×

कोकणातील काही प्रसिद्ध किल्ले आणि त्यांची महती

colaba fort

कोकणातील काही प्रसिद्ध किल्ले आणि त्यांची महती

महाराष्ट्र तसे पाहता अनेक किल्ले आहेत. काही किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधले गेलेत तर काही त्यांच्या आधी. महाराष्ट्र भौगोलिक दृष्ट्या मोठा असल्याने त्याचे पाच विभाग पडतात. ते असे विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र. स्वराज्य निर्मिती वेळी राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी बऱ्याच किल्ल्यांची निर्मिती केली. स्वराज्याची निर्मिती करताना महाराजांच्या असे लक्षात आले की कोकण विभागाला फार मोठा असा समुद्र किनारा लाभला आहे आणि जर ह्या भागात वर्चस्व प्रस्थापित केलं तर शत्रूचा सामना करणे फारसे अवघड जाणार नाही.

कोकण प्रांताला ७२० कि. मी. लांबीचा समुद्रे किनारा लागला आहे. शिवाय एका बाजूला सह्याद्रीच्या पर्वतांच्या रांगाच रांगा आहेत. तर आज आपण याच कोकणातील काही किल्ल्यांची माहित ह्या लेखच्याद्वारे घेणंच प्रयत्न करूया.

किल्ले रायगड

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी, समुद्र सपाटीपासून २६९० फूट उंचीवर, सह्याद्री पर्वताच्या रांगात वसलेला, आणि इतिहासाचा साक्षीदार म्हणजेच किल्ले रायगड. आधी रैरी या नावानं हा किल्ला ओळखला जायचा, सन १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला राजे चंद्ररावजी मोरे यांच्या कडून जप्त करून घेतला. त्याचे हिरोजी इंदुलकरणाकडून नूतनीकरण करून घेतले आणि किल्ल्याला नवीन नाव दिल रायगड आणि स्वराज्याची राजधानी बनवली. याच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक झाला, तसेच हिरकणीच्या शौर्याची गाथा सांगणारा हिरकणी बुरुज रायगडावरच आहे आणि महाराजांची समाधी देखील याच किल्ल्यावर आहे.

मुंबईहुन फक्त १६६ कि. मी. असणारा हा किल्ला पर्यटकांचे खास आकर्षण बनला आहे. पावसाळ्यात खूप पर्यटक येथे खास ट्रेकिंग करण्यासाठी येतात. शिवाय सह्याद्रीच्या शिखरावर हा किल्ला असल्याने चहू बाजूला सृष्टी सौन्दर्याने नटलेला आहे. पर्यटकांसाठी खास आकर्षण म्हणजे गडावर जाण्यासाठी असलेली रोपवे.

किल्ले कुलाबा

सिंधुदुर्ग, जंजिरा प्रमाणेच हा देखील एक जलदुर्ग आहे. कुलाबा हा रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या समुद्रामध्ये स्थित आहे. जंजिरा मिळवण्यात अपयश येत असल्याने महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली होती. तसाच एक जलदुर्ग आणि नौदलासाठी प्रमुख स्थळ उत्तर कोकणात देखील असावे या महत्वकांक्षेने महाराजांनी १९ मार्च १६८० मध्ये अलिबागच्या समुद्रकिनाऱ्या नजीक कुलाबा किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे काम पूर्ण करून घेतले.

आज हा किल्ला पर्यटकांचे खास आकर्षण बनला आहे. मुंबई पासून जवळ असल्यामुळे येथे फार गर्दी पाहावयास मिळते. विशेष म्हणजे जेव्हा ओहोटी असते तेव्हा तुम्ही चालत चालत या किल्ल्यावर पोहचू शकता. तसेच पाणी असताना किल्ल्यावर नेण्यासाठी फेरी बोटस सुद्धा आहेत.

किल्ले रेवदंडा

रेवदंडा किल्ला एका पोर्तुगीजाने बांधला त्यांचं नाव होत कॅप्टन सोज. १५२४ साली या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले. हा किल्ला कुंडलिका नदी वर स्थित आहे. पोर्तुगीजांनी ह्या किल्ल्यावर जवळ जवळ पावणे तीनशे वर्ष राज्य केले. १८०६ मध्ये मराठ्यांनी ह्या किल्ल्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. १८१८ मध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांना हरवून रेवदंडा हिसकावून घेतला.

मुरुड आणि अलिबाग याच्या मधोमध असल्यामुळे बरेच पर्यटक येथे येतात.

किल्ले कोर्लाई

हा किल्ला देखील अलिबाग मध्ये येतो, या किल्ल्याचे बांधकाम देखील एका पोर्तुगीजाने केले आहे. पण सुरुवातीला या किल्ल्याची मालकी ही अहमदनगर सल्तनतची होती. बांधकाम झाल्यावर पोर्तुगीजानी किल्ल्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला पण ते अपयशी ठरले. अतिशय भव्य आणि जगातील इतर किल्ल्यांइतकाच मजबूत असे ह्या किल्ल्याचे वर्णन केले जाते. १५९४ मध्ये पोर्तुगीजांनी १५०० सैनिकांसहित १५०० स्थानिकांना घेऊन कोर्लाई गडावर आक्रमण केले आणि किल्ल्या जिंकून घेतला. पण झालेला युद्धामध्ये पोर्तुगीजांचे देखील फार नुकसान झाले आणि किल्ल्याच्या संरक्षणासाठी त्यांच्याकडे पुरेसे सैन्य नसल्याने त्यांनी किल्ल्याला उध्वस्थ केले आणि फक्त मधला भाग शिल्लक ठेवला. त्यामुळेच जर आज तुम्ही या किल्ल्याला भेट दिली तर तो तुम्हाला एका डोंगरासारखा वाटेल.

किल्ले खांदेरी

कान्होजी आंग्रे बेट असे या किल्ल्याचे नामकरण १९९८ मध्ये करण्यात आले. हा देखील एक जलदुर्ग आहे. हा किल्ला अलिबाग नजीक ठालच्या समुद्रात वसाला आहे. त्याच्या नजीक उणेरी किल्ला आहे आणि म्हणूनच यांचा उल्लेख उणेरी खांदेरी असा केला जातो. या किल्ल्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली होती, कारण सिद्दी ला हरवून जंजिरा मिळवण्याची त्यांची आकांशा होती. मराठा आणि सिद्दी मध्ये या ठिकाणी खूप लढाया झाल्या. १८१८ मध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला घेतला आणि काही वर्षांनी म्हणजेच १८६७ साली तेथे एक इमारत बांधून त्यावर दीपगृह उभारला. आजही ती इमारत आणि दीपगृह सुस्थित आहेत आहे पर्यटकांचे एक आकर्षण केंद्र बनले आहेत.

किल्ले मुरुड – जिंजिरा

अभेद्य, अजिंक्य अशी ख्याती असलेला किल्ले मुरुड जंजिरा हा सगळ्यात भक्कम असलेला जलदुर्ग आहे. मुळात: हा किल्ला कोळ्यांच्या मुख्याने १५ व्या शतकात बांधला होता. त्यानांतर अहमदनगर निजामाच्या सेनापती पीर खान याने तो ताब्यात घेतला. अंबर मलिक याने किल्ला आजून मजबूत केला. नंतर एबीसीसीनिआतून (आफ्रिका) आलेला सिद्दीकडे अहमदनगरच्या राजाने तो सोपवला. किल्याचे बांधकाम अतिशय मजबूत होते शिवाय गडावरील तोफा २ कि. मी. पर्यंत लक्ष्यावर मारा करायच्या त्यामुळे किल्ल्याच्या जवळपास देखील येण असंभव होत. छत्रपती शिवाजी महाराजांसहित त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी जिंजिरा जिंकण्याचा खूप प्रयत्न केला पण ते यशस्वी नाही झाले. शिवाजी महाराजांनंसहीत पोर्तुगीज, ब्रिटिश यांनी देखील हा किल्ला जिंकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराजांनी देखील प्रयत्न केले पण जंजिरा आणि सिद्दी अजिंक्यच राहिले. जेव्हा संभाजी महाराज अपयशी ठरले, तेव्हा त्यांनी जंजिराच्या उत्तरेस ९ कि. मी. अंतरावर पद्मदुर्ग किल्ला बांधला.

चहुबाजूने खाऱ्यापाण्याने वेढलेला असून देखील किल्ल्यावर दोन गोड्यापाण्याचे साठे आहेत. आजही हा किल्ला मजबूत स्थिती मध्ये समुद्रात दिमाखात उभा आहे. ह्या किल्ल्याच्या ख्यातीमुळे हा किल्ला पर्यटकांचे आकर्षण बनला आहे.

किल्ले बाणकोट

या किल्ल्याला हिम्मतगड, फोर्ट व्हिक्टोरिया या नावाने देखील ओळखले जाते. बाणकोट किल्ला रत्नागिरीतील दापोली येथे स्थित आहे. सन १५४८ मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला बिजापूरच्या मोहम्मद आदिलशाह कडून काबीज केला. सन १७०० मध्ये मराठा नौदलाचे प्रमुख असलेल्या कान्होजी आंग्रेयांनी पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला आणि किल्ल्याला हिम्मतगड असे नाव दिले. पेशव्यांच्या फितुरीमुले ब्रिटिशांकडून होणाऱ्या हल्ल्यासमोर मराठ्यांनी  शरणागती पत्करली. पुढे ब्रिटिशांची या किल्ल्याचे फोर्ट व्हिक्टोरिया असे नामकरण केले.

किल्ले सुवर्णदुर्ग

बाणकोट प्रमाणे सुवर्णदुर्ग ही रत्नागिरी जिल्ह्यात येतो, हा देखील एक जलदुर्ग आहे. सन  १६६० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अली आदिलशाह द्वितीय ला हरवून किल्ला आपल्या ताब्यात घेतला. हा किल्ला स्वराज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असा होता. यामागचे मुख्य कारण म्हणजे युरोपातून येणाऱ्या ब्रिटिशांपासून सौरक्षण करण्यासाठी. या किल्ल्याला मराठ्यांमध्ये मानाचं प्रतीक मानलं जात होत म्हणून याला सुवर्णदुर्ग असे नाव महाराजांनी दिले. पाण्यातला शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठी नौदलाचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांचा जन्म देखील याच गडावर झाला. शिवाजी महाराजांच्या नौदलातील अतिशय महत्वाचा हा गड होता. येथे जहाज बांधणी देखील व्हायची.

किल्ले गोपाळगड

गोपाळगडाला अंजनवेलचा किल्ला यानावाने देखील ओळखलं जात. तस ह्या किल्ल्याच्या निर्मितीचा  इतिहासत उल्लेख सापडत नाही. हा किल्ला बिजापूरच्या मोहम्मद आदिलशाह कडे होता तो १६६० च्या दाभोळ खाडीच्या युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. सुवर्णदुर्गाप्रमाणे येथे ही जहाज बांधणी शिवाजी महाराजांनी चालू केली होती.

किल्ले जयगड

गणपतीपुळे या प्रसिद्ध देवस्थानापासून १४ कि मी. अंतरावर जयगडचा किल्ला आहे. हा किल्ला देखील आदिलशाहच्या ताब्यात होता. त्यांनी तो संगमेश्वराच्या नाईकांना दिला. नाईकांकडे ७ – ८ गाव होते व ६०० मावळे असून देखील त्यांनी एकत्रितआलेल्या बिजापूरच्या राजाचा आणि पोर्तुगीजांचा पराभव केला. बालाजी विश्वनाथ पेशव्यांनी, आंग्रेंना स्वाधीन केलेल्या दहा किल्ल्यांपैकी जयगड हा एक होता.

किल्ले रत्नदुर्ग

हा देखील किल्ला सन १६७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाह कडून जिंकून घेतला. त्यानांतर धोंडू भास्कर यांच्या नेतृत्वाखाली १७९० मध्ये किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. या किल्ल्याच्या तीन बाजूस पाणी आहे. रत्नागिरी शहरात असल्यामुळे हा किल्ला पर्यटकांचे खास आकर्षण बनला आहे. किल्ल्यामधील भगवती देवीचं मंदिर पण देखण्यासारखे आहे.

किल्ले पूर्णगड

बाकीच्या किल्ल्यांच्या तुलनेत हा किल्ला तास नवीनच. या किल्ल्याची निर्मिती नौसेनाधिपती सारखेल कान्होजी आंग्रे यांनी १७२४ मध्ये केली. पर्यटनाच्या दृष्टीने रत्नागिरीमधील हा एक महत्वाचा किल्ला आहे.

किल्ले सिंधुदुर्ग (Sindhudurg Fort)

जंजिरा हा समुद्रामध्ये असल्यामुळे, स्वराज्याच्या दृष्टीने तो अत्यंत महत्वाचा किल्ला होता. त्यामुळे कोकण किनार पट्टीवर नौदल उभारता आले असते आणि स्वराज्य अधिक भक्कम झाले आसते, कारण समुद्री मार्गाने युरोपातील घुसपेठी – पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रेंच हे स्वराज्यात घुसू पाहत होते. म्हणूनच सन  १६५९ पासून छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी तीन वेळा स्वारी केली पण तीनही वेळा महाराज पराभूत झाले. जंजिरा सारखा अरबी समुद्रात किल्ला पाहिजे, या महत्त्वाकांक्षेने महाराजांनी कोकण किनार पट्टी वर पाहणी चालू केली. तेव्हा सिंधुदुर्गातील मालवण येथे अरबी समुद्रात एक ‘कुरटे’ नावाचं बेट आहे, हे समजलं. महाराजांनी तातडीने जागेची पाहणी केली आणि किल्ला बांधणीला सुरुवात केली. सन १६६४ मध्ये किल्ल्याचे काम पूर्ण झाले आणि त्याला सिंधुदुर्ग असे नाव देण्यात आले. जंजिराच सारखा मालवण किल्ला देखील पूर्णतः पाण्यात आहे. ह्या किल्ल्याच्या आतमध्ये देखील गोड्या पाण्याचे साठे आहेत.

किल्ले विजयदुर्ग

सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर असणारा हा सगळ्यात जुना किल्ला आहे. या किल्याची निर्मिती शिलाहार राजघराण्यातील राजा भोज यांच्या कारकिर्दीत ११९३ ते १२०५ मध्ये झाली. सिंधुदुर्गातील गिर्ये गावात असल्यामुळे या किल्ल्याला गेरिया हे नाव होते. नंतर हा किल्ला आदिलशाह च्या ताब्यात होता. सन  १६५३ मध्ये मराठा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहचा पराभव करून हा किल्ला जिंकला आणि पुढे विजयदुर्ग असे नामकरण केले.

सुरुवातीला हा किल्ला फक्त ५ एकर एवढ्या क्षेत्रामध्ये होता आणि चारही बाजूला पाणी होते. एकाबाजूने टोक जुळवून रास्ता तयार करण्यात आला. महाराजांनी या किल्ल्याचे क्षेत्र वाढवून १७ एकर केले त्यामुळे आता किल्ल्याच्या फक्त तीन बाजूस पाणी आहे. हा फक्त दुसरा किल्ला आहे जेथे शिवाजी महाराजांनी स्वतः भगवा फडकविला. पहिला गड हा तोरणा आहे. ह्या किल्ल्याचे आजून एक वैशिष्ट म्हणजे भुयारी मार्ग जो गावामध्ये धुळप राजवाड्यात बाहेर पडतो.

सिंधुदुर्गाच्या पर्यटनातील हा एक महत्वाचा किल्ला आहे. वर्षभरात येथे मोठ्याप्रमाणात पर्यटकांची गर्दी असते. विशेष करून १८ ऑगस्ट च्या हेलियम डे दिवशी.

Post Comment