Connect with us

क्रिडा

विराटने राजीनामा देत फसवला बीसीसीआयचा प्लॅन? धक्कादायक योजनेचा झाला खुलासा

Published

on

[ad_1]

विराट कोहलीने (Virat Kohli) १५ जानेवारीला भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव  झाल्यानंतर  दुसऱ्या दिवशी विराटने हा निर्णय घेतला. आता यासंदर्भात एक नवीन खुलासा झाला आहे. माध्यमांमध्ये अशी चर्चा केली जात आहे की, विराटने कसोटी कर्णधारपद सोडण्यापूर्वीच बीसीसीआयने (BCCI) त्याच्याकडून कसोटी संघाचे नेतृत्व काढून घेण्याचे ठरवले होते. परंतु विराटने ही वेळ येऊ दिली नाही आणि कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले.

माध्यमांतील माहितीनुसार, बोर्डच्या बैठकीत विराटला दक्षिण अफ्रिका दौऱ्यानंतर कर्णधारपदावरून हटवण्याची चर्चा झाली होती. या वृत्तात, बीसीसीआय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले गेले की, “होय, या पर्यायावर चर्चा झाली होती की, त्याला (विराट) दक्षिण अफ्रिका मालिकेनंतर राजीनामा द्यायला सांगितले जावे. सर्वजण यावर सहमत नव्हते. पण बहुमत विभाजीत कर्णधारपदाच्या विरोधात होते आणि एक नवीन सुरुवात हवी होती. तसेच, विराटने त्याच्या फलंदाजीवर लक्ष द्यावे, असे त्याला सांगण्यात येणार होते. जर त्याने राजीनामा दिला नसता, तर त्याला याविषयी सांगितले गेले असते.”

विराटने एमएस धोनीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर २०१५ मध्ये कसोटी संघाची धूरा हातात घेतली. त्यानंतर सात वर्षांपेक्षा अधिक काळ त्याने कसोटी संघाचे नेतृत्व केले. विराट भारतीय संघाच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरला. त्याच्या नेतृत्वात खेळलेल्या ६८ कसोटी सामन्यांपैकी ४० सामने भारताने जिंकले.

दरम्यान, कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्यापूर्वी विराटने टी२० संघाचे कर्णधारपद देखील स्वतःच्या इच्छेने सोडलेले. सप्टेंबर महिन्यात टी२० विश्वचषक संपल्यानंतर त्याने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. तसेच दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेतले गेले.

Advertisement

एकदिवसीय संघाचे नेतृत्व त्याच्याकडून काढून घेतल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांनी स्वतः कोहलीला विनंती केली होती की, टी२० संघाचे नेतृत्व सोडू नको. त्यानंतर दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विराट म्हणाला की, त्याच्यासोबत कोणीच टी-२० संघाच्या कर्णधारपदाविषयी चर्चा केली नव्हती. या संपूर्ण प्रकारानंतर बीसीसीआय आणि विराट यांच्यातील मतभेद जगासमोर आले होते.

[ad_2]

Copyright © 2021 Kokanshakti. Theme by MVP Themes, powered by WordPress.