गतवर्षी प्रमाणे यंदाही मोहर ऐवजी पालवीच का येत आहे?
ऑक्टोबर महिन्यामध्ये वातावरणमधील उष्णता प्रचंड प्रमाणात वाढत आहे. या उष्णतेचा परिणाम आंबा कलमांना मोहोर येण्यास विलंब लावणारा ठरणार आहे. उष्णतेऐवजी आंबा कलमांना मोहोर येण्यासाठी गुलाबी थंडीची गरज आहे. यावर्षी कमी पाऊस, वाढलेली उष्णता यामुळे आंबा कलमांना मोहोर येण्याऐवजी पालवी येण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे यावर्षी मोहोर येण्याच्या वेळेला आंबा कलमांना पालवी येण्याचीच लक्षणे देवगड तालुक्यात दिसून येत आहे.
गतवर्षी मोहोर येण्याच्या वेळेला म्हणजेच नोव्हेंबर महिन्यामध्येच तालुक्यातील बहुतांश कलमांना बहारदार अशी पालवी आली होती. यामुळे गेल्यावर्षी २५ ते ३० टक्के उत्पादन एकूण राहिले होते. यावर्षी येथील बागायतदारांच्या उत्पादन समाधानकारक येणार म्हणून आशा पल्लवित होत असतानाच यावर्षी तालुक्यामध्ये कमी प्रमाणात पडलेला पाऊस व चालू ऑक्टोबर महिन्यामध्ये उष्णतेचा कहर यामुळे आंबा कलमांना मोहोर येण्यास पोषक वातावरण नाही. यावर्षीही मोहोर येण्याच्या वेळेला पालवी येण्याची लक्षणे दिसून येत आहेत. थंडी नसल्यामुळे यावर्षीही देवगड हापूस आंब्याचे उत्पादन अल्प प्रमाणात असल्याचे सध्याच्या वातावरणातील परिस्थितीनुसार दिसून येत आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत पाऊस असतो; मात्र यावर्षी परतीचा पाऊस देवगडमध्ये पडलाच नसल्यामुळे तसेच ऑक्टोबरची उष्णता प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे अशा वातावरणाच्या असमतोलपणाचा परिणाम आंबा मोहोर येण्यावर होत आहे. आंबा कलमे मोहोरण्यासाठी गुलाबी थंडीची गरज आहे.
नोव्हेंबर महिन्यामध्ये थंडीची चाहूल लागली तरच काही प्रमाणात आंबा कलमे मोहोरण्यास सुरुवात होऊ शकते; मात्र सध्या देवगड तालुक्यामध्ये काही आंबा कलमांना मोहोर येण्याऐवजी पालवी येण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दोन ते तीन वर्षांत मागे वळून पाहिले तर मोहोर येण्याच्या वेळेलाच म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस व नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला बहारदार अशी कलमांना पालवी येत आहे.
यापूर्वी चैत्र महिन्यामध्ये म्हणजेच मे महिन्याच्या दरम्यान व भाद्रपद महिन्यामध्ये आंबा कलमांना पालवी येण्यास सुरुवात होत असे; मात्र वातावरणातील असमतोलपणा निर्माण झाल्यामुळे आंबा कलमांना पालवी येण्याचा क्रम बदलू लागला आहे.
आंबा उत्पादन संपल्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस आंबा कलमांना पालवी आली तर नोव्हेंबर महिन्यामध्ये त्या कलमांना खात्रीशीररित्या मोहोर येतो. यासाठी कृषी विभागाने देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून गावागावांमध्ये मेळावे घेणे महत्त्वाचे आहे. यंदाचा हंगाम आता जवळ येत आहे. अशावेळी बदलत्या वातावरणामध्ये आंबा पीक टिकविणे ही आता बागायतदारांसमोरील दरवर्षीचीच कसोटी निर्माण झाली आहे.
कमी पाऊस आणि अतिउष्णतेचा फटका
देवगड तालुक्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजेच परतीचा पाऊस पडला नसल्यामुळे पुढे अवकाळी पाऊस पडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, असे काही येथील हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे यावर्षी अवकाळी पावसालाही येथील बागायतदारांना सामोरे जावे लागणार आहे. सर्वसाधारणपणे येथील बागायतदारांनी ऑगस्ट महिन्यामध्ये देवगड हापूस आंबा कलमांना कल्टार ही संजीवनी वापरली आहे. ही संजीवनी आंबा कलमांच्या मुळामध्ये वापरल्यापासून सुमारे दोन महिने यानंतर पावसाची गरज असते; मात्र यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये किरकोळ पाऊस व ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस पडला नसल्यामुळे कल्टार संजीवनी वापरलेल्या बागायतदारांना आता कमी पाऊस पडल्याचा फटका देखील सोसावा लागणार आहे.
मोहर, फळधारणेवर परिणाम
कमी पाऊस झाला असल्यामुळे कल्टार संजीवनी घातलेल्या आंबा कलमांना मोहर आल्यास हा मोहर टिकू शकत नाही. या मोहराची फळधारणेला घळ जास्त प्रमाणात असणार आहे. यामुळे अतिउष्णता, कमी पाऊस याचा विपरित परिणाम आंबा बागायतदारांना सोसावा लागणार आहे. याचे अनेक परिणाम आंबा कलमांच्या मोहर व फळधारणेवर होणार आहेत. यासाठी कृषी विभागाने संशोधन करुन बागायतदारांना मार्गदर्शन करुन प्रतिकूल परिस्थितीमध्ये बदलत्या वातावरणामध्ये आंबा पीक टिकविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा जगप्रसिद्ध देवगड हापूस आंब्याचे भवितव्य अधांतरी राहू शकते.
अयोध्याप्रसाद गावकर
देवगड
Post Comment