Must visit Ganapati Pandals in Mumbai | गणेश चतुर्थीमध्ये मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळे – नक्की भेट द्या

0
36

गणेश चतुर्थी

गणेश चतुर्थीला आपल्या बाप्पाचं म्हणजे श्री गणपतीचा जन्म झाला. पार्वती गणेशाला आपल्या अंगाच्या उटण्या पासून बनविते आणि स्नानास गेल्यावर द्वारपाल होण्याची आज्ञा देते. जेव्हा भगवान शंकर तेथे येतात तेव्हा गणेश त्यांना थांबवितो, नंतर संतापलेले भगवान शंकर गणेशाचे शीर धडापासून वेगळे करतात. हे जेव्हा मतपर्वातील कळते, तेंव्हा ती गणेशाला पुनर्जीवित करायला सांगते. भगवान शंकार आपल्या गणांना जो कोणी प्राणी आधी भेटेल त्याच शीर आणायला सांगतात. गणांनी आणलेलं गजाच शीर गणेशाला जोडलं जात. त्या दिवसाला गणेश चतुर्थी असे म्हणतात. हि गणेश जन्माची कथा आपण सर्वांना ठाऊक असेलच परंतु त्याच बरोबर गणेश जन्माच्या आणखी काही कथा आहेत आणि वाचण्यात फार मजेशीर आहेत. गणेश जन्माच्या कथा (भाग १ आणि भाग २) म्हणून आधीच एक लेख प्रसिद्ध केला आहे तो नक्की वाचा.

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात 

गणेश चतुर्थी ही फार पूर्वी पासून चालत आली आहे. पण सार्वजनिक गणेशोत्सव हे अलीकडच्या काळात म्हणजे अठराव्या शतकात म्हणजेच १८९६-९७ या काळात चालू झालेत. स्वातंत्र्याच्या काळात जेव्हा लोकमान्य टिळकांच्या लक्षात आलं की आपल्याच लोकांमध्ये एकी नाही आणि त्याचाच फायदा हा इंग्रज सरकारला होतो  म्हणून त्याच्यावर उपाययोजना आणि आपल्या लोकांना एकत्रित करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी पारंपरिक चालत आलेली गणेश चतुर्थी सार्वजनिकरित्या साजरी करायची असे ठरवले. अशाप्रकारे मुंबई आणि पुणे येथे सार्वजनिक गणेशोत्सवांना सुरवात झाली आणि नंतर राज्यातील इतर भागात या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली.

गणेश चतुर्थी हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सण आहे. दहा दिवस चालणारा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. बाप्पाच्या आगमनाची तयारी बरेच दिवस चालू असते. जसा गणेश चतुर्थीला महिना शिल्लक राहतो तस तसा कामांचा वेग आणि त्याचबरोबर हालचाली वाढण्यास देखील सुरुवात होते. मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांची महिमा देखील अगाध आहे. अशाच काही मुंबईतील प्रसिद्ध आणि नवसाला पावणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांची माहिती आपण आज या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत.

लालबागचा राजा 

मुंबईतील सार्वजनिक गणपती म्हटले की सगळ्यात पाहिलं नाव पुढे येत ते म्हणजे लालबागच्या राजाच. अगदी लहानग्यांपासून ते थोरांपर्यंत सर्वजण लालबागच्या राजाचे चाहते आहेत. दरवर्षी राजाच्या दर्शनाला प्रचंड गर्दी असते. लालबागचा राजा हा नवसाला पावणारा गणपती आहे त्यामुळे दरवर्षी १० ते १५ लाख भाविक राजाच्या चरणी नतमस्तक होतात. बरेच सिनेतारके आणि राजकर्ते या बाप्पाच्या दर्शनाला न चुकता  येतात.

