ब्लॉग

गोव्याला असलेला सर्वोत्तम पर्याय म्हणजे कोकणातील सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग हा तर पर्यटनाचा जिल्हा आहे. इथे पाहण्यासाठी, फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. राज्यातील पर्यटकांनप्रमाणे देशातील, अगदी परदेशातील पर्यटकही येथे येतात. अगदी आठवड्यात पंधरा वीस दिवसांची टूर काढतात. जे लोक नेहमीच गोव्याला जाऊन कंटाळी आहेत त्यांच्यासाठी सिंधुदुर्ग हा उत्तम पर्याय आहे. कोकणच नाव घेतलं की डोळ्यासमोर येतो हापूस आंबा आणि आंब्याचा गाव म्हणून प्रसिद्ध असलेलं देवगड.

देवगड हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तालुका आहे. कोकणातल्या समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य तर पाहतच बसावसं वाटतं. पांढरीशुभ्र वाळू, अगदी समुद्राचा तळ दिसेल असं नितळ पाणी, ना कुठल्याही प्रकारची अस्वच्छता अथवा माणसांची फारशी वर्दळ, त्यामुळे ज्याला शहराच्या धकाधकीच्या जीवनापासून काही क्षण निसर्गाच्या सानिध्यात निवांत घालवायचे असतील त्याने इथे हमखास यावं.

नारळीच्या बागा दिसतात तसेच आंब्याच्या देखील बागा आहेत. याच समुद्रकिनारी आपल्याला पवनचक्क्या दिसतात, मोकळा समुद्रकिनारा आणि वाहणारी हवा यामुळे या पवनचक्क्याना पोषक नैसर्गिक असे वातावरण मिळालय. देवगडच्या भागाला या पवनचक्क्यांमुळे विद्युत पुरवठा देखील होतोय. देवगडचा समुद्रकिनारा जसा पाहण्याजोगा आहे तसंच इथलं विमलेश्वर आच देऊळ सुद्धा.

अशी आख्यायिका सांगितली जाते की पांडवांनी एकाच रात्रीत एका जांभ्या दगडात हे विमलेश्वर मंदिर कोरलय. निसर्ग आणि कल्पकता आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजेच महादेवाचे मंदिर. कोकणात अनेक प्राचीन मंदिर आहेत त्यातलंच हे एक मंदिर म्हणजे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

शांत आणि निसर्गरम्य वातावरणात श्रीदेव मल्लेश्वर म्हणजे शंकराचं असलेलं हे देऊळ. दोन्ही बाजूला गर्द झाडी मागे उंच डोंगर, समोर बारमाही वाहता ओढा. अगदी चित्रांमधला वाटावं असं ठिकाण. पण कोकणातल्या इतर मंदिरासारखी त्याची वास्तू कलाम मुळीच नाही. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका संपूर्ण जांभ्या दगडात काम करून या मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. काही स्थानिकांच्या मते हे मंदिर पांडवकालीन आहे.

प्रवेश द्वाराच्या दोन्ही बाजूला दगडात कोरलेले हत्ती दिसतात. विमलेश्वर मंदिराचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यात दगडी शिवलिंगावर्ती अभिषेक केलेलं पाणी जमिनीमध्ये कुठे लुप्त होत याचा शोध अद्याप कुणालाच लागलेला नाही.

मंदिराच्या परिसरात उजव्या हाताला गणपती बाप्पांचे छोटेसे मंदिर आहे आणि त्याच्याच शेजारी एक गुंफा आहे. त्याला काळभैरव गुंफा असे म्हणतात. मुख्य वाटेच्या डाव्या बाजूला काळ्या दगडात कोरलेली शिल्प रांगेत उभी करून ठेवलेली आढळतात. देवगड मधील या विमलेश्वराच्या मंदिरात दर सोमवारी भाविक येऊन अभिषेक करतात, तर महाशिवरात्रीला येथे महा अभिषेक होतो.

अशीच श्रद्धा, इथल्या लोकांची देवगडच्या गिर्ये येथील श्रीदेव रामेश्वर प्रति आहे. तळेरे विजयदुर्ग मार्गावर, विजयदुर्ग पासून तीन किलोमीटर अंतरावरचं हे गिर्ये गावचे सुप्रसिद्ध श्री देव रामेश्वराचे मंदिर आहे. मंदिर साधं कौलारू असून त्याच्यासमोर पाच दीपमाळा आहेत. रामेश्वर देखील शंकराचेच मंदिर आहे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात तुम्हाला शिवलिंग आढळेल.

मंदिराचं बांधकाम कोकणातील इतर मंदिराप्रमाणेच आहे. मंदिरातील कलाकुसरीच काम प्राचीन संस्कृतीचा साक्षात्कार आहे. प्रशस्त बांधणी प्राचीन चित्रांची आरस, ही तर मंदिराच्या भव्यतेत भरच घालते. रामायणातील विविध प्रसंगांच्या तसेच कोकणातील दशावतारांच्या चित्रांचे रंग उडून गेलेत तर काहींचे अजूनही दिसत आहेत. चित्रकलेचे शिक्षण न घेतलेल्या त्या काळातील लोकांची ही कला पाहातच राहावीशी वाटते.

महाशिवरात्रीला मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. या मंदिराच्या परिसरात उजव्या हाताला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे सरखेल संभाजी आंग्रे यांची समाधी बांधलेली आहे. ते शिवभक्त होते. रामेश्वर मंदिर भोवतालची दगडी फरशी, संभाजी आंग्रे यांनीच बांधून घेतली होती. पुरातन काळातील साक्षात्कार देणारे देखावे, चहुबाजूने उत्तुंग कडा, ऐतिहासिक दस्तावेज, पावला – पावलावर दिसणारे निसर्गसौंदर्य यामुळेच प्रत्येकाचं या भागाशी वेगळच नातं जुळतं.

सिंधुदुर्गातल्या कुडाळ मधला पिंगुळी परिसर म्हणजे चित्रकलेतील एका मोठ्या कलाकाराचे माहेरघर आहे. गर्द हिरवळ, निळाशार समुद्र, धार्मिक रूढी परंपरा ही नुसती कोकणची ओळख नाही आहे. तर कोकणची एक वेगळी ओळख सुद्धा आहे, ती म्हणजे ठाकर आदिवासी लोककला. या कलाअंगणामध्ये 400 ते 500 वर्षांपूर्वीची चित्रकथी जपून ठेवलेली आहे. त्याचबरोबर या अंगणात कळसूत्री बाहुल्यांचे खेळ ही आपल्याला पहायला मिळतात.

प्राचीन काळी मनोरंजनाचं कुठलंही साधन उपलब्ध नव्हतं तेव्हा एका जमातीचे लोक गावोगावी चित्र कथेच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करायचे. तीच ही चित्रकथी लोककला. याच चित्रकथीच्या माध्यमातून रामायण-महाभारत यासारख्या धर्मग्रंथांमधल्या कथा लोकांपर्यंत चित्राच्या माध्यमातून, तेही सोप्या पद्धतीने पोहचविले जाऊ लागले.

रामायण महाभारतामधील तत्त्वज्ञान लोकांना सांगितलं जाऊ लागलं. असं म्हटलं जातं की, श्रीराम, सीता आणि लक्ष्मण वनवासात असताना दंडकारण्यात आले होते. त्यावेळी चित्रकथीच्या कलाकारांनी त्यांना पाहिलं आणि ती चित्र त्यांनी जपून ठेवल्याचे स्थानिक कलाकार सांगतात.

आकर्षक रंगसंगती, कथा नवरूप बाहुल्यांचे हावभाव, कपडे, दागिने आणि विविध मुद्रा यामुळे चित्रकथी लोकप्रिय होत गेली. पारंपारिक पद्धतीने ही कला या लोकांमध्ये आली आणि त्यांनी ती जोपासली, त्याचा प्रसार आणि प्रचारही केला.

कळसूत्री बाहुल्यांचे खेळ संध्याकाळी सुरू होतात. गणेश वंदनेने खेळाला सुरुवात होते. अनेकदा ते रात्रभरही चालतात. टाळ-मृदुंग, घुंगरू, पेटीचा वापर करून कथा रंगवून सांगितली जाते. दशावतार, कालिया मर्दन, सीता स्वयंवर अशा विविध कथा हमखासपणे सांगितल्या जातात. ती सांगण्याची पद्धतही रंजक असते.

कोकणात नाथ संप्रदायाचा चांगलाच प्रसार झाला आहे. नाथ संप्रदायातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेला मच्छिंद्र डोंगर प्रसिद्ध आहे. “नवनाथ कथासार” या ग्रंथातल्या सहाव्या अध्यायात, कुडाळच्या ज्या भूमीचा उल्लेख आढळतो ते क्षेत्र मच्छिंद्रनाथ तपोभूमी म्हणजेच देवाचा डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे. म्हटलं जातं की नवनाथांचे आद्यनाथाचार्य मच्छिंद्रनाथ यांनी याच ठिकाणी कालिकादेवीशी युद्ध केलं होतं

मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ नजीक मच्छिंद्रनाथांची तपोभुमी असलेला हा देवाचा डोंगर दिसतो. देवाच्या डोंगराकडे जाणारा मार्ग दाखवणारा फलक येथे लावलेलं आहे. थंड वातावरण साथीला निसर्गरम्य वातावरण पाहून मानसीक समाधान मिळतं. त्याच कारणांनी मच्छिंद्रनाथांनी येथे तपश्चर्या करण्याचे ठरविले. असं सांगितलं जातं मच्छिंद्रनाथांनी याच भूमीवर कालिकादेवीशी युद्ध केलं होतं आणि शाबरी विद्या संपन्न करून घेतली होती.

