×

पुण्याच्या अनाथालयातील पोरगी, जिने ४ वेळा ऑस्ट्रेलियाला केले विश्वविजेते

पुण्याच्या अनाथालयातील पोरगी, जिने ४ वेळा ऑस्ट्रेलियाला केले विश्वविजेते

[ad_1]

महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी अष्टपैलू म्हणून ओळखली जाणारी ऑस्ट्रेलियाची लिसा स्थळेकर. तिचे नाव ऐकून अनेक भारतीयांना हे नाव जरास ओळखीचं किंवा भारतीय असल्याचे लक्षात येईल. तसा लिसा जन्माने भारतातीलच पण तिचा भारतीय ते ऑस्ट्रेलियन हा प्रवास एखाद्या चित्रपटाला शोभेल असाच झाला आहे. तिच्याच या प्रवासाची गोष्ट आज सांगणार आहोत.

लिसाचा जन्म 44 वर्षांपूर्वी म्हणजेच 1 ऑगस्ट 1979 ला पुण्यात झाला. पण तिच्या आई-वडिलांनी तिला श्रीवत्स अनाथालयात म्हणजेच सोफोश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थेत तिच्या जन्मानंतर सोडून दिले. त्या अनाथालयात तिला सर्वजण लैला म्हणून ओळखायचे. तीची तब्येत त्यावेळी फारशी बरी नव्हती.

त्याचवेळी अमेरिकेत स्थायिक झालेले हरेन आणि स्यू स्थळेकर एक मुलगा दत्तक घ्यायचा म्हणून भारतात आले होते. हरेन भारतीय होते तर स्यू इंग्लिश होत्या. या स्थळेकर दांपत्याने 6 वर्षांपूर्वी कॅप्रिनी या मुलीला बंगळुरुमधून आधीच दत्तक घेतले होते. त्यामुळे आता ते एक मुलगा दत्तक घेण्यासाठी आले होते. पण मुंबईत त्यांना दत्तक घ्यावा असा मुलगा मिळाला नाही. त्यावेळी त्यांच्या मित्रांनी त्यांना पुण्यातील अनाथलायला भेट देण्याबद्दल सुचवले. यावेळी ३ आठवड्यांची असलेल्या लैलाला काळजी घेण्याऱ्या कोणाचीतरी गरज होती. त्यावेळी स्थळेकर दांपत्याने तिला थोडेदिवस सांभाळले. याचकाळात त्यांना तिचा लळा लागला आणि त्यांनी मुलाऐवजी तिलाच दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. परंतू त्यांनी जेव्हा हा निर्णय घेतला त्यानंतर त्यांना काही दिवसातच अमेरिकेला परत जायचे होते. त्यामुळे लहानग्या लैलाचे कागदपत्र वैगरे काहीच तयार नव्हते. पण स्थळेकर दांपत्याने हार न मानता लगेचच तिचे कागदपत्र तयार केले. ती आता लैला राहिली नव्हती तर तिची ओळख होती लिसा स्थळेकर. लिसा तिच्या नव्या कुटुंबासमवेत अमेरिकेला गेली.

पुढे स्थळेकर कुटुंबिय अमेरिकेतून केनिया आणि नंतर केनियातून ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे स्थायिक झाले आणि लिसाचा ऑस्ट्रेलियन म्हणून प्रवास सुरु झाला. ऑस्ट्रेलियात क्रिडा संस्कृती आधीपासूनच रुजलेली आहेच. त्याचबरोबर तिला तिच्या वडिलांनी हरेन यांनी क्रिकेटशी ओळख करुन दिली. तिलाही त्यावेळी घरात बसून टीव्ही पाहण्यात किंवा वाचन वैगरे करण्यात रस नव्हता. लिसा तिच्या वडिलांबरोबर अंगणात क्रिकेट खेळायला लागली. ती 5 किंवा 6 वर्षांची असल्यापासून तिचे वडील तिच्याकडे चेंडू फेकायचे आणि ती बॅटिंग करायची. असे करत असतानाच तिला क्रिकेटची आवड लागली. तिचे वडिल तिला एकदा सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरही घेऊन गेले. तिने वडिलांना सांगितले की तिला क्रिकेट खेळायचे आहे. पण त्यावेळी तिच्या वडिलांना खात्री नव्हती की मुली हा खेळ खेळतात की नाही यात काही पुढे भविष्य आहे की नाही. पण आपल्या मुलीची क्रिकेटची आवड पाहून त्यांनी तेथील स्थानिक क्बलशी चर्चा केली. यावेळी त्यांना काही अडचणीही आल्या.

