Connect with us

क्रिडा

सीएसकेचा ४ अर्धशतक ठोकणारा ‘हा’ फलंदाज प्लेऑफच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता

Published

on

csk

आयपीएल २०२० स्पर्धेत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करता आला नव्हता. परंतु आयपीएल २०२१ स्पर्धेत या संघातील खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आणि सर्वात आधी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. आतापर्यंत या संघाने १२ पैकी ९ सामन्यात विजय मिळवत १८ गुणांची कमाई केली आहे. येत्या काही दिवसात प्लेऑफच्या सामन्यांना प्रारंभ होणार आहे. दरम्यान चेन्नई सुपर किंग्स संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील दिग्गज फलंदाज दुखापतग्रस्त झाला आहे.

हे पण वाचा : ऋतुराजचा नाद खुळा, आयपीएलमध्ये अशा पद्धतीने शतक पूर्ण करणारा ठरला एकमेव खेळाडू

शनिवारी (२ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यादरम्यान चेन्नई सुपर किंग्स संघाचा सलामीवीर फलंदाज फाफ डू प्लेसिस याला धाव घेत असताना दुखापत झाली होती. त्याची टक्कर वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानशी झाली होती. यानंतर, काही वेळ तो मान धरून मैदानावर बसला होता. यानंतर त्याला पुन्हा एकदा कन्कशनचा त्रास जाणवू लागला होता.

ही घटना चेन्नई सुपर किंग्स संघाची फलंदाजी सुरू असताना सहाव्या षटकात घडली होती. झाले होते असे की, मुस्तफिजुर रहमानने टाकलेल्या षटकातील पाचव्या चेंडूवर फाफ डू प्लेसिसने एक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्याची धडक मुस्तफिजुर रहमानशी झाली होती. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स संघाच्या फिजीयोने मैदानाच्या दिशेने धाव घेतली होती. त्यावेळी फिजीयोने त्याच्या मानेची मालिश केली होती. त्यानंतर तो फलंदाजीला देखील आला होता. परंतु तो जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. तो पुढच्याच षटकात बाद होऊन माघारी परतला होता.

डू प्लेसिसच्या दुखापतीवर असेल चेन्नई सुपर किंग्स संघाची नजर
फाफ डू प्लेसिसने कॅरेबियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत ९ सामने खेळले होते. ज्यामध्ये त्याने २७७ धावा केल्या होत्या. हीच कामगिरी त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेत देखील सुरू ठेवली आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत एकूण १२ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला १२ सामन्यात ४६० धावा करण्यात यश आले आहे. दरम्यान त्याने ४ अर्धशतके देखील झळकावले आहेत.