Connect with us

ब्लॉग

सिंधुदुर्गातील मंदिरांच्या मधील वारुळाचे सत्य ! सातेरी देवी आणि मंदिरातील वारुळाची कहाणी !

Published

on

sateri devi history in marathi

कोकण म्हटलं की आपल्या तिकडच्या नारळाच्या बाग, हापूस आंबे, फणस, त्याचबरोबर तिथले समुद्र किनारे इत्यादी आठवतात. याच कोकणच्या भूमीला परशुरामाची भूमी असे संबोधले जाते. पण याच कोकणात अनेक देवींची पण जागृत देवस्थाने आहे आणि अशा प्रत्येक देवस्थानाची काही ना काही कथा आणि त्याच्या मागे इतिहास देखील आहे.

जर तुम्ही कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भटकंती करीत असाल आणि एखाद्या मंदिरामध्ये जर वारुळ दिसले तर आश्चर्यचकित नका होऊ. ती वारुळे नुसती वारुळे नसून, मंदिराचाच अविभाज्य भाग, म्हणजेच देवी आहे. देवीचं वास्तव्य त्या वारुळांत आहे.

कोकणात वारुळ आणि सातेरी देवस्थान असे समीकरण दिसून येते. सातेरी देवी ही नागकन्या असल्याने कोकणात सातेरी देवीच्या मंदिरात मोठी वारुळे आढळतात. या वारुळ महिम्यावर एक टाकलेला प्रकाशझोत. काय आहेत ती वारुळ ? आणि मंदिरच्या आतमध्ये कशी काय आहेत वारुळ ? लोक त्या वारुळाची पूजा का करतात? त्याचाच शोध आपण ह्या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत.  

अशी एक दोन नाही तर तब्बल ७९ मंदिरे सातेरी नावाने सिंधुदुर्गात आहेत. अशाच काही महत्वाच्या, अतिप्राचीन आणि जागृत सातेरी देवीच्या मंदिरांचा आज आपण आढावा घेऊ.   

बिळवस सातेरी जलमंदिर 

अनेक रीतिरिवाज व धार्मिक परंपरा कोकणात मोठ्या श्रद्धेने झोपसल्या जातात. मालवण तालुक्यातील बिळवस सातेरी मंदिर हे प्रसिद्ध असून कोकणात आढळणाऱ्या सातेरी देवींच्या मंदिरापैकी हे एकमेव जलमंदिर आसून आषाढ महिन्यात या देवीचा जत्रोत्सव होतो. सातेरी देवीचे जलमंदिर सुमारे ७०० ते ८०० वर्षापूर्वीचे असून जैन घराण्यातील एका भक्ताने ते बांधलेले आहे. याबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की, या तलावाच्या मधोमध असलेल्या वारुळातून रक्त येऊ लागले, त्यावेळी तेथील एका ग्रामस्थाच्या स्वप्नात देवीने दृष्टांत दिला की, माझे वास्तव्य या मातीच्या वारुळात आहे आणि जनावरांपासून त्रास होत असल्याने याठिकाणी देवालय बांधा. देवीचा दृष्टान्त समजून ग्रामस्थाने त्याठिकाणी देवालय बांधले. गाभाऱ्यात सात ते आठ फुटांचे वारुळ असून या वारुळातच शेष रूपाने देवीचे वास्तव्य असून अनेक भक्तांना देवीचे दर्शन शेष रूपात होते. मसुऱ्याच्या बारावाड्यांची श्री देवी सातेरी मूळ देवी मनाली जाते. मंदिर परिसरात नव्हे तर संपूर्ण गावात दारूबंदी असून येथे गावकरी दारूला स्पर्शही करीत नाहीत. याचबरोबर मालवण शहरातील देऊळवाडा भागात श्री सातेरी देवीचे मंदिर आहे या ही देवीची यात्रा श्रावण महिन्या असते.   