lalbaug raja

या मंडळाची सुरुवात स्वातंत्र्याच्या पूर्वी १९३४ साली नवस स्फुर्तीपासून झाली. १९३२ साली लालबागमधील पेरू चाळ येथील बाजारपेठ बंद करण्यात आली म्हणून त्या बाजारपेठेत बसणारे मच्छिमार आणि विक्रेत्यांनी बाजारपेठ पुन्हा सुरु होण्यासाठी गणपती बाप्पाकडे नवस केला. स्थानिक आणि नेते मंडळींच्या अथक प्रयत्नाने बाजारपेठ पुन्हा सुरु झाली. बाप्पा नवसाला पावला आणि म्हणूनच मच्छिमार आणि विक्रेत्यांनी १२ सप्टेंबर १९३४ साली सर्वप्रथम श्री गणेशाची मूर्ती स्थापन केली आणि त्या सालापासून लालबागला गणेश चतुर्थी साजरी करणे चालू झाले.

राजाची ही मूर्ती साधारणपणे १८ ते २० फूट असते आणि १९३५ पासून जवळपास आठ दशक ह्या मूर्तीचे काम हे कांबळे कुटुंब करत आले आहेत.

लालबागचा राजा हा मध्य रेल्वेच्या चिंचपोकळी व करी रोड या स्थानकापासून अवघ्या १० ते १५ मिनिटांच्या अंतरावर आहे.

अंधेरीचा राजा

अंधेरीचा राजा हा मुंबईतील दुसरा सर्वाधिक प्रसिद्ध असा सार्वजनिक गणपती आहे. हा देखील नवसाला पावणारा गणपती आहे. ह्या गणपतीची सुरुवात १९६६ मध्ये मिलमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी केली, जेंव्हा कामगारांनी संप केला होता आणि मागण्या पूर्ण होण्यासाठी गणपतीकडे साकडं घातलं आणि त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या. त्यादिवशी पासून गणेशाची स्थापना चालू झाली.

andhericha raja

‘आझाद नगर सार्वजनिक उत्सव’ ही संस्था अंधेरीच्या राजाची स्थापना करते. ही गणेशाची मूर्ती बाकी मंडळांच्या तुलनेत तशी लहान असते. अंधेरीच्या राजाची उंची ८.५ आहे आणि स्वर्गीय विजय खातू व त्यांची टीम ही मूर्ती दरवर्षी बनवते.

जवळपास ५५० मंडळाचे कार्यकर्ते गणेश भक्तांची सेवा करायला असतात. लालबाग प्रमाणे ह्या अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला फार मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि सिनेतारका आणि नेते मंडळी या बाप्पाला आवर्जून भेट देतात.

अंधेरीच्या राजाला पोहचविण्यासाठी तुम्ही अंधेरी रेल्वे स्थानकातून बस किंवा रिक्षा घेऊ शकता. तसेच जर मुंबई मेट्रोने जात असाल तर आझाद नगर स्थानकावरून तुम्हाला वीर देसाई मार्गावर यावं लागेल जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या मागच्या बाजूला आहे.

गिरगावचा राजा 

गिरगावचा राजा ह्या वर्षी ८२ व्या वर्षात पदार्पण करेल. या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे हा एक इको फ्रेंडली गणपती आहे आणि पूर्णतः शाडूच्या मातीपासून बनलेला आहे आणि मूर्तिकार राजेंद्र पाटकर ही मूर्ती बनवतात. त्याचबरोबर आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गिरगावचा राजा हा सिंहासनावर बसलेला असतो आणि डोक्यावर राजवाडी फेटा असतो.

लालबागच्या राजाप्रमाणे हा गिरगावचा राजा देखील फार जुना आहे. या राजाची सुरुवात देखील स्वातंत्र्यपूर्वी काळात म्हणजेच १९३८ साली रामचंद्र तेंडुलकर यांनी केली. पूर्णतः शाडूच्या मातीने बनवलेली हि गिरगावच्या राजाची मूर्ती २५ फुटांची असते.

२०१६ मध्ये ‘मन की बात’ या टीव्ही कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजींनी “गिरगाव चा राजा मंडळाचा आम्हाला अभिमान आहे की ते पर्यावरणपूरक गणपती आणत आहेत.” अशा शब्दात गिरगावच्या राजाची स्तुती केली. मुंबईच्या इतर मोठ्या मंडळांनी देखील अशाच प्रकारे इको फ्रेंडली गणपती बनवणं गरजेचं आहे. जर गिरवाच्या राजा एवढा २२ फुटांचा गणपती जर शाडू पासून बनत असेल तर इतर ही गणेश मंडळांना शाडूचे गणपती बनवणं पर्यावणाच्या दृष्टीने गरजेचं आहे.

गिरगावच्या राजाला जाण्यासाठी चर्नीरोड हे पश्चिम रेल्वेच स्थानक जवळचे आहे. तुम्ही टॅक्सीने किंवा पायी देखील पोहचू शकता.

परळचा राजा – नरे पार्क

नरे पार्कचा राजा हा परेलचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे. परेलच्या राजाचे वैशिष्ट्य म्हणजे इतर मंडळांच्या तुलनेत या बाप्पाची मूर्तीही नेहमी उभी असते तसेच गणपतीच्या मागचे प्रभावळ हे कोणत्या तरी एका देव देवतेचे असते. या बाप्पाची स्थापना परळच्या गिरणींमधल्या कामगारांनी १९४७ साली केली.

गणपतीची मूर्ती जरी २२ फुटाची असली तरी त्या मागचे प्रभावळ पकडून ती ३० फुटांच्या वरती जाते. त्यामुळे एवढी उंच मूर्ती रस्त्यावरून नेताना अडथळे येऊ नये म्हणून प्रभावळ कमी जास्त करतात. मूर्तिकार सतीश वळिवडेकर हे राजाची मूर्ती गणसंकुल भारतमाता येथे बनवतात आणि जेव्हा मूर्ती पूर्ण होते आणि नेण्याची तयारी चालू होते त्याला ‘ आगमन सोहळा ‘ म्हणतात. या आगमन सोहळ्याला प्रचंड गर्दी असते. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण या राजाच्या आगमन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

नरे पार्कच्या परेलच्या राजाला जाण्यासाठी तुम्हाला परेल (मध्य रेल्वे) किंवा एल्फिस्टन रोड (पश्चिम रेल्वे) या स्थानकांवरून येत येईल. केईम हॉस्पिटलच्या जवळच परेलचा राजा विराजमान होतो.

मुंबईचा राजा – गणेश गल्ली

मुंबईचा राजा यावर्षी आपल्या ९२ व्या वर्षांत पदार्पण करेल. मुंबईचा राजा हा देखील दक्षिण मुंबईच्या लालबागमध्येच लालबागच्या राजाच्या शेजारी स्थित आहे. मुंबईचा राजा हा मुंबईतील सगळ्यात जुन्या सार्वजनिक मंडळांपैकी एक आहे.

mumbaicha raja

लोकमान्य टिळकांनी स्वराज्य निर्मितीसाठी लोकांना एकत्रित आणण्यासाठी १८९६-९७ मध्ये सार्वजनिक गणेश उत्सवांना सुरुवात केली. त्या पासून प्रेरित होऊन लालबागच्या पेरू चाळीतील गिरणी कामगारांनी सर्वाना एकत्रित आणण्यासाठी सण १९२८ साली प्रथमच बाप्पाची स्थापना केली.

सन १९७७ मध्ये सुवर्णमहोत्सवी वर्षात मुंबईच्या राजाची सर्वात मोठी म्हणजे २२ फुटांची मूर्ती बनवली आणि त्यापासून आतापर्यंत ती कायम ठेवण्यात आली. त्यावेळी २२ फुटांची मूर्तीही पहिल्यांदाच बनवण्यात आली.

या राजाच एक वