Connect with us

क्रिडा

विराटला वनडेच्या नेतृत्त्वपदावरून हटवल्यानंतर गांगुलींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘त्याला विनंती केलेली…’

Published

on

बीसीसीआने बुधवारी (८ डिसेंबर) रोहित शर्माला भारताच्या एकदिवसीय संघाचा नवीन कर्णधार घोषित केले. यासह एकदिवसीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला या पदावरून हटवण्यात आले आहे. बीसीसीआयने ही घोषणा करताना विराटला या पदावरून हटवण्यामागचे कारण सांगितले नव्हते. पण आता बीसीसीसीआय (bcci) अध्यक्ष सौरव गांगुली (sourav ganguly) यांनी याबाबात प्रतिक्रिया दिली आहे.

गांगुलींनी सांगितल्याप्रमाणे बीसीसीआयने यापूर्वी विराटला टी-२० संघाचे कर्णधारपद न सोडण्यासाठी आग्रह केला होता. पण विराटने त्यांचे म्हणणे ऐकले नाही. आता विराटच्या त्या निर्णयामुळेच बीसीसीआयला रोहित शर्माकडे टी-२० आणि एकदिवसीय संघाचे नेतृत्व सोपवावे लागले आहे. गांगुलींनी सांगितल्याप्रमाणे टी-२० आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद एका खेळाडूकडे असल्यास योग्य असते.

सौरव गांगुली वृत्तसंस्था एएनआयसोबत बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, “खरेतर बीसीसीआयने विराटला टी-२० आंतरराष्ट्रीय संघाचे कर्णधारपद न सोडण्यासाठी विनंती केली होती. पण त्याने आमचे म्हणणे ऐकले नाही. तेव्हा निवडकर्त्यांनी पांढऱ्या चेंडूच्या प्रकारात दोन वेगवेगळे कर्णधार ठेवणे योग्य वाटले नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला की, विराट कसोटी संघाच्या कर्णधारपदी कायम राहील आणि रोहित पांढऱ्या चेंडूच्या प्रकारात कर्णधाराचा पदभार सांभाळेल. मी अध्यक्ष असल्याच्या नात्याने विराटसोबत वैयक्तिक चर्चा केली होती. त्याव्यतिरिक्त निवडर्त्यांच्या अध्यक्षांनी देखील त्याच्याशी चर्चा केली होती.”

यावेळी गांगुलींनी विराटला त्याच्या टी-२० आणि एकदिवसीय संघासोबतच्या योगदानासाठी धन्यवाद म्हटले आहे. तसेच रोहितचे नवीन जबाबदारी स्वीरण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, “त्यांना रोहित शर्माच्या नेतृत्व क्षमतांवर पूर्ण विश्वास आहे आणि विराट कोहली (virat kohli ) कसोटी संघाच्या कर्णधारपदी कायम राहणार आहे. बीसीसीआयला पूर्ण विश्वास आहे की, भारतीय क्रिकेट योग्य हातांमध्ये आहे. आम्ही पांढऱ्या चेंडूच्या प्रकारात कर्णधाराच्या रुपातील योगदानासाठी विराट कोहलीला धन्यवाद देतो.”

तत्पूर्वी सीबीसीआयने विराटला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवल्यानंतर गुरुवारी एक ट्वीट करून त्याचे आभार मानले आहेत. ट्वीटमध्ये बीसीसीआयने लिहिले की, “एक नेता, ज्याने धैर्य, उत्कटता आणि दृढनिश्चयाने संघाचे नेतृत्व केले. धन्यवाद कर्णधार विराट कोहली.”

दरम्यान, विराटच्या कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने भारतासाठी ९५ एकदिवसीय सामन्यांमध्ये नेतृत्व केले आणि त्यापैकी ६५ सामने जिंकले आहेत. त्याच्या नेतृत्वात संघाने सरासरी ७०.४३ टक्के सामन्यांमध्ये विजय मिळवला. त्याच्या नेतृत्वात भारताने एकूण २७ सामन्यात पराभव पत्करला.