Connect with us

सिंधुदुर्ग

आमदारांकडून जनतेला खोटी आश्वासने, ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम…

Published

on

केनवडेकर, चिंदरकर यांचा आरोप ; येत्या निवडणुकीत होणाऱ्या पराभवामुळेच ठाकरे गटाची टिवटीव…

मालवण, ता. ०९ : दोन टर्म आमदार असतानाही मतदारसंघाला विकासकामामध्ये मागे नेण्याचे काम वैभव नाईक यांच्या अपयशी कारभारामुळे झाले. मागील दोन वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात तर राज्या बरोबर जिल्ह्याचा विकासही ठप्प झाला.

जनतेला खोटी आश्वासने व ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम ठाकरे गट व आमदार नाईक यांनी केले. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता यांना घरी बसवणार हेच चित्र सगळीकडे दिसून येत आहे. त्यामुळे हतबल झालेल्या तालुका ठाकरे गटाची टिवटीव सुरू आहे. अशी टीका भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

आमदार नाईक आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न आठ दिवसात त्यांनी तीन वेळा केला. मात्र फडणवीस यांनी भेट दिली नाही. त्यामुळे आमदार नाईक अधीकच अस्वस्थ बनले आहेत. त्यांना पराभव स्पष्ट दिसू लागला आहे अशी टीका तालुकाध्यक्ष चिंदरकर यांनी यावेळी केली.

दोन दिवसांपूर्वी ठाकरे गट तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी राणे बंधूवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, माजी नगरसेवक गणेश कुशे, आप्पा लुडबे, प्रमोद करलकर, मोहन वराडकर, विलास मुणगेकर, नंदू देसाई, बाबू कासवकर, बाबू कदम, दादा कोचरेकर, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष ललित चव्हाण, राकेश सावंत, निशय पालेकर, गौरव लुडबे, निनाद बादेकर, राज कांदळकर, चंद्रकांत मयेकर, राजा मांजरेकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. केनवडेकर म्हणाले, हरी खोबरेकर यांनी शहर व तालुक्यात रखडलेली विकासकामे पहावीत. खड्डेमय रस्ते पाहावेत. आमदार नाईक यांनी जनतेला दिलेल्या खोट्या आश्वासनांचा विचार करावा. कुडाळ मालवण भाजप प्रभारी निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करता त्यांचे दातृत्व व विकास कामांची धमक व उंची पहा.

निलेश राणे यांनी सहा महिन्यात गरीब गरजू रुग्णांना ३२ लाखाची मदत केली. त्यांचे सेवाकार्य अखंडित चालू असते. त्याचा विचार करावा. ठाकरे गटातील कोणाला हे जमेल का ? केवळ खोट्या बाता नेत्यांना खुश करण्यासाठी सुरू असलेली बडबड थांबवा. असेही केनवडेकर म्हणाले.

निलेश राणे यांनी वर्षभरात सुमारे १२ कोटी निधी शासन माध्यमातून शहरासाठी आणला. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून निलेश राणे यांनी कोट्यवधी निधी तालुक्यात आणला.

आमदार नितेश राणे यांनीही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युती शासन माध्यमातून कोट्यवधी निधी मतदारसंघात आणण्याचा सपाटा लावला आहे. विकास हेच भाजपचे व्हिजन आहे. त्यामुळे विकासकामे अथवा जनतेला अपेक्षित कार्य यात कोणत्याही प्रकारे स्पर्धा, शक्ती प्रदर्शन करायला आम्ही तयार आहोत.

मात्र भाजपच्या गतिमान विकासाची स्पर्धा करणे शक्य नसल्याने टीकाटिप्पणी करण्याचे काम ठाकरे गटाचे नेते म्हणवणारी मंडळी करत आहेत.

आमदार ठेकेदारांना पाठीशी घालतात. शहर भुयारी गटार योजना ठेकेदाराने जनतेची फसवणूक केली. आता तर दोन वर्षे काम नसताना ठेकेदाराला पैसे देण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी पुढाकार घेतला.

ज्या मशीन आल्या नाहीत त्यासाठी ठेकेदाराला दीड कोटी दिले ते कोणी दिले? ठेकेदाराला पालिकेकडून जावई असल्यासारखी वागणूक देण्यात आली. मात्र या कामाची चौकशी व्हावी यासाठी निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आमचा शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. तक्रारही करण्याची कार्यवाही सुरू आहे. ठाकरे गटाने यावर बोलावे असे आव्हान केनवडेकर यांनी दिले.

वाळू उपसा होड्या मागे २५ हजार मागणी ठाकरे गट पदाधिकारी करत असल्याचा गंभीर आरोप धोंडी चिंदरकर यांनी यावेळी केला. याबाबत पुरावे असल्याचेही चिंदरकर यांनी सांगितले आहे. तसेच खाडी पात्रात सुरू असलेले वाळू उत्खनन थांबले पाहिजे. असेही आवाहन चिंदरकर यांनी या निमित्ताने उत्खनन करणाऱ्यांना केले. प्रशासन योग्य ती कारवाई करेल. गणेश चतुर्थी उत्सवानंतर नियमानुसार वाळू व्यवसाय सुरू होण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे चिंदरकर यांनी सांगितले.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *