×

सेंद्रिय शेती म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे फायदे

सेंद्रिय खत

सेंद्रिय शेती म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे फायदे

आपल्या भारत देशाला कृषिप्रधान देश म्हणून संपूर्ण जगात ओळखले जाते. अलीकडे भारताने कृषीतंत्रज्ञानात आणि संशोधनात खूप चांगल्या प्रकारे प्रगती केली आहे.

अगदी पुरातन काळापासून आपण जमिनीला भूमातेचा दर्जा दिलेला आहे. शाळेपासूनच आपल्यावर असे संस्कार आहेत की, आपल्याला जन्म देणारी एक माता व दुसरी आपण ज्या मातीत जन्म घेतला ती आपली दुसरी माता.

यामातीमध्ये असंख्य जीवजंतू वास्तव्य करून रहातात म्हणून तिला सजीवाचाही दर्जा दिलेला आहे. अशा या भूमातेची सेवा करणारा उभ्या जगाचा पोशिंदा शेतकरी अगदी अलीकडे पर्यंत सेंद्रिय शेती करत होता. पण आज आधुनिकीकरणाचे नावाखाली फार मोठया प्रमाणात रासायनिक शेती केली जाते. 

आजार दूर करण्यासाठी – तुळशीची पाने कसे बरे करतील तुमचे आजार ?

सेंद्रिय शेती म्हणजे काय?

आपला भारत देश हा शेती प्रधान देश असून सत्तर टक्के लोक शेती करतात. तरी सुद्धा आज आपल्याला अन्नधांन्याची परदेशातून आयात करावी लागते. याचे कारण शोधायचे म्हटल्यास असे म्हणता येईल की याला जबाबदार आहे आजची रासायनिक शेती.

रासायनिक खतांचा बेसुमार वापर केल्याने जमिनीचा कस कमी होतो आहे परिणामी मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे. 

या पूर्वीचा शेतकरी कशा पध्द्तीने शेती करत होता ? त्यावेळी कुठे होती ही रासायनिक खते ? या सर्वाचा विचार होणं गरजेचं आहे. म्हणूनच नैसर्गिक साधनांचा वापर करून तयार केलेल्या खताचा वापर करून केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती

रासायनिक खतांचा वापर का टाळावा ?

रासायनिक खत म्हणजे जमिनीला देतअसलेले विषच आहे ते. अति प्रमाणात, वारंवार, जास्त पिक घेण्याच्या हव्यासापोटी रासायनिक खतांचा बेसुमार वापर होतो, परिणामी जमिनीचा कस  कमी होतो.

गांडूळ उत्पत्ती कमी होते. त्यामुळेच जमिनीमध्ये  पिकांना हानिकारक जीवजंतू जास्त प्रमाणात निर्माण होतात. परिणामी मिळणारे उत्पन्न  कमी होते. 

सेंद्रिय खत म्हणजे काय  ? 

वनस्पती व प्राणी यांचे अवशेष मातीमध्ये कुजवून सेंद्रिय खत तयार केले जाते. आज सगळ्यात स्वार्थी कोण असेल तर तो माणूस. अधिकाअधिक हव्यासापोटी माणसाने रासायनिक खतांचा वापर करून शेतीचे उत्पन्न जरी कमी केले असले तरी आज यावर रामबाण उपाय म्हणजे सेंद्रिय शेती. यासाठी सेंद्रिय खत तयार करणे अगदी सोपे आहे.

हे पण वाचा – मधुमेह असेल तर आहारामध्ये याचे सेवन वाढवा!

सेंद्रिय खताचे प्रकार  

सेंद्रिय खताचे अनेक प्रकार आहेत, या पैकी पहिला प्रकार आहे गांडूळ खत.

  • गांडूळ खत –  यासाठी थोड्याश्या प्रमाणात शेण, माती, पालापाचोळा, पाणी व गांडूळ आवश्यक असतात. एका बांधकाम केलेल्या टाकीमध्ये शेण, माती, पालापाचोळा यांचे पाणी घालून मिश्रण करावे.

    नन्तर त्यात गांडूळ सोडावे. थोड्याथोड्या दिवसांनी त्यावर पालापाचोळा शेण माती व पाणी टाकावे. टाकी पूर्ण भरेपर्यंत असे केल्यास अगदी दोन ते तीन महिन्यातच ती टाकी भरून गांडूळ खत आपल्याला मिळेल, ज्याचा वापर आपण आपल्या भाजीपाल्याच्या शेतीसाठी करून रसायन विष विरहित भाजीचे पीक आपल्या शेतात घेऊ शकू. 
     
  •  माशांचे खत  –  समुद्र किनारी वास्तव्य करणाऱ्या शेतकऱ्यांना तर मासळी खत हे  वरदानच आहे.  अगदी  ऑक्टोबर महिन्यापासून  मोठ्या प्रमाणावर  मासे मारी  सुरु  होते  अशावेळी  जास्त प्रमाणात ज्यावेळी ट्रॉलर्सना मासे मिळतात  तेव्हा ही मासळी वाळऊन नन्तर फ़ॅक्टरी मध्ये याची  बारीक भुकटी तयार केली जाते.

    आणि खत म्हणून नंतर याचा वापर केला जातो. काहीवेळेस  छोट्याप्रमाणात ताजी मासळी  टाकीत पाणी टाकून कुजवली जाते व याचा खत म्हणून उपयोग  केला जातो. 
     
  • कंपोस्ट खत  –  कंपोस्ट खत शेतातील कापणी नन्तरची  उरलेली धाट, उसाची चिपाड, भुसा, कापसाची धसकटे एकत्रित कुजवून त्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाते. या खतामध्ये नत्र आणि स्फुरद याचे प्रमाण जास्त असते.
  • शेण  खत –  हे खत सुद्धा शेतीसाठी जास्त परिणाम कारक आहे. अलीकडे नवनवीन शेती अवजारांचा शोध लागल्याने गोठ्यातील जनावरांची संख्या फारच कमी झालेली आहे.

    म्हणूनच सरकार आज गुरे खरेदीवरील कर्जाला मोठ्या प्रमाणात सबसिडी देत आहे. गोठ्यातील गुरांचे मलमूत्र व पालापाचोळा यापासून हे खत तयार होते.
     
  • हिरवळीचे खत  – जमिनीचा पोत सुधारण्यासाठी या खताचा प्रामुख्याने वापर केला जातो. शेतामध्ये लवकर उगवणाऱ्या  वनस्पतीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.

    ही  वनस्पती फुलोऱ्याला येण्यापूर्वीच नांगराच्या  सहायाने  ती वनस्पती जमिनीत  गाढली जाते. या मुळे  जमिनीला नत्र मिळते. अशाप्रकारे तयार होणाऱ्या खताला हिरवळीचे खत म्हणतात. 

सेंद्रिय शेतीची वैशिष्ट्ये – 

  • पर्यावरण संरक्षणात महत्वाची भूमिका बजावते.
  • मातीचा कस टिकविण्यास मदत होते.
  • पारंपरिक शेती पध्द्तीचा वापर केला जातो.
  • जीवनमान उंचावण्यास मदत होते.
  • कमीखर्चात खत तयार होत असल्याने आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.
  • सेंद्रिय शेती करावयाची असल्याने पाळीव प्राण्यांनाही पाळावे लागते.
  • शेतीतील उरलेला पालापाचोळा व आजूबाजूस उगवलेल्या वनस्पतींचा खत तयार करण्यासाठी वापर केला जातो.

तेव्हा मंडळींनो पारंपरिक शेतीचा अवलंब करा. घरच्याघरी  सेंद्रिय खत तयार करा. पण हे करण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे सेंद्रिय खत आपल्या बागेला मानवेल हे माती परीक्षण करून जाणून घ्या. 

मंडळी आपले मत आम्हांला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका आणि अशा प्रकारची नवनवीन माहिती मिळविण्यासाठी  कोकणशक्तिला फेसबुकवरती लाईक करा आणि इंस्टाग्राम वर फॉलो करा.

गूड मोर्निंग फोटोसाठी येथे क्लिक करा

Post Comment