वैयक्तिक ब्लॉग

शिवकालीन वारसा लाभलेले, मालवण तकलुक्यातील – निसर्गरम्य मालडी

सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा

सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात पहिला पर्यटन जिल्हा आहे. हा जिल्हा अथांग अरबी सागर आणि पश्चिम घाटाच्या सह्याद्री पर्वतरांगाच्या मधोमध वासाला आहे आणि त्याच मुळेच हा जिल्हा चहुबाजूने नैसर्गिक सौन्दर्याने नटलेला आहे. सिंधुदुर्गातील जवळपास प्रत्येक गाव हे बघण्यासारखे आहेत आणि त्यांना शिवकालीन वारसा देखील लाभला आहे. लांबच लांब समुद्र किनारे, शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले, विविध प्रकारची मंदिरे या सर्वांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्ध आहे. त्याउलट आज आपण अशा एका गाव भेट देणार आहोत, त्या गावाला समुद्र किनारा नाही, शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले नाही, पण शिवकालीन इतिहास नक्कीच आहे. त्या गावाच्या इतिहासाची तसेच नैसर्गिक सौन्दर्याची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत. तो गाव म्हणजे सिंधुदुर्गातील, मालवण तालुक्या पासून अवघ्या ३० कि. मी. अंतरावर असलेला मालडी गाव होय.

मालडीचा इतिहास

मालडी पूर्वीच्याकाळी साळशी तालुक्यात येत असे. सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी, म्हणजेच दि. ८ फेब्रुवारी १६६५ रोजी मालडी बंदरातून ८५ लहान व ३ मोठी लढाऊ गलबते एवढ्या आरमारी सामर्थ्यावर छत्रपती महाराजांनी तत्कालीन बेदनूर, (दक्षिण कर्नाटकातील आजचे शिमोगा, मंगळूर, चिकमंगळूर या जिल्ह्यांचा प्रदेश) राज्यातील बसरूर बंदरावर स्वारी केली होती. असा उल्लेख इतिहासात सापडतो.

स्वारीच्या तारखेवरून असे दिसते की, इ. स. १६६५ पूर्वी काही वर्षे आदिलशाहीचा अंमल या भागातून नष्ठ झाला होता. मात्र हा गाव आदिलशाही राज्यात येत होता. यांच्याच वंशजाकडून इ. स. १८४९ मध्ये परबांनी (पराडकर) शंभर रुपये देऊन हा गाव विकत घेतला (संदर्भ – मोदी कागदपत्रे)

सिंधुदुर्ग किल्ल्याचा मुहूर्त करण्याआधी छत्रपती शिवाजी महाराज मालवणच्या अभ्यंकर भटजींना म्हणतात ” या जागी सुखरूप राहणे, मनी शंका न धरणे, प्रांत मजकूर हस्तगत जाहलाच आहे. काही किंचित अद्द्लशाई कुडाळ पासून मामले फोंड्यापर्यंत ठाणी आहेत. ती दहशत खाऊन जातील. राज्य प्रबळ होत आहे चिंता न करणे. “

येथून बारमाही वाहणाऱ्या नदीला ‘गडनदी’ हे नाव बहुधा शिवाजी महाराजांनी ठेवले असावे. कारण योग्य नावाची योजना करण्यात महाराज चतुर होते. येथील पार्श्वभूमीही तशीच आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून वाहणाऱ्या या नदीच्या मुखापासून सुरुवात केल्यास, सर्वप्रथम भेटतो तो रामगड, त्यानंतर भगवंतगड, मसुरे येथे भरतगड व जेथे गडनदी अरबी समुद्रात विलीन होते तेथे सर्जेकोट अभेद्य तट करून आहे. हे सर्व गट – कोट म्हणजे जणू सिंधुदुर्गाचे रखवालदाराचं होत. छत्रपती शाहू महाराजही मालडीहून गेल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. त्यांनीच प्रवाशांना ने – आण करणाऱ्या “तरी” ची मालकी संवाद परब मराठ्यांना दिली. (संवाद अजूनही गावात आहे.) इ. स. १६७० मध्ये शिवाजी महाराज या भागात आले होते.

३० मार्च १८१८ रोजी इंग्रज सेनापती ईमलॉक याने गडनदीत आरमार जमवून छोट्याश्या लढाईने भगवंतगड, बावडेकर पंताकडून जिंकून घेतला. मालडी ते सर्जेकोट या गडनदीच्या पात्रात झालेली ही शेवटची लढाई असावी.

ज्याअर्थी शिवाजी महाराजांसारखी थोर विभूती मालडीहून स्वारीला कूच करते त्याअर्थी मालडी येथे आरमारी तळ असावा. इतकेच नव्हे तर या योजनेचे प्रमुख सूत्रधार, आयोजक मालडीत असावेत आणि ते पराडकर परबच असावेत. तत्कालीन आरमारावर “गुराब” हे सर्वात लढाऊ गलबत होते. यावर सुमारे तीस तोफा असत. अशी तीन गलबते मालदी बंदरातून स्वारीस निघतात म्हणजे शिवकाळातही या छोट्याश्या गावाला किती महत्व होते हे दिसून येते. याचं आणखी एक कारण म्हणजे सर्जेकोट पासून कणकवली व पुढे कुडाळ फोंडा, गोवा, विजापूर व कोल्हापूरकडे जाण्याचा हाच मार्ग त्यावेळी जवळचा होता. मालडीची बाजारपेठही प्रसिद्ध होती. अनेक गावाचे लोक येथे येऊन माल खरेदी करीत.

मालडीत मोठी, चौसोपी चावडी होती. ती इमारत इ. स. १९५३ च्या महापुरात पडली. परिसरातील अनेक गावांच्या गुन्हेगारांना येथे आणून बंदिस्त केले जात असे. त्यांचा प्राथमिक न्यायनिवाडा येथेच होई. बडे बडे इंग्रज अधिकारी, कलेक्टर, मामलेदार येथे येत असत. यावरून पूर्वीपासून या गावाला किती महत्व होते हे दिसून येते. शासकीय कचेऱ्या मुख्य गावातच बांधण्यात येतात हे आपणांस माहित आहेच. मालडी गाव पूर्वीपासून कुठल्याही गावाचा भाग नव्हता. शासकीय दप्तरात तास उल्लेख आढळत नाही. पराडकरांनी हा गाव विकत घेऊन स्वतः वसवला व नाव दिले.

मालडी

मालडी हे मालवण तालुक्यातील सुमारे ६० उंबरठ्याचे एक निसर्गरम्य गाव आहे. या गावाला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. बारमाही दुथडी भरून वाहणारी गडनदी नागमोडी आकार घेऊन दरडीच्या डोंगराजवळून कोईळ (कोळळली) गावाच्या दिशेने वाहत जाते. अधून मधून वर पाऊस पडलं कि येथे नदीला पूर येतो. नदीला पूर आल्यावर तिचे भेसूर स्वरूपसुद्धा पाहण्यासारखे असते. जिकडे तिकडे लाल लाल गढूळ पाणी, भीतीदायक आवाज, पाण्याचा जोर, त्यातून वाहात येणारी झाड, जोते,पाळीव प्राणी, इतर घरगुती सामान, असे उग्र रूप गडनदी धारण करते. निसपर्यंत पाणी आलं की मलाडीकर चिंताग्रस्त होतात. या गावानं  सन १९३३ तसेच १९५३ सारखे महापूर पाहिलेत. त्यांचे तडाखे सोसले.

पूर्वी दहाबारा प्रवाशी होड्या या बंदरातून दररोज सुटायच्या, आज कोणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही. मोठे मोठे पाडाव येऊन धान्याच्या गोण्या बंदरावर खाली करीत. परिसरात माल ठेवायला जागाच नसे. रात्री दोन तीन वाजेपर्यंत मालाची चढ उतार होणारी ही व्यापारी पेठ होती.

मालडी गावाच्या निसर्गसौदर्यात भर घालण्याचे काम येथून वाहणाऱ्या गडनदीने केले आहे. एका बाजूला भिंतीसारखा सरळसोट भव्य, नेहमी हिरवा गार असणारा दरडीच डोंगर, तर दुसऱ्या बाजूला बाजूला डोंगरासारखीच असलेली लाल दगडाची काप. या कापीच्या आधारावरच मालोंड गाव वसलेला. दरडीच्या डोंगरावर चुनखडीचे दगड तर काही ठिकाणी अभ्रक सापडतो. एका बाजूला गडनदी व तिसऱ्या बाजूस भटवाडी आहे. तस पाहिलं तर सभोवार डोंगराचं डोंगर आहेत. गार्ड झाडीत गाव वासाला आहे. येथील रानात भेकरे, रानडुक्कर, ससे, लाव्हे आदींचे वास्तव्य असते. त्यामुळे प्राण्याच्या शिकारीसाठीही गावप्रसिद्ध आहे.

गडनदीच्या सर्जेकोटकडील भागास काही लोक “कालावलची खाडी” संबोधतात. कारण सर्जेकोट जवळ ही नदी अरबी समुद्रास मिळते. त्यामुळे अर्थातच खारेपाणी नदीच्या पात्रात मिसळते व वर वर चढत जाते. त्याने नदीचा बराच भाग व्यापतो. पाण्याचा खारटपणा वर्षातून अनेक महिने राहतो.  नदी बाराही महिने दुथडी भरून वाहते. गावात भातशेती, नाचणी, भुईमूग ही प्रमुख पिके तर मळेशेती मिरची, कुळीथ, चवली, वांगी वगैरे विविध प्रकारची भाजी पाट्याच्या पाण्यावर होते. सोबत हापूस, रायवळ आंबे, पपनीस, काजू, फणस, रातांबे वगैरे सर्व प्रकारची कोकणातील डोंगरी गावात होणारी फळे होतात. येथे आमसुले बनवण्याचाही गृहोद्योग चालतो. गाव शेतीप्रधान पूर्वी कणकवलीच्या बाजारासाठी बैलगाड्यांतून तांदूळ, गूळ, कडधान्याची वाहतूक, काजू, फणस, विक्री करून काही कुटुंबे आपले पॉट भरीत. तर काहींजण जलमार्ग वाहतूक करीत.

गावात एक मोठा ओहोळ वाहतो. त्याचे चार भाग पडले आहेत जणू चार होळ झाले आहेत. त्याला “कोंड” असे संबोधले जाते आणि ते गावाच्या साऊदर्यात आजून भर टाकतात. या कोंड्यावर जाऊन आंघोळ करण्यात एक वेगळीच माझा येते आणि गावातले बरेचशे युवक तेथे आंघोळ करायला येतात. फिश स्पा तर तुम्हाला माहीतच असेल, आता तर मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर बऱ्याच जणांना आपण पाहात असाल त्याची विक्री करताना. मालडी मध्ये तुम्हाला नैसर्गिक फिश स्पा अनुभवायला मिळेल. गावात ज्या ओहाळाचे चार भाग होतात, त्या ओहळामध्ये छोटे छोटे मासे थव्या थव्यांनी येतात आणि ओहळात पाय सोडताच ते मासे आपल्या पायाला झोंबतात, गुदगुल्या करतात.

मालडी म्हणजे फळ – फुलांचं नंदनवन, करवंदे जांभळाचे आगर, फणसाचे महेर घरच होत. गाव लहान पण येथील निसर्ग महान आहे.  अशा या मालडी ला नक्की भेट द्या, आणि इथल्या नैसर्गिक संपत्तीचा आनंद घ्या.
बाळ पराडकर 

Tags
Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close