यादरम्यान तिला क्रिकेट खेळताना ती मुलगी असल्याचेही लपवायला लागले. ती लांब पँट घालायची आणि अगदी गोलंदाजी करताना ती कॅप घालायची, तीची ही सवय नंतर शेवटपर्यंत राहिली. त्यादरम्यान एकदा ती फलंदाजी करताना हेल्मट घालण्याऐवजी कॅप घालून गेली आणि एकेरी धाव धावत असताना तीची कॅप निघाली आणि खाली पडली. त्यावेळी तीची मोठी वेणी पाहून तेथील मुले म्हणाली अरे ही तर मुलगी आहे. ती १६ वर्षांखालील क्रिकेट खेळेपर्यंत मुलांबरोबर क्रिकेट खेळली.

लिसा लहान असताना तिची बहिण कॅप्रिनीने लिसासाठी एक उशी तयार केली होती, ज्यावर लिहिले होते की ‘शूss, मला उठवू नका, मी माझ्या देशाकडून क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहत आहे.’

तीला ऍडम गिलख्रिस्ट, मायकल स्लॅटर यांना क्रिकेट खेळताना पहायला आवडायचे. ते कधी तिचे आदर्श नव्हते पण ती म्हणते तिला त्यांना क्रिकेट खेळताना पहायला आवडते.

ती शालेय स्थरावरही क्रिकेट खेळली. तिला नंतर १९ वर्षांखालील न्यू साऊथ वेल्स संघाकडून खेळण्याचीही संधी मिळाली. इथेच तिची भेच स्टिव्ह जेन्किन यांच्याशी झाली. त्यांनी तिला पुढे प्रत्येक स्थरावर प्रशिक्षण दिले. पण काही दिवसांनंतर तिची कामगिरी चांगली न झाल्याने तिला संघातून वगळण्यातही आले. परंतू तिने पुन्हा जिद्दीने प्रयत्न केले. अखेर तिला यश आले ते 2001 मध्ये. तिची ऍशेस मालिकेसाठी 2001 ला ऑस्ट्रेलिया महिला संघात निवड झाली. पण दुर्दैव असं की ती कसोटी पदार्पण करण्याआधीच ती दुखापतग्रस्त झाली. तिच्या पायाच्या घोट्याला गंभीर दुखापत झाली आणि तिचे कसोटी पदार्पण टळले. असे असले तरी त्यावर्षी तिने ऑस्ट्रेलियाकडून वनडे पदार्पण केले. पुढे तिला 2003 मध्ये इंग्लंड जेव्हा ऍशेस खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला आले त्यावेळी कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. तिने यावेळी सिडनी कसोटीत शतकही केले. मधल्या कालावधीत तिच्या आयुष्यात काही चढ-उतार आले. तिने या कालावधीत तिचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पण 2002 मध्ये तिची आई कर्करोगशी लढाई देत असताना अनंतात विलीन झाली. याचा धक्का लिसाला जबरदस्त बसला. लिसा तिच्या आईच्या फार जवळ होती. पण या दु:खातून ती बाहेर आली.

पुढे 2005 मध्ये तर ती ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक संघातील महत्त्वाची सदस्य बनली. तिने त्या विश्वचषकात चांगली कामगिरी केली होती. पण अंतिम सामन्यात ती चांगलीच चमकली. अंतिम सामना होता तिचा जन्मदेश असलेल्या भारतीय संघाविरुद्ध. तिने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया 71 धावांवर 3 बाद अशा अवस्थेत असताना केरन रोल्टनला भक्कम साथ दिली आणि १३९ धावांची भागीदारी रचली. तिने 55 धावा केल्या. एवढेच नाही तर गोलंदाजी करताना तिने अमिता शर्माची विकेट घेतली. तसेच जया शर्मा आणि हेमलाताला धावबाद करताना महत्त्वाची भूमीका बजावली. तो विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला. पुढे तिने 2006 ला भारताविरुद्ध झालेल्या कसोटीतही ऑस्ट्रेलियाकडून खेळताना चमकदार कामगिरी केली. तिने ७२ धावा केल्या आणि ५ विकेट्सही घेतल्या. यात मिथाली राज आणि अंजूम चोप्राच्या विकेट्सचा समावेश होता. त्यानंतर तिने भारतात झालेल्या चौरंगी वनडे मालिकेतही सर्वांना प्रभावित केले. तिने त्या मालिकेत 98.50 च्या सरासरीने 394 धावा केल्या. ती आता संघात मधल्या फळीत सातत्याने धावा करणारी आणि एक चांगली गोलंदाज म्हणून ओळखली जावू लागली होती. एवढेच नाही ती न्यू साऊथ वेल्सकडून खेळताना देशांतर्गत क्रिकेटही गाजवत होती. 2005-2006 पासून तिने न्यू साऊथ वेल्सला 4 वेळा सलग महिला नॅशनल चॅम्पियनशिप (WNCL) जिंकून दिले होते.

2008 मध्ये जेव्हा आयसीसीने महिलांसाठी क्रमवारी सुरु केली तेव्हा तिने अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीत अव्वल क्रमांक मिळवला होता. एवढेच नाही तर २००७ आणि 2008 ला तिला ऑस्ट्रेलियाची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून पुरस्कारही मिळाला.

२००९ विश्वचषकापर्यंत ती ऑस्ट्रेलियन संघातील एक अनुभवी क्रिकेटपटू होती. तिने २००९ च्या विश्वचषकातही चांगली कामगिरी केली. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला चांगली कामगिरी करता आली नसली तरी तिने गोलंदाजी करताना १५.६९ च्या सरासरीने आणि ३.४५ च्या इकोनॉमी रेटने १३ विकेट्स घेतल्या. पुढे २००९ च्या पहिल्या महिला टी२० विश्वचषकातही तिने सर्वांना प्रभावित केले, परंतू त्या विश्वचषकात उपांत्यसामन्यात ऑस्ट्रेलिया इंग्लंडकडून पराभूत झाले. पण त्यापुढच्याच वर्षी ऑस्ट्रेलिया संघ आणखी मजबूतीने २०१०चा टी२० महिला विश्वचषक खेळला आणि एवढेच नाही तर तो विश्वचषक ऑस्ट्रेलियाने आपल्या नावावर केला. या विजयात लिसाने बरी कामगिरी केली होती. पुढे लिसाने क्रिकेट प्रशासनातही पाऊल टाकले. ती ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनची पहिली महिला सदस्य बनली.

२०१३ हा भारतात झालेला महिला वनडे विश्वचषक तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक ठरला. ती तेव्हा एक दिग्गज म्हणून खेळत होती. तिच्या आयुष्यात भारताचे स्थान नेहमीच खास राहिले. अनेक महत्त्वाच्या टप्प्यावेळी तिच्या आयुष्यात भारत हा एक महत्त्वाचा भाग राहिला. तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवटही भारतात तोही मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये विश्वविजेती म्हणून झाला. तो विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला. त्या विश्वचषकात लिसाने १२८ धावा केल्या आणि ९ विकेट्स घेतल्या होत्या.

यादरम्यान तिने अनेकदा भारत दौरा केला. तिनेही कधी भारताशी असलेली नाळ तोडली नाही. इथले पदार्थ, संस्कृती याबद्दल तिला आजही विशेष वाटते, ती अनेक भारतीयांप्रमाणे पतंगही चांगली उडवते. विशेष म्हणजे ती क्रिकेट जरी ऑस्ट्रेलियात शिकली असली तरी ती म्हणते तीची फलंदाजी शैली भारतीयांप्रमाणेच आहे. याच शैलीने तिने फलंदाजी केली. एवढेच नाही तिने श्रीवत्स अनाथलायालाही भेट दिली, जिथून तिला दत्तक घेण्यात आले. पण यावेळी तिने तिच्या खऱ्या पालकांबद्दल जाणून घेण्यास नकार दिला. कारण तिचे म्हणणे होते, तिला स्थळेकर दांमत्याकड़ून खूप प्रेम मिळाले होते. अनेक अनाथ मुलांना जे मिळत नाही ते सर्व तिला त्यांनी दिले होते. लिसाने तिचे आत्मचरित्राचे पहिले प्रकाशन भारतात केले आणि मग ऑस्ट्रेलियात केले.

लिसाने केवळ ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्वच केले नाही तर ती वनडे आणि टी२० अशा ४ विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होती. ती २०११ ला ऑस्ट्रेलियाने जिंकलेल्या ऍशेस मालिकेचा भाग होती. तिने ३ वनडे सामन्यात २००६ ला ऑस्ट्रेलिया महिला संघाचे नेतृत्वही केले. पुढे तीने क्रिकेटशी जोडलेली राहणेच पसंत केले. त्यामुळे आता ती अनेकदा समालोचक म्हणून दिसते. तर प्रशिक्षण क्षेत्रातही ती जोडली गेली. आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाने तिची युवा क्रिकेट सल्लागार म्हणून नियुक्तीही केली आहे. तिचे महिला क्रिकेटला नवी उंची गाठून देण्यातही मोलाचे योगदान राहिले आहे. असा तिचा लैला ते यशस्वी महिला क्रिकेटपटू लिसा स्थळेकर असा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.

#लिसा स्थळेकरची कारकिर्द –

कसोटी – 8 सामने – 16 धावा आणि 23 विकेट्स

वनडे – 125 सामने – 2728 धावा आणि 146 विकेट्स

आंतरराष्ट्रीय टी२० – ,54 सामने – 769 धावा आणि 60 विकेट्स

#वनडेमध्ये 1000 धावा आणि 100 विकेट्स घेणारी पहिला महिला क्रिकेटपटू

पुरस्कार – 2007 आणि 2008 ला ऑस्ट्रेलियाची सर्वोत्तम महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू

[ad_2]

Previous post

‘आई मला रामायण, महाभारत बघू देत नव्हती कारण…’; लोकप्रिय अभिनेत्रीकडून बालपणीच्या आठवणी सांगताना विचित्र खुलासा

Next post

श्रीनगरमधील ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांचा हातात तिरंगा घेत सहभाग; पाहा व्हिडीओ

Post Comment