सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील प्रसिद्ध आणि प्राचीन देवस्थाने
आपल्या मागील आर्टिकल मध्ये आपण सिंधुदुर्गातील प्रसिद्ध असलेल्या आणि दक्षिणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आई भराडीच्या आंगणेवाडी आणि तिथल्या जत्रेचा आढावा घेतला. तसेच आज देखील मी आपणासाठी सिंधुदुर्गातील शिवकालीन वारसा लाभलेल्या मालवण तालुक्यातील काही प्रसिद्ध आणि प्राचीन देवस्थानांची माहिती घेऊन आलोय.
१. जय गणेश मंदिर – मेढा, ता. मालवण

मालवण शहरातील मेढा भागातील कालनिर्णयकार जयवंत साळगांवकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या जय गणेश मंदिराची किर्ती सर्व दूर पसरली असून हे स्थळ एक धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येत आहे. या मंदिरातील रिद्धी सिद्धी गणेशासहित असणारी गणेशाची सोन्याची लोभस मूर्ती पाहून मन प्रसन्न होते.
ज्योर्तिभास्कर जयवंत साळगांवकर हे जसे गणपतीचे निस्सिम भक्त आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या मातोश्री पण गणेश भक्तच आहेत. आपल्या मातोश्रींच्या इच्छेनुसार जयवंत साळगांवकर यांनी आपल्या राहत्या जागेत सुंदर अशा गणेश मंदिराची उभारणी केली. दरवर्षी माघी गणेश जयंती दिवशी या मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. या मंदिरामुळे मालवणच्या पर्यटनात भर पडली असून अनेकांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे.

मालवण शहर परिसरात भरड भागातील दत्त मंदिर, जरीमरी, सातेरी, नारायण मंदिर, सोमवारपेठेतील मारुती मंदिर, बाजारपेठेतील गायमुख येथील गणेश मंदिर, मेढा भागातील चर्च, त्याचप्रमाणे रांगोळी महाराज मठ, धुरीवाडा येथील स्वामी समर्थ मंदिर, भरड येथील गजानन मंदिर ही मंदिरे पाहण्याजोगी आहेत.
२. शिवकालीन मोरयाचा धोंडा

शिवछत्रपतींच्या कल्पकतेने मालवण अरबी समुद्राच्या कुरटे बेटावर मराठी शौर्याची गाथा सांगणाऱ्या महाराष्ट्राचे वैभव सिंधुदुर्गाची शान असलेल्या किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीच्या वेळेस मुघलांच्या भीतीमुळे कुणीही ब्राम्हण भूमिपूजनास कुरटे बेटावर येण्यास तयार होईनात, म्हणून दांडी – वायरी भागात एका मोठ्या खडकावर शिवाजी महाराज्यांनी शिवलिंग, गणपती, नंदी, चंद्र, सूर्य या प्रतिमा पाथरवटाकाडून कोरून घेतल्या त्याचवेळी जाणभाट अभ्यंकर नावाचे ब्राम्हण भूमिपूजनासाठी पुढे आले.
इ. स. २५ नोव्हेंबर १६६४ या दिवशी किल्ल्याचा भूमिपूजन सोहळा वायरी येथे संपन्न झाला. हेच खडक मोरयाचा धोंडा या नावाने प्रसिद्ध झाले. या घटनेला आज ३५० वर्षांहून अधिक काळ लोटला. अलीकडेच कोकण विकास प्रतिष्टान व कोकाण पर्यटन महासंघाच्या वतीने या घटनांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यावेळी मालवण समुद्र किनाऱ्यावर शिवशाही अवतरलेली पाहून पाहणारे धन्य धान्य झाले.
३. शिवप्रभूंची शिवलंका आणि शिवराजेश्वर मंदिर