देवाच्या डोंगरावर जंगली झाडांची कमी नाही. कणकेच्या बेटा प्रमाणे माडाच्या बागाही येथे दिसतात. निसर्गाचं वरदान असावं सहा मच्छिंद्रनाथाचा परिसर. पंचक्रोशीतील सगळ्या मंदिरांचे मुख्य स्थानानंचा हा डोंगर आहे.

दत्त संप्रदायाला “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” हा श्रेष्ठ मंत्र देणारे वासुदेवानंद सरस्वती महाराज अर्थातच टेंबेस्वामी महाराज यांचं हे जन्मठिकाण. याठिकाणी टेंबे स्वामींनी वास्तव्य आणि धर्म साधना केली. त्यामुळे अनेक भक्तांचे हे श्रद्धास्थान आहे.

वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराज यांचं सावंतवाडी येथे असलेले मंदिर हेही कोकणातील भाविकांनी नेहमी गजबजलेलं असतं. टेंबे स्वामींच्या जन्मस्थळी हे मंदिर वसलं आहे. अत्यंत शांत निसर्गरम्य असाच आसपासचा परिसर. मंदिर तसं साधेच आहे, मंदिरात प्रवेश केला की आत मध्ये टेम्बे स्वामींची मूर्ती दिसते. त्यांच्यामागे दत्तगुरूंची मूर्ती आहे. या परिसरात लोक ध्यान करतात.

येथूनच जवळ असलेल्या डोंगरात एक गुहा आहे, तिथे स्वामी ध्यानधारणेसाठी बसायचे. स्वामींच्या जन्मस्थाना पासून अवघ्या दहा ते पंधरा मिनिटं अंतरावर ही गुहा आहे. तिथे जाण्याकरता अवघड पायवाट आहे. झाडाझुडपातून मार्ग काढत तिथे जावं लागतं. डोंगर माथ्यावर पण भव्य शीला आहेत. एकमेकांना आधार देणाऱ्या शीला मधूनच गुहेमध्ये जाण्यासाठी दरवाजा तयार झाला आहे. गुहेमध्ये एक देवारा असून त्याच्यामध्ये टेंबे स्वामींची मूर्ती ठेवली आहे. या गुहेमध्ये एक पणती २४ तास तेवत असते.

कोकण म्हटलं की, समुद्राशी अतूट असं नातं आलं. त्यामुळे हे निसर्ग सौंदर्य समुद्रकिनारे बारा महिने पर्यटकांनी भरून गेलेले असतात. त्यातलाच एक समुद्र किनारा म्हणजे शिरोडा यातील वेळागर बीच. देशातील नाहीतर परदेशी पर्यटकांची संख्यादेखील येथे लक्षणीय असते. येथील समुद्रकिनारा म्हणजे सुंदर पांढऱ्या शुभ्र वाळूची शाल लपेटलेला. येथे येऊन सीगल पक्षाचे दर्शन नाही घडलं तर नवलच. डॉल्फिन पाहण्याची मजा देखील इथे लुटता येते. समुद्रकिनारी सुरूच बन आहे. वाळूवरती सुरुची पाने गळून एक मखमली चादर निर्माण झालेली दिसते.

सुरूच बन आणि दाट धुकं आणि त्यातला सूर्योदय शांत समुद्रकिनारा आणि त्याचप्रमाणे खाडीचा आणि समुद्राचा संगम या विहंगमय दृश्यांचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर देवगड तालुक्यातील तांबळडेग या गावाला नक्की भेट द्या. तांबळडेग हे समुद्रकिनाऱ्यावरती वसलेलं आणि तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेलं छोटसं गाव आहे. गावाच्या एका बाजूला पांढऱ्याशुभ्र वाळूचा समुद्रकिनारा असून एका बाजूला अन्नपूर्णा खाडी आहे.

महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांना पर्यटन स्थळे म्हणून मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात पहिला पर्यटन जिल्हा मिळवण्याचा मान सिंधुदुर्गचा आहे. पण म्हणावं तेवढं या जिल्ह्याचा विकास पर्यटनाच्यादृष्टीने झालेला नाही. गेल्या काही वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा हा खऱ्या अर्थाने, पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपास येत आहे.

लेखामध्ये नमूद केलेल्या स्थळांपेक्षा अशी अनेक विहंगमय, सुंदर ऐतिहासिक वारसा लाभलेली बरीच स्थळे या सिंधुदुर्ग नगरीत आहेत ती सर्व एका लेखाच्या माध्यमातून मांडणे थोडे कठीण आहे.

Tags
Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close