Connect with us

महाराष्ट्र

कोरोना काळातही नाशिकच्या द्राक्षांचा विदेशात डंका!

Published

on

grapes

नाशिक : कोरोना विषाणूसह ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे जग पुन्हा भीतीच्या छायेखाली असले तरी द्राक्ष उत्पादनात देशात अग्रेसर असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातून एकाच महिन्यात ४०० कंटेनरमधून उत्तम प्रतीच्या ५ हजार ३०२ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. युरोप, दुबई, श्रीलंका, बांगलादेश आदी ठिकाणी ही द्राक्ष निर्विघ्नपणे पोहोचली आहेत.

जागतिक बाजारपेठेसह देशाच्या विविध राज्यांत द्राक्षांची निर्यात यंदाच्या हंगामात सुरळीत सुरू असल्याने जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांनी कोरोनाच्या अफवांवर विश्वास न ठेवता, यंदाच्या हंगामात निर्भयपणे द्राक्षांची खरेदी विक्री करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला पाऊस होण्यापूर्वी ९० ते ११० रुपये किलो भावाने निर्यातीसाठी द्राक्षांची खरेदी सुरू होती. अवकाळीच्या दणक्यानंतर मात्र ७५ ते ८५ रुपयांपर्यंत निर्यातक्षम द्राक्षांचा भाव घसरला. अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातील ९० हजार हेक्टर क्षेत्राला बसला होता. अर्ली द्राक्षांच्या पट्ट्यात अडीच हजार एकरावर उत्पादन घेतले जाते. एकरी ७ ते ८ टन उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना गेल्या काही वर्षांपासून निसर्गाची साथ मिळत नसल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षी पावसाच्या दणक्यात द्राक्ष सापडल्याने डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत १ हजार टनापर्यंत निर्यात होऊ शकली होती. यंदा सोमवार, १० जानेवारीपर्यंत ३९९ कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली आहे.

बांगलादेशसाठी गेल्या वर्षी निर्यातदारांनी जागेवर ७५ रुपये किलो भावाने द्राक्षांची खरेदी केली होती. यंदा ४५ ते ६० रुपये प्रतिकिलो दर शेतकऱ्यांना मिळत आहे. यंदा अजूनही २५ ते ३० टक्के द्राक्ष बागांमध्ये आहेत. येत्या काही दिवसांत निर्यातीसाठी २० ते ३० टक्के द्राक्ष तयार होतील. अवकाळी पावसाच्या दणक्यात नुकसानीचे प्रमाण ३० ते ४० टक्क्यांपर्यंत पोचले असून, ४ जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात द्राक्ष निर्यात होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. जिल्ह्यातील द्राक्ष देशभर व विदेशातसुद्धा निर्यात होत असल्याने येथील द्राक्ष बाजारपेठेत येण्याची उत्सुकता ग्राहकांना कायमच असते.

देशात द्राक्ष पंढरी अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड, बागलाण, देवळा, दिंडोरी, नाशिक, मालेगाव तसेच इतर तालुक्यातील काही भागातून आत्तापर्यंत ५ हजार मेट्रिक टन अर्ली द्राक्षांची निर्यात करण्यात आली आहे. अर्ली द्राक्षांना अवकाळी पावसाचा दणका बसण्याचे यंदाचे चौथे वर्ष आहे. निसर्गाच्या विविध संकटांचा सामना करत द्राक्ष उत्पादकांनी जीवाचे रान करत यशस्वीपणे द्राक्षाबागा सांभाळल्या. मागील काही महिन्यांपासून द्राक्ष उत्पादकांसमोर गारपीट, अतिवृष्टी व कडाक्याची थंडीसह इतर आव्हाने होती. मात्र, तरीही हार न मानता शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा नेटाने फुलवल्याने द्राक्ष हंगाम जोरात सुरू झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात यंदाच्या द्राक्ष हंगामास दमदार सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या धास्तीला द्राक्ष उत्पादकांनी घाबरून न जाता, आपल्या द्राक्ष मालाची खरेदी-विक्री करावी. मालाच्या प्रतवारीनुसार उत्पादकांना तातडीने पेमेंट दिले जात आहे. – संतोष लोंढे, – द्राक्ष व्यापारी, पिंपळगाव बसवंत