इ. स. १६६४ हा काळ तास राजकीय उलथापालथीचा काळ होता. दिल्लीच्या औरंगजेब बादशाहने देशात उच्छाद मांडला होता. गोव्यात राज्य करणारे पोर्तुगीज आणि व्यापाराच्या निमित्ताने देशात आलेले इंग्रज यांना या महाराष्ट्र देशी मराठ्यांचे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची धडपड पाहावत नव्हती. हे तीनही शत्रू एकत्रितपणे महाराष्ट्रातील लोकांना त्रास देत होते.
जमिनीवरच्या शत्रूचा जसा आपल्या राज्याला धोका आहे तास जलमार्गाने येणाऱ्या शत्रूचाही धोका आहे हे ओळखून शिवाजी महाराजांनी कुरटे बेटावर एक जलदुर्ग बांधण्याचे निश्चित केले. त्यानुसार २५ नोव्हेंबर १६६४ या दिवशी किल्ल्याचा भूमिपूजन समारंभ मोरयाचा धोंडा येथे पार पडला.
या किल्ल्याचे बांधकाम ३ वर्षे चालले. या किल्ल्याच्या बांधणीसाठी तब्बल १ कोटी रु. खर्च आला. ४८ एकर क्षेत्रात पसरलेल्या या किल्ल्यात जो तट बांधण्यात आला आहे. त्या तटाची उंची २० – २२ फूट आहे तर काही ठिकाणी ३० – ४० फूट आहे. या तटांना ५२ बुरुज आहेत. या किल्ल्यावर १६९५ साली १६९५ साली छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलेले शिवाजी महाराजांचे मंदिर आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर भारतात याच किल्ल्यावर आहे. या मंदिररतील महाराजांची मूर्ती पद्मासनावर बसलेली असून एका हाताने आचमन करीत आहे तर दुसरा हात गुढग्यावर आहे. हातात कडी आहे. शिवाजी महाराजांची हि मूर्ती पन्हाळगडावर बनविण्यात आली असे सांगण्यात येते.
या मंदिराचा सभामंडप कोल्हापूर संस्थानने बांधला. प्रवेशद्वारावर तटाच्या आतील बाजूस मारुतीची घुमटी आहे. या किल्ल्याच्या तटावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चुन्यात उमटविलेले हस्त आणि पद चिन्ह आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस तटावर या घुमट्या आहेत. तटाची एकूण लांबी ३ कि. मी. आहे.
४. पेंडूरचा सुप्रसिद्ध देवीचा मांड आणि वेताळ मंदिर

३०० वर्षांच्या जुन्या परंपरेने एक वर्षाआड येणारी मालवण तालुक्यातील पेंडूर गावाची जत्रा अर्थात देवीचा मांड म्हणून उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पांडुरंगाच्या दरबारात जातीभेद नव्हता. इतकेच नव्हे तर तेथे गरीब – श्रीमंत असा भेदभाव आणि उच्चं – नीचता नव्हती. २८ युगांची गोष्ट असली तरी पांडुरंग त्या पंढरीत नेमका किती वर्षे भक्तांची वाट पाहत उभा आहे हे नेमके कुणालाच ठाऊक नाही.
पेंडूरच्या या मनाच्या जत्र्येच्या आख्यायिकेबाबत सांगितले जाते कि, मालवण तालुक्यातील पेंडूरच्या खराडे वाडीच्या वाटेवर राहणारे हरिजन समाजातील एक वयस्क जोडपे कार्तिकी एकादशीच्या सुमारास पंढरीच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी वाहने उपलब्ध नसल्याने यात्रेकरू प्रवास पायी अथवा बैलगाडीने करायचे.
या जोडप्याला चालता चालता थकवा आला. थकव्यामुळे आपण पंढरीच्या दर्शनाला पोचतो की नाही या चिंतेने ते दोघे पांडुरंगाचा धावा करू लागले आणि काय चमत्कार त्यांच्या अंगात विद्युतशक्ती संचारल्यासारखे थेट पंढरीच्या गाभाऱ्यात शिरले.
पेंडूर गावचा सुप्रसिद्ध वेताळ –
मालवण कसाल रस्त्यावरील कट्टा गावापासून निसर्गरम्य ३ कि. मी. अंतरावर पेंडूर गाव आहे. या पेंडूर गावात जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिरातील वेताळाची मूर्ती भव्य असून भाविकांचे लक्ष वेधून घेते. या मंदिराच्या रस्त्यालगत सातेरीचे मंदिर असून या मंदिरातील भव्य वारूळ पाहून भाविक पर्यटक अचंबित होतात.
पौष महिन्यात दार ३ वर्षांनी सुप्रसिद्ध अशी देवीचा मांड संबोधली जाणारी देवीची जत्रा भरते. या पेंडुरगावात आणखी एक आश्चर्य म्हणजे सातेरी मंदिराच्या मागे जैन धर्मियांच्या मूर्ती इतरस्त्र विखुरलेल्या दिसतात.
५. कांदळगावचे श्री रामेश्वर मंदिर
मालवण आचरा रोडवर मालवण पासून अवघ्या १० कि. मी. अंतरावर असलेल्या कांदळगाव येथील श्री रामेश्वराची ख्याती दूरवर पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळी या रामेश्वरास भेट दिल्याचा उल्लेख आढळतो. किल्ल्याच्या बांधकामावेळी पश्चिम तटाचे बांधकाम टिकेना म्हणून महाराजांनी रामेश्वरास साकडे घातले.

यानंतर पश्चिम तटाचे काम पूर्ण झाल्यावर या स्वयंभू पाषाणावर छत्रपती शिवाजी महाराजांनी घुमटी बांधली आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असून शिवछत्रपतींनी जी घुमटी बांधली आहे ती घुमटी जीर्णोद्धाराच्यावेळी तोडण्यात येऊ नये असे शासकीय आदेश असल्यामुळे ती घुमटी आजही पाहावयास मिळते.
या ठिकाणी आणखीन एक ऐतिहासिक गोष्ट पर्यटकांना पाहावयास मिळते. ती म्हणजे महाराजांनी जेव्हा या देवस्थानाला भेट दिली तेव्हाच एक वडाचे झाड लावले. आज ३०० वर्षाहून अधिक काळ लोटला तरी हा वटवृक्ष इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा असून या झाडास शिवाजी महाराजांचा वड म्हणून ओळखतात.
६. आचरे गावाचा इनामदार श्री रामेश्वर मंदिर
मालवण तालुक्यातील आचरे गावात अनेक देवालये असली तरी श्री देव रामेश्वर हे त्या गावाचे प्रमुख देवस्थान असून धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून उभारी घेत आहे. या श्री देव रामेश्वरास हे संपूर्ण गाव कोल्हापूर संस्थानाने इनाम दिले आहे म्हणून रामेश्वरास श्री देव रामेश्वर इनामदार असे म्हणतात. मंदिर अतिशय भव्य असून मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे. मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेऊन भाकीव नतमस्तक होतात.
या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव ,रामनवमी आणि महाशिवरात्र हे मोठ्या थाटात साजरे केले जातात त्याच प्रकार्रे आचरे गावची गावपळण हि चिंदरचा गावपळनी प्रमाणे प्रसिद्ध आहे.एकदा रामेश्वर मंदिरातून गाव सोडण्याची नौबत झाली कि या बारा वाड्यातील गावकरी गाव सोडतात . तीन दिवसानंतर रामेश्वराने पतीचा कौल दिल्या नंतर गाव पुन्हा भरतो. आचार हे समुद्र किनाऱ्यालगतचे गाव असून या गावाला निरागरम्य समुद्र किनार लाभला असून गावातील माळ रानावर हुतात्मा कोयंडे यांचे स्मारक आहे.
७. श्री देव रामेश्वर ग्रामदैवत पालखी सोहळा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या शिवकालीन वारसा असलेल्या मालवण शहराच्या ग्रामदेवांचा पालखी सोहळ्यास शिवकालीन वारसा लाभला आहे. दिवाळीचा तिसऱ्या दिवशी पाडव्याला मालवणात दीपोत्सव साजरा केला जातो. मालवणी ग्रामदैवते श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांची पालखीतून भव्य मिरवणूक काढली जाते.
३५० वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने सुरु असलेल्या या उत्सवाला व्यापारी मेळ्याचे स्वरूप आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या ग्रामदेवांचे विधिवत शुद्धीकरण आणि पुनर्प्रतिष्ठापना केल्यानंतर हा सोहळा सुरु झाला असे जाणकार म्हणतात.
मालवण शहराच्या सीमेवरून ग्रामदेवतांचे पालखी दरवर्षी वाजत गाजत भाविकांना दर्शन – पूजनाचा लाभ देत जाते. हा पालखी सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्याभरातूनच नव्हे तर गोव्यातूनही भाविक मालवणात येतात. या दिवशी मालवणला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते.
8 comments