म्हापण – श्रे देवी शांतादुर्गा 

वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण गावाचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी म्हणजेच शांतादुर्गा या नावाने प्रसिद्ध आहे. ही देवी वारुळातुनच प्रकट झाली आहे असे जाणकार सांगतात. आज याठिकाणच्या मंदिरात जी देवीची मूर्ती दिसते त्या मूर्ती नजीक देवीचे वारुळ आहे. या वारुळात फार मोठी शक्ती आहे असे तेथील ग्रामस्थ सांगतात. दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. हे देवस्थान पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हे देवस्थान जागृत देवस्थानांपैकी एक असून येथे गुढीपाडवा त्रिपुरी पौर्णिमा या दिवशी भाविक न चुकता देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात. या वारुळाच्या बाजूला देवीची मूर्ती मातीची असूनही त्यावर कोणताही परिणाम होत नाही. देवीची मूर्ती आणि वारुळाचे दर्शन घेतल्याने भाविकांना समाधान मिळते. या वारुळात साप असल्याचे सांगितले जाते. देवीच्या मूर्तीची पाणी व अन्य कारणाने झीज झाल्यास या वारुळाची माती दुधात कालवून लावली जाते. देवीचा गाभारा लाकडी असून वारुळ त्याला टेकलेले आहे. वारुळाला लहान मुलांसह मोठेही स्पर्श करुन प्रदक्षिणा घालतात. शके ११०० ते १२०० दरम्यान पासूनच याला इतिहास असल्याचे सांगण्यात येते.   

नेरुर श्रीदेवी सातेरी 

कुडाळ तालुक्यातील नेरुर देऊळवाडा येथील प्रसिद्ध कलेश्वर मंदिराच्या परिसरात श्रीदेवी सातेरीचे देवस्थान आहे. मंदिराचे नव्याने बांधकाम करण्यात आले असून या मंदिरातील वारुळ भव्य आहे. नवीन मंदिराची उभारणी करताना वारुळाची विशेष काळजी घेण्यात आली. हे मंदिर फार जूने आहे असे जाणकार म्हणतात. बाकीच्या सातेरी देवींप्रमाणे ही देखील देवी नवसाला पावणारी देवी आहे, आणि खासकरून जेव्हा सुवासिनी या देवीच्या ओट्या भरतात तेव्हा त्यांचे बोललेले नवस फेडले जातात, असं तिथले गावकरी सांगतात.   

सरमळ – श्री देव सातेरी 

सरमळ गावाचे ग्रामदैवत, श्री सातेरी देवी हे एक जागृत देवस्थान आहे. या वारुळरूपी सातेरी देवीला नवस म्हणून निळ अभिषेक ( वारुळाला निळ लावली जाते) केला जातो. त्यामुळे वारुळ निळे दिसते. वारुळात नाग देवतेचे वास्तव्य आहे. हे सातेरी देवीचे मंदिर सरमळ तलावाच्या काठावर १६ व्या शतकात बांधण्यात आले. या वारुळाला दर मंगळवारी साडी नेसवली जाते. तसेच देवीची मुखवटा सजविला जातो. परब, कदम व तळेकर हे मानकरी असून विविध उत्सव साजरे केले जातात.   

साळगाव श्री देवी सातेरी 

कुडाळ तालुक्यातील मुंबई – गोवा महामार्गानजीक असलेल्या हिरव्यागार वनराईने नटलेल्या साळगावचे श्रीदेवी माऊली देवस्थान व त्या मंदिराच्या सभा मंडपाला लागूनच श्री देवी सातेरी स्वयंभू देवता आहे. वारुळरुपी भूगर्भ आधारभूत सहा आणि तेरा मिळून एकोणीस तत्वांची मूळ देवता आहे. तिची उत्पत्ती स्थान अडीज हजार वर्षांचे असून सप्तऋषींच्या तपश्चर्येतून आदिशक्ती निर्माण झाली आहे. आदिशक्तीचे जागृत देवस्थान असल्याने भक्तांच्या नवसाला पावते. १०० वर्षांपूर्वी येथे मंदिर बांधण्यात आले. आतील पाषाण महिषासुरमर्दिनी देवतेचे आहे. या ठिकाणी धूरी घराण्याला मानाचा अधिकार आहे. नवरात्र उत्सवात नऊ दिवस या देवीला हळदी कुंकूवाचा अभिषेक केला जातो. या ठिकाणी पुष्प वाहण्याची प्रथा नाही सातेरी देवीच्या परवानगीनेच माऊली देवीकडे भक्तांचे प्रसाद घेतले जातात. कौलाचा निर्णय सातेरीकडून घेतल्यानंतर त्याची तडजोड माउलीकडे केली जाते. वर्षाला अर्धाफुट या वारूळाची उंची वाढत जाते. या परिसरात माउली आत्मेश्वर, कपालेश्वर, गावडे परब, मुळमठी दांडेकर यांची देवस्थाने आहेत. दरवर्षी पिंडी स्थापन, जत्रोत्सव शिमगा उत्सव, दशहरा कार्यक्रम उत्सवात होतात.   

पावशी – श्री देवी सातेरी 

निसर्ग सौदर्याने नटलेले व कुडाळ तालुक्यातील पावशी गावची ग्रामदेवता श्री देवी सातेरी जागृत देवस्थान आहे. या सातेरी देवीची महती दूरवर पसरली आहे. या देवी बाबत आख्यायिका सांगितली जाते की, म्हाडेश्वर नामक दांपत्य राहत होते त्या घरातील वृद्ध महिला नेहमीप्रमाणे स्वयंपाक घरातील चुलीकडे गेली तेव्हा तिला चुलीत छोटे वारुळ दिसले. ते त्या महिलेने काढून टाकले. हा प्रकार नित्याचाच होऊ लागला. एके दिवशी त्या वृद्धेच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की, या वारुळात माझे वास्तव्य आहे. त्यानंतर या वारुळाची वाढ होऊ लागली. वारुळ इतके मोठे झाले की ते घराच्या छपरावरून बाहेर पडू लागले. त्यावेळी त्या दांपत्याला भीती वाटू लागली. त्या दांपत्याने वारुळाला कापड बांधून विनंती केली की, तू वाढू नकोस आणि त्यानंतर त्यावारुळात वाढ नाही झाली. सध्या या वारुळाची उंची १४ ते १५ फूट आहे. त्यावर पांढऱ्या रंगाचे कापड बांधलेले आहे तो त्या दाम्पत्याने वारूळावर टाकला होता. दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी निळ उत्सव साजरा केला जातो. सिंधुदुर्गासह, मुंबई, गोवा, कोल्हापूर तसेच महाराष्ट्रातील इतर काही भागातून येथे भाविक उपस्थित राहतात. सातेरी देवी नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. बोललेले नवस ही देवी सातेरी पूर्ण करते.   

मसुरे देऊळवाडा येथील माऊली 

निसर्गाच्या विविधतेने नटलेल्या मसुरे गावात देऊळवाडा येथील श्री माऊली मंदिर हे वारुळ असलेले मंदिर आहे. या मंदिराचं गाभारा प्रशस्त व चौकोनी असून त्यामध्ये श्री देवी माऊली वारुळ स्वरूपात आहे. वारुळाचा परीघ सुमारे २० फूट असून शेंड्याकडे निमुळती होत जाऊन तिची उंची १५ फूट आहे. नवरात्रौउत्सवा अगोदर वारुळ काळसर दगडी रंगाने रंगवून त्यावर चुन्याच्या उभ्या रेषा काढतात. येथे दसऱ्याला मोठा उत्सव होतो.    तर अशी आहेत ही वारुळ आणि श्री देवी सातेरी मातेचा संदर्भ.  (सदर लेख हा सुमंगल प्रकाशन च्या अंगाणेवाडी – कुणकेश्वर विशेषांकातून घेण्यात आला आहे.)

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *