Connect with us

महाराष्ट्र

‘या’ कंपनीचे तननाशक फवारल्याने दोन एकरातील सोयाबीन जळाले!

Published

on

जालना : तालुक्यातील सिंधी काळेगाव येथील शेतकरी विष्णूपंत गिराम यांनी उन्हाळी सोयाबीनची लागवड केली होती. सोयाबीनमध्ये गवत वाढल्याने गिराम यांनी कृषीकेंद्र चालकाच्या सांगण्यावरून सोयाबीनमध्ये साकेत नावाच्या तणनाशकाची फवारणी केली. त्यानंतर गवताबरोबर दोन एकरांतील सोयाबीन सुध्दा जळाल्याने गिराम यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत त्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांसह गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील शेतकरी सध्या उन्हाळी सोयाबीन लागवड करत आहेत. सिंधी काळेगांव येथील शेतकरी विष्णूपंत गिराम यांनी खरीप हंगामात तुरीची लागवड केली होती. परंतु परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे मोठा खर्च करून सूद्धा उत्पन्न घटले होते.

त्यामुळे तुरीचे पिक काढून दोन एक उन्हाळी फूले संगम कंपनीच्या सोयाबीनची लागवड त्यांनी केली. सोयाबीनला ठिबक सिंचनद्वारे पाणी देण्याची व्यवस्था केली. एक महिन्याचे सोयाबीन जोमात असताना शेतात काही प्रमाणात तण दिसू लागले. त्यामुळे गिराम यांनी ओळखीच्या कीटकनाशक विक्रेत्याच्या सांगण्यावरून सोयाबीनमधील तण नष्ट करण्यासाठी साकेत कंपनीच्या तणनाशकाची फवारणी केली. त्यानंतर दोन दिवसानतंर सोयाबीनचे झाडे जळू लागल्याचे गिराम यांच्या लक्षात आले.

त्यामुळे त्यांनी संबंधीत दुकानदाराला माहिती दिली. तेंव्हा विक्रेत्याने साकेत कंपनीच्या अधिकाऱ्यांचा क्रमांक दिला. मात्र, संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींनी समाधानकारक माहिती न देता काहीच केले नाही. उन्हाळ हंगामातील दोन एकरातील सोयाबीनच जळाल्याने गिराम यांनी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासह गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. संबंधित अधिकाऱ्यांसह तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे धाव घेतली. संबंधित अधिकाऱ्यांनी शेतात येऊन नुकसानीची पाहणी केली. दरम्यान, भरपाई देण्याची मागणी शेतकरी गिराम यांनी केली आहे.

दोन एकरामध्ये फुले संगम कंपनीच्या उन्हाळी सोयाबीनची लागवड केली होती. सोयाबीनमध्ये गंवत झाल्याने साकेत कंपनीच्या तणनाशकाची फवारणी कीटकनाशक विक्रेत्या दुकानदाराच्या शिफारशीवरून केली. त्यानंतरच दोनच दिवसात सोयाबीची चांगली झाडे जळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे दोन एकरातील पीक हातचे जाण्याची शक्यता आहे. उन्हाळी सोयाबीनसाठी २० ते २५ हजारांचा खर्च झाला आहे. संबंधित कंपनीने नुकसान भरपाई द्यावी. -विष्णूपंत गिराम, शेतकरी, सिंधीकाळेगाव