Connect with us

महाराष्ट्र

द्राक्ष, डाळिंबाला फटका! रब्बी पिके मात्र जोमात; उत्पादनात मात्र घट

Published

on

सांगली : महिन्याच्या अखेरच्या जिल्ह्यात आठवड्यापासून सुरू असलेल्या थंडीच्या लाटेमुळे शेतातील पिके गारठली आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमान कमालीचे घटले आहे. यातून सारेच जनजीवनच विस्कळीत आहे. खेरीज तापमानात घट झाल्यामुळे द्राक्ष, डाळिंब, केळीसह भाजीपाला पिकांना जोरदार फटका बसू लागला आहे.

थंडीच्या तडाख्याने बागायती क्षेत्रातील पिकांची वाढ खुंटली आहे. यातून उत्पादनात घटीचा धोका वाढला आहे. मात्र, या थंडीमुळे रब्बी हंगामातील पिके जोमदार आहेत. हवामान बदलामुळे शेतीचे अर्थकारण मात्र बिघडले आहे.

जिल्ह्यात चालू वर्षीच्या सुरुवातीपासूनच प्रचंड प्रमाणात थंडीची लाट सुरू आहे. रात्री ७ नंतर सकाळी १० पर्यंत जिल्हा गारठलेला असतो. त्यानंतर दुपारच्या वेळी नरम ऊन व ढगाळ वातावरणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सततच्या नैसर्गिक संकटांचा आधीच जिल्ह्यातील शेतकरी सातत्याने सामना करीत आहे.

त्यातच आताच्या थंडीच्या लाटेची भर पडली आहे. या बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्याला पिकांवरील विविध रोग, किडींचे नियंत्रण करणे अवघड झाले आहे. जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब, केळी यांसह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, यावेळी अत्यंत मोठ्या प्रमाणात शेती आणि शेतकऱ्यांना थंडीच्या लाटेचा सामना करावा लागत आहे.

प्रामुख्याने या थंडीच्या लाटेमुळे शेतकरी गारठला आहे. बहरात असलेल्या द्राक्षशेतीवर याचा विपरीत परिणाम जाणवत आहे. अनेक बागांमध्ये या थंडीच्या तडाख्यामुळे फळांची वाढ खुंटली असल्याचे चित्र आहे. यातून उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

जिल्ह्यात प्रामुख्याने तासगावसह पूर्वभागात सध्या द्राक्ष पीक पक्क होण्याच्या अवस्थेत आहे. द्राक्षटापूत काही ठिकाणी द्राक्षांची काढणी सुरू झाली आहे. त्याचवेळी अंतिम टप्प्यात आलेले पीक वाचवण्यासाठी व रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बागांवर महागड्या औषधांची फवारणी केली जात आहे.

आगाप छाटणी घेतलेल्या बागांमधील खाण्यायोग्य माल झाला आहे. त्याची काढणी करण्याची खरी तर आता गरज आहे. मात्र, कमालीच्या थंडीमुळे बाजारात मालाला उठाव जाणवत नसल्याचे चित्र आहे. यामुळे हंगामाच्या तोंडावरच द्राक्षांचे दर कोलमडले आहेत. सध्या २५० ते ३५० रुपये सरासरी भाव सुरू आहे. यातून द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

तयार फळांना तडे… प्रतवारी घसरणार..?

थंडीच्या तुफानी लाटेमुळे जिल्ह्यात द्राक्षाबरोबरच डाळिंब बागांनादेखील मोठ्या प्रतिकूल स्थितीचा सामना करावा लागत आहे. तासगाव पूर्वसह जत, आटपाडी तालुक्यातील डाळिंब उत्पादका शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. थंडीमुळे डाळिंब सेटिंग होत नाही. जमिनीत असणारे घटक मिळत नसल्यामुळे झाडावर दुष्परिणाम होत आहे. यातूनच फळांच्या वाढीवर तर परिणाम होणार आहेच.

खेरीज तयार मालाच्या सालीस तडे जाऊ लागले आहेत. यातून प्रतवारी घसरून दर कमी मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे. या नुकसानीच्या धास्तीने महागडा खर्च करून डाळिंब बागा टिकवलेला शेतकरी चांगलाच हबकला आहे. याचप्रमाणे केळी उत्पादनावर देखील थंडीच्या लाटेचा प्रभाव पडला आहे. केळीपिकांची वाढ, फळाची फुगवण थांबली आहे. यातून वजनात तर घट येणार आहेच. अपेक्षित दर्जाचा माल जमा होणार नसल्याने केळीउत्पादक चांगलाच संकटात सापडला आहे.

बागायती टापूत ऊसतोडीचा धडाका सुरू होता. मात्र, थंडीच्या लाटेचा फटका ऊसतोडीला देखील बसला आहे. ऊसतोडणीही अत्यंत संथगतीने सुरू आहे. अनेक कारखान्यांना गाळपाइतकाच जेमतेम ऊस उपलब्ध होत आहे.

भाजीपिकांनाही जोरदार फटका..

थंडीचा प्रभाव भाजीपाला उत्पादनावर पडला आहे. वांगी, मिरची, टोमॅटो, वाटाणा, घेवडा, भेंडी यांसह अन्य भाजीपाला उत्पादनात घट झाली असल्यामुळे भाजीपाला उत्पादक चिंतेत आहेत.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *