Shreyas Talpade: वाऱ्यासारखी पसरली श्रेयस तळपदेच्या निधनाची बातमी; अभिनेता झाला हैराण! पोस्ट लिहित म्हणाला…
Shreyas Talpade Death Hoax: अभिनेता श्रेयस तळपदे याच्याबद्दल सध्या एक मोठी बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे अभिनेता आता चांगलाच हैराण झाला आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये अभिनेत्याच्या मृत्यूची खोटी बातमी देण्यात आली होती. ही बातमी पाहून श्रेयसच्या चाहत्यांना धक्काच बसला. स्वतः श्रेयस तळपदेला या फेक न्यूजची माहिती मिळताच अभिनेत्याने इंस्टाग्रामवर याबद्दल एक लांबलचक पोस्ट केली. त्याने स्वतःच पोस्ट लिहित सांगितले की, तो जिवंत, आनंदी आणि निरोगी आहे. यासोबतच अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांचे आभारही मानले आहेत.
काय म्हणाला श्रेयस तळपदे?
श्रेयसने लिहिले की, ‘मी सर्वांना सांगू इच्छितो की मी जिवंत, आनंदी आणि निरोगी आहे. ज्या पोस्टमध्ये माझ्या मृत्यूचा दावा केला जात होता, त्या पोस्टची मला माहिती मिळाली. मला माहीत आहे की, विनोदाचे स्वतःचे महत्त्व आहे. परंतु, जेव्हा त्याचा गैरवापर केला जातो, तेव्हा खूप मोठे नुकसान होऊ शकते. विनोद म्हणून सुरू झालेल्या गोष्टीने आता प्रत्येकजण तणावात आहे आणि ज्यांना माझी काळजी आहे, विशेषत: माझ्या कुटुंबियांच्या भावनांशी असे लोक खेळ खेळत आहेत.’
श्रेयसने पुढे लिहिले- ‘मला एक लहान मुलगी आहे, जी दररोज शाळेत जाते. ती माझ्या तब्येतीबद्दल काळजीत असते आणि मला सतत प्रश्न विचारत राहते की, मी बरा आहे का? तिला हे सतत जाणून घ्यायचं असतं. या खोट्या बातम्या तिला अधिक दुःखी करतात आणि तिला असेच आणखी प्रश्न विचारण्यास भाग पाडतात. जे या प्रकारचा मजकूर टाकत आहेत, त्यांनी ते आताच थांबवावे आणि त्याचा काय परिणाम होईल याचा विचार करावा. काही लोक खरंच माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करतात आणि अशा प्रकारे विनोदाचा वापर होताना पाहून मनाला अतिशय वाईट वाटतं.’
कृपया हे थांबवा!
फक्त टार्गेट केलेल्या व्यक्तीलाच याचा फटका बसत नाही, तर त्याच्याशी संबंधित असलेले लोक जसे की, कुटुंब आणि विशेषत: लहान मुले ही परिस्थिती पूर्णपणे समजून घेऊ शकत नाहीत. कृपया हे थांबवा. हे असं कुणासोबतही करू नका. हे असं तुमच्या बाबतीत घडावं, असं मला अजिबात वाटत नाही. म्हणून कृपया संवेदनशील व्हा.’ ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता अभिनेता पूर्णपणे ठणठणीत आहे.
Post Comment