×

कर्नाटक हापूस आणि अस्सल देवगड हापूस कसा ओळखाल? दोन्हीमध्ये नेमका काय फरक असतो?

कर्नाटक हापूस आणि अस्सल देवगड हापूस कसा ओळखाल? दोन्हीमध्ये नेमका काय फरक असतो?

पाडवा झाला की घरोघरी आंब्याच्या पेट्या यायला सुरुवात होते. फळांचा राजा वर्षातून २ महिनेच मिळत असल्याने त्याला देशातून आणि परदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी असते. आंबा म्हणजे कोकण. त्यातही देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस या दोन प्रमुख मागणी असलेल्या जाती. पण सध्या सगळ्याच बाबतीत फसवणूकीचे प्रमाण वाढले असल्याने आंबाही त्यापासून दूर नाही. इतर फळांच्या तुलनेत महाग असणारा हा आंबा सगळ्यांनाच आवडतो. पण देवगड हापूस किंवा रत्नागिरी हापूस म्हणून अनेकदा कर्नाटकी हापूस आंबा विकला जातो. त्यामुळे आपल्याला अस्सल आपल्या मातीत पिकलेले फळ चाखायलाच मिळत नाही. इतकेच नाही तर इतके पैसे देऊनही आपली फसवणूक होते आणि ते आपल्या लक्षातही येत नाही. म्हणूनच देवगड हापूस किंवा रत्नागिरी हापूस आणि कर्नाटकी हापूसमधला फरक कसा ओळखायचा हे समजून घ्यायला हवे. पाहूयात या दोन्हीतील फरक कसा ओळखायचा याच्या काही सोप्या चाचण्या…

१. रत्नागिरी किंवा देवगड हापूस आंबा ओळखण्याची सर्वात पहिली आणि सोपी चाचणी म्हणजे या आंब्याचे साल कर्नाटकी हापूस आंब्याच्या तुलनेत पातळ असते. कर्नाटक हापूसचे साल काही प्रमाणात जाड असते. त्यामुळे दोन्हीतील फरक ओळखायचा हा एक महत्त्वाचा मुद्दा असू शकतो.

२. कर्नाटकी हापूस हा बाजारात खूप लवकर दाखल होतो आणि तो उशीरापर्यंत असतो. तर रत्नागिरी किंवा देवगड हापूस आंबा साधारणपणे मोठ्यप्रमाणावर १५ एप्रिल ते ३१ मे याच कालावधीत बाजारात मिळतो. त्यामुळे या कालावधीच्या आधी बाजारात येणारे आंबे साधारणपणे कर्नाटकी हापूस असण्याची शक्यता जास्त असते. 

३. कर्नाटक हापूस आंब्याचा आकार काहीसा उभट असतो तर रत्नागिरी किंव देवगड हापूस गोलाकार असतो. त्यामुळे साधारण आकारावरुनही आपल्याला या आंब्याची पारख करता येते. 

४. कर्नाटक हापूस आंबा पिवळसर आणि खालच्या बाजूला हिरव्या रंगाचा असतो तर देवगड किंवा रत्नागिरी हापूस आंबा तोंडाशी केशरी किंवा लालसर असतो आणि खालच्या बाजूला पिवळसर असतो. 

५. रत्नागिरी किंवा देवगडचा हापूस आंबा काही दिवसांनंतर सुरकुततो. मात्र कर्नाटक हापूस आंबा तसाच कडक राहतो. तसच कर्नाटक हापूस आंब्याचे साल काहीसे चमकदार असते, तर रत्नागिरी आणि देवगडच्या आंब्याच्या सालाला कोणत्याही प्रकारची चकाकी नसते. 

६. कर्नाटक हापूस आंबा कापल्यानंतर पिवळट दिसतो तर देवगड आणि रत्नागिरी हापूस कापल्यानंतर गडद केशरी रंगाचे दिसतात. कर्नाटक हापूसला म्हणावा तितका सुगंध येत नाही पण रत्नागिरी आणि देवगड हापूसचा घमघमाट सुटतो.    

Post Comment