केवळ 11 लोकांचा देश, जिथला राजा प्रवाशांसाठी चालवतो बोट…
आपण आजवर अनेक विशाल साम्राज्यांच्या रंजक कथा ऐकल्या आहेत. कधीही सूर्य मावळत नव्हता, असं ब्रिटिश साम्राज्य, चीनपासून भारताच्या वेशीपर्यंत पोहोचलेलं चंगेज खानचं वर्चस्व किंवा काबूल-कंदाहारपासून कर्नाटकपर्यंत पसरलेलं मुघलांचं साम्राज्य यांचा त्यात समावेश आहे. पण आज आपण जगातील सर्वात लहान अशा एका साम्राज्याची सफर करणार आहोत. याला साम्राज्य म्हणावं का? असाही प्रश्न पडतो. कारण या ठिकाणी केवळ 11 जण राहतात आणि तेही अर्धवेळ. याठिकाणी असा राजा आहे जो स्वतः प्रवासी वाहतुकीसाठी बोट आणि रेस्तराँ चालवतो. हाफ पँट तसेच सँडल परिधान करून तो जीवन जगतोय. हे रंजक असं साम्राज्य आहे किंगडम ऑफ टवोलारा.
छोटंसं बेट
भूमध्य सागरामध्ये इटलीच्या सार्डीनिया प्रांताजवळ असलेलं हे एक छोटंस बेट आहे. याठिकाणी अजूनही एक साम्राज्य आहे. इटलीला देश म्हणून मान्यता मिळण्याच्या पूर्वीपासून ते अस्तित्वात आहे. किंगडम ऑफ टवोलारा… हे प्रत्यक्षात टवोलारा नावाच्या एका छोट्याच्या बेटावर वसलेलं आहे. याचं एकूण क्षेत्रपळ हे पाच चौरस किलोमीटर एवढं आहे.
या साम्राज्याच्या राजाचं नाव आहे, आंतोनियो बर्तलिओनी. तुम्ही जर कधी फिरण्यासाठी टवोलारा गेले तर कदाचित तुम्हाला इथल्या राजांना शोधणं जरा कठीण जाईल. कारण ते राजासारखे दिसतच नाही. पेहराव किंवा राहणीमान काहीही तसं नाही. आंतोनियो बर्तलिओनी म्हणतात की, राजा म्हणून त्यांना केवळ जेवण मोफत मिळतं. तेही त्याच्या स्वतःच्या रेस्तराँमधून.
१९५५ मध्ये अमेरिकेतून उडालेले फ्लाईट ९१४, ३० वर्षानंतर उतरले
टवोलारा सारखे इतर काही छोटे-छोटे देश
1. रेडोंडा – इंग्लंडच्या साऊथम्पटन परिसरातील या प्रदेशानं धूम्रपानावरील बंदीपासून वाचण्यासाठी स्वतःला स्वतंत्र देश घोषित केलं होतं.
2. टवोलारा – 5 चौरस किलोमीटरवर पसरलेल्या या देशात एकूण 11 नागरिक आहेत. इथले राजा आंतोनियो हेच इथं असलेलं एकमेव रेस्तराँ चालवतात.
3. टोंगा – प्रशांत महासागरात असलेला हा देश 748 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला आहे. या देशाची लोकसंख्या 1 लाख 6 हजार आहे. 1773 मध्ये कॅप्टन जेम्स कूक यांनी याचा शोध लावला होता. कॅप्टन कूक यांनी याला ‘मैत्रीचं बेट’ असं नाव दिलं होतं. पण प्रत्यक्षात याठिकाणच्या नागरिकांना कॅप्टन कूक यांना मारायचं होतं.
4. ब्रुनेई – 5 हजार 765 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या ब्रुनेईची लोकसंख्या 4 लाख 13 हजार आहे. येथील लोकांना कधीही कर भरावा लागत नाही. ब्रुनेईचे सुल्तान (राजा) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.
5. स्वाजीलँड – आफ्रिकेतील या देशाचं क्षेत्रपळ 17 हजार 360 चौरस किलोमीटर आहे. निसर्ग सौंदर्यामुळं या देशाला गूढ रहस्यांचा देश असं म्हटलं जातं. येथील एकूण लोकसंख्या जवळपास 13 लाख आहे.
6. लेसोथो – दक्षिण आफ्रिकेत वसलेला हा देश 30 हजार चौरस किलोमीटर परिसरात पसरलेला आहे. समुद्र सपाटीपासून कमी उंचीवर असलेल्या या देशाची लोकसंख्या सुमारे वीस लाख आहे.
किंग्डम ऑफ टवोलारामध्ये यंदा स्थापनेला 180 वर्ष पूर्ण झाल्याचा उत्सव साजरा होत आहे. आजच्या काळामध्ये खरं तर एका बेटावरील साम्राज्याचा विषय हा गमतीचा ठरू शकतो.
पण याठिकाणचे लोक आणि राजा आंतोनियो बर्तलिओनी याबाबत अत्यंत गंभीर आहेत. याबाबत विचारलं असता ते अनेक पिढ्यांचा इतिहास उलगडून सांगतात.
एंतोनियो बर्तलिओनी यांच्या मते त्यांच्या पणजोबांचे पणजोबा, गुसेप बर्तलिओनी 1807 मध्ये दोन बहिणीशी लग्न करून इटलीमधून पळून आले होते. त्यावेळी इटली हा देश नव्हता, तर सार्डिनिया हा इटलीचा एक भाग वेगळं साम्राज्य म्हणून कारभार चालवत होता. याठिकाणी दोन विवाह करणं हा गुन्हा होता. त्यामुळं गुसेप बर्तलिओनी पळून या बेटावर आले आणि तिथंच स्थायिक झाले.
बकऱ्यांची शिकार
गुसेप हे जीनिव्हा शहरातील होते. त्यांना काही दिवसांतच या बेटावर असलेल्या सोनेरी दातांच्या बकऱ्यांबाबत माहिती मिळाली. ही जगातील अशाप्रकारची बकऱ्यांची एकमेव प्रजाती आहे. काही दिवसांतच इटलीपर्यंत या बकऱ्यांची माहिती पोहोचली. सार्डिनियाचे राजा कार्लो अल्बर्टो या बकऱ्या पाहण्यासाठी आणि त्यांची शिकार करण्यासाठी टवोलारा बेटावर आले. ही घटना 1836 च्या दरम्यानची आहे. त्यावेळी गुसेप यांचा मुलगा पाओलोनं कार्लो अल्बर्टो यांना बकऱ्यांच्या शिकारीसाठी मदत केली आणि संपूर्ण बेटावर फिरवलं. आंतोनियो सांगतात की, जेव्हा सार्डिनियाचे राजा अल्बर्टो या बेटावर पोहोचले तेव्हा त्यांनी स्वतःची ओळख सार्डिनियाचे राजा अशी करून दिली. त्यावेळी पाओलो यांनी स्वतःची ओळख टवोलाराचा राजा अशी करून दिली होती.
भूमध्य सागर
टवोलारामध्ये तीन दिवस राहिल्यानंतर कार्लो अल्बर्टो जेव्हा त्यांच्या देशात परतले तेव्हा त्यांनी एक आदेश काढला आणि टवोलारा हा सार्डिनिया राज्याचा भाग नसल्याचं जाहीर केलं. त्यानंतर पाओलो बर्तलिओनी यांनी स्वतःला राजा जाहीर केलं. त्यावेळी या बेटावर एकूण 33 नागरिक होते. त्यामुळं तेव्हा पाओलो त्या 33 जणांचे राजे बनले. पाओलो यांनी मृत्यूपूर्वी एक शाही स्मशानभूमी (कब्रस्तान) तयार करून घेतलं. त्यांनी मृत्यूपत्रामध्ये असं लिहिलं की, मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यविधीनंतर त्यांच्या कबरीवर एक मुकूट लावावा. विशेष म्हणजे पाओलो बर्तलिओनी यांनी जीवंत असताना कधीही मुकूट परिधान केला नाही. नंतरच्या काळात टवोलाराच्या राजांचे अनेक किस्से भूमध्य सागरात गाजत होते.
शांतता करार
टवोलाराच्या राजांनी अनेक देशांच्या राजांबरोबर करारही केले. त्यामध्ये इटलीचे संस्थापक म्हणून ओळख असलेल्या गॅरीबाल्डी यांचाही समावेश होता. सार्डिनियाचे तत्कालिन राजा व्हिटोरियो इमॅन्युअल द्वितीय यांनी तर 1903 मध्ये टवोलारा बरोबर शांतता करारही केला होता. एकोणीसव्या शतकात ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरिया यांनी जगभरातील राजांचे फोटो गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. त्यावेळी त्यांनी टवोलारा मधल्या शाही कुटुंबाचा फोटो काढण्यासाठी एक जहाज इथंही पाठवलं होतं. त्यानंतर अनेक वर्ष इंग्लंडच्या बकिंघम पॅलेसमध्ये हा फोटो होता. सध्या हा फोटो एंतोनिओ बर्तलिओनी यांच्या रेस्तरॉमध्ये लावलेला आहे.
नाटो सैनिकांचा तळ
नाटोच्या सैनिकांनी 1962 मध्ये याठिकाणी तळ उभारल्यानं या छोट्याशा साम्राज्याचं सार्वभौमत्व संपुष्टात आलं. त्याच्या बहुतांश भागावर कुणालाही येण्या-जाण्याची परवानगी नव्हती. पण इटलीनं कधीही अधिकृतरित्या टवोलाराला त्यांचा भाग म्हणून स्वीकारलं नाही किंवा ताबाही घेतला नाही. तसं पाहिलं तर टवोलाराला जगातील कोणताही देश मान्यता देत नाही. टवोलाराचे राजा आंतोनियो आणि त्यांच्या कुटुंबातील लोक इटलीपासून या बेटापर्यंत पर्यटकांची ने आण कराणाऱ्या प्रवासी बोटी चालवतात. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक फिरण्यासाठी येतात. ते याठिकाणी बकऱ्या आणि गरुडांच्या एका लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातीला पाहण्यासाठी येतात.
कुटुंबाचा व्यवसाय
टवोलारा बेटाच्या आसपासच्या सुमद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे सागरी जीव आहेत. अनेक पर्यटक हे त्यांना पाहण्यासाठी येत असतात. आंतोनियो आणि त्यांचा पुतण्या हे याठिकाणी प्रवासी बोट चालवतात, तर त्यांचा दुसरा पुतण्या मासेमारी करतो. तेच मासे आणि इतर सागरी जीव बेटावरील त्यांच्या रेस्तरॉमध्ये पर्यटकांना विविध पदार्थांच्या स्वरुपात उपलब्ध करून दिले जातात. आंतोनियो म्हणतात की, टवोलारावर राज्य करणं हाच जणू आमचा पिढीजात व्यवसाय आहे. पर्यटकांची वर्दळ वाढल्यानं आंतोनियो यांच्या राज्याचं उत्पन्नही वाढलं आहे. पण त्यांना सामान्य लोकांप्रमाणंच जीवन जगायला आवडतं.
ड्यूक ऑफ सेवॉय
आंतोनियो यांना रोज सकाळी उठल्यानंतर पत्नीच्या कबरीवर जाऊन फुलं वाहायला सर्वाधिक आवडतं. पण त्यासाठी ते प्लास्टीकची फुलं घेऊन जातात. खरी फुलं नेल्यास बकऱ्या ती खाऊन टाकतात, असं आंतोनियो म्हणतात. या स्मशानात बर्तलिओनी कुटुंबातील अनेकांच्या कबरीदेखिल आहेत. तांत्रिकदृष्ट्या आंतोनिओ आणि त्यांचे सर्व नातेवाईक हे इटलीचे नागरिक आहेत. त्यांना एकदा असंही मनात आलं होतं की, ड्यूक ऑफ सेवॉयकडे त्यांच्या राज्याला मान्यता देण्याबाबत विचार करण्याची विनंती करावी. पण नंतर त्यांनी हा विचार सोडून दिला. आंतोनियो यांच्या मते, आमच्याकडं महाल म्हणून एवढं मोठं बेट असताना, आम्हाला अशा औपचारिकतांची गरज नाही.
Post Comment