे पौर्णिमेच्या चंद्राला लाज वाटू लागली. त्याचा एक दंत बाहेर आला असून मुकुट सूर्याहून तेजस्वी व वस्त्रे तारकांहून दीप्तिमान होती.

गजाननाने ब्रह्म देवाला वर दिला की केवळ माझा स्मरणाने तुझी विघ्ने नाहीशी होतील. तू निर्भय पाने सृष्टीची निर्मिती कर. देवाधिदेव श्री गजाननाने वेगवेगळ्या वेळी असुरांचा विनाश करण्यास, संकटांचा त्याग करण्यास, भक्तांचा उद्धार करण्यास जन्म घेतला. त्याच्या पार्थिव जन्माच्या अनेक कथा विविध पुराणांमधून आढळतात.

कथा – १

पार्वतीच्या दोघी संख्या जया व विजया एकदा तिला म्हणाल्या सखे पार्वती, इथे सर्व सेवक हे रुद्र गण आहेत. नंदी, भृंगी इत्यादी सर्व गण शिवाची आज्ञा मानण्यातच तत्पर आहेत. देवी तुझा स्वतःचा असा गण कुणीच नाही, तेंव्हा अशा एका पार्वती नंदनाची निर्मिती व्हायला हवी.

पार्वतीही विचार करू लागली, खरंच! शुभलक्षणी, आपलीच आज्ञा मानणारा, कार्यकुशल असा आपला एखादा गण असावा, असे तिच्या मानाने घेतले. तिने आपल्या अंगाच्या उटण्यापासून एक तेजस्वी कांतीमान, बालक निर्माण केला, तो पराक्रमी होता. पार्वतीने त्याला उत्तम वस्त्र अलंकार दिले. हातात एक दंड दिला. त्याचे रूप पाहून वत्सलभावाने तिचे मन भरून आले. तिने त्याला म्हटले तू माझा पुत्र आहेस. त्याने विचारले माते, तुझी काय आज्ञा आहे? पार्वती म्हणाली आजपासून तू माझा द्वारपाल हो. माझा आज्ञेशिवाय कुणालाही आत सोडायचे नाही.

दंडधारी गणेश पार्वतीच्या द्वारावर रक्षक म्हणून काम पाहू लागला. एकदा माता पार्वती तिच्या सख्यांसह स्नान करीत असता. नेमके त्याचवेळी शिवशंकर तेथे आले. गणेश आपल्या मातेशिवाय कुणास ओळखत नव्हता. त्याने म्हटले भगवन माझ्या मातेच्या आज्ञेशिवाय आपण आत जाऊ शकणार नाही. शंकरांना त्याचा राग आला. ते म्हणाले मी येथला गृहपती शंकर आहे. मला कोणी अडवू शकत नाही.

शंकराचे अन्य गणही  त्याला धमकावू लागले. पण गिरिजानंदन गणेश निर्भयपणे तिथेच उभा राहिला. शेवटी शंकरांनी त्याच्याशी युद्ध सुरु केले. बराच वेळ गणेशाने त्यांचा सामना केला. शेवटी शंकरांनी त्रिशुलाने त्याचे मस्तक उडवले. हे समजताच पार्वतीच्या दुःखाला सीमाच राहिली नाही. तिने आपल्या शक्तीने सर्वत्र प्रलय माजविला. शेवटी सारे देव, ऋषीगण तिला शरण गेले.

ती म्हणाली, ऋषींनो माझा पुत्र जिवंत व्हायला हवा. सर्वानी त्याला पूजनीय मानले पाहिजे व सर्वाध्यक्ष पद दिले पाहिजे. तरच तिन्ही लोकी शांतता होईल. सर्वानी जाऊन पार्वतीच्या अटी शंकरांना सांगितल्या. शिवशंकर म्हणाले ठीक आहे. तुम्ही उत्तर दिशेला जा. जो जीव प्रथम भेटेल त्याच शीर कापून त्या बालकाच्या मस्तकाच्या ठिकाणी बसावा. ह्या प्रमाणे देवांनी केले.

त्यांना प्रथम एकदंत हत्ती दिसला. त्याचे शीर बालकाच्या मस्तकाच्या ठिकाणी लावले व मंत्रबलाने आणि शिवशंकराच्या इच्छेने पार्वतीनंदन जिवंत झाला. सर्वांनी त्याला आशीर्वाद व वस्त्रालंकार दिले. शिवशंकर म्हणाले. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू तेजस्वी आणि पराक्रमी आहेस. विघ्ननाशाच्या कार्यात तूच पुढे राहशील. माझ्या गणांचा अध्यक्ष होशील व प्रथम पूजेचा मान तुला मिळेल. गणेश जन्माची ही कथा आपल्या सर्वांनाच प्रेरणादायी आहे.

कथा – २

श्री गणेशाची महोत्कट अवताराची कथा याहून वेगळी आहे. महोत्कटलाच पुढे विनायक असे म्हणू लागले. महर्षी कश्यप हे ब्रम्हदेवाचे मानस पुत्र. त्यांची पत्नी अदिती ही थोर श्रेष्ठ बुद्धिमान स्त्री होती. इंद्रादी देव हे तिचे पुत्र, पण तिची इच्छा होती परमात्मा, सर्वेश्वर सचिदानंदाने आपल्या पोटी जन्म घ्यावा. म्हणून कश्यपने तिला ओम गजाननाय नमः हा मंत्र दिला तो घेऊन ती बनात गेली आणि तिने अनेक वर्षे मंत्रजप करीत खडतर उग्र अशी तपस्या केली.

गजानन त्या तपस्येने प्रसन्न झाला आणि तिच्या पुढे प्रकट झाला. त्याची अंगकांती सहस्त्र सूर्यासारखी तेजस्वी होती. ते तेजस्वी दिव्य रूप बघून अदिती घाबरली. थर थर कापू लागली. गजानन तिला म्हणाला, देवी अदिती तू अहोरात्र ज्याच्या प्राप्तीसाठी ध्यान करीत होतीस तो मी गजानन आहे. इच्छित वर मग. अदितीने त्याला मनःपूर्वक वंदन केले व म्हटले, हे देवाधिदेवा कृपा करून सौम्य रुप धारण करून मला वर द्यावा. तुम्ही माझा पोटी जन्म घ्यावा अशी माझी फार इच्छा आहे, ती पूर्ण करावी.

आपण पुत्र रुपी माझा पोटी जन्म घेतला म्हणजे माझा हातून तुमची सेवा घडेल. साधूंचे पालन व दुष्टांचा नाश होईल. तथास्तु म्हणून श्री गणेश अदृष्य झाले. त्याच सुमारास दुष्टांच्या भाराने पृथ्वी त्रासून गेली होती. सज्जन माणसे भयभीत होती. इंद्र आणि इतर देव दुःखी झाले होते. यावर उपाय काय? असे सर्वांनी ब्रम्हदेवाला विचारले, तेव्हा ते म्हणाले, आपण सर्व परब्रम्हरूपी गणपतीला शरण जाऊया.

तो साकार होईल तेंव्हा त्याच्या हातातूनच दैत्य दानवांचा वध होईल. ब्रह्मदेवाच्या म्हणण्यानुसार सर्वांनी त्या गजाननाची भक्ती सुरु केली. तेंव्हा आकाशवाणी झाली की, देव हो भिऊ नका. श्री गजानन काश्यपच्या घरी जन्म घेत आहे. तो दृष्टांचा विनाश करेल.

काही काळाने अदिती गर्भवती झाली. नऊ महिने पूर्ण झाल्यावर प्रसूत झाली. पुत्राचे तेजस्वी रुप पाहून त्याच्या माता – पित्याचे डोळेच दिपले. गजाननाने त्यांना आपल्या आगमनची कल्पना दिली. नंतर आपले दिव्य स्वरूप गुप्त करून तो मानवी बालकाच्या रूपात आला. आपला हा पराक्रमी पुत्र प्रत्येक्ष सर्वेक्षर असून तो अनेक दृष्टांचा वध करेल याची अदितीला कल्पना होती. कश्यपने त्याचे नाव महोत्कट असे ठेवले. अनेक ऋषीमुनी आले त्यांनी या बालकाची स्तुतिस्तोत्रे गाईली व त्याचे रक्षण करण्यास कश्यपास बजावले.

एकदा महोत्कट पाळण्यात निजलेला होता. कश्यप स्नानाला गेले होते व अदिती होम भावनांची तयारी करीत होती. इतक्यात वीरजा नावाची राक्षसी तिथे आली आणि तिने त्या बालकाला खाऊन टाकले. पण पोटात दुखू लागल्याने ती गडाबडा लोळू लागली.

गजानन तिचे पोट फाडून बाहेर आला व तिच्या छातीवर बसला वीरजा राक्षसी निष्प्राण झाली. त्यानंतर उद्धत व धुरंधर असे दोन राक्षस पोपटांची रूपे धरून आले. त्यांचाही बालकाने वध केला. ऋषींच्या शापाने पाण्यात मगर होऊन राहणाऱ्या चित्ररथाने महोत्कटचा पाय धरला.

त्याने सहजपणे तो मगर उचलून बाहेर भिरकावला. मगर मृत झाला आणि चित्ररथाला आपले मूळ स्वरूप मिळाले. पुढे महोत्कटाचे मौजीबंधन झाले. तेंव्हा गुप्त रूपाने आलेल्या विधात, पिंगाक्ष, विशाल, चपळ इत्यादी राक्षसांना मंत्रविलेले तांदूळ फेकून मारले व त्यांचा नाश केला. ऋषी व देवांनी त्याचे स्तवन करून त्याला अनेक नावे दिली आणि सदा फुलणारे कमळ, कुबेरमाला, पाश, त्रिशूल, परशू इत्यादी गोष्टी अर्पण केल्या.

(भाग दोन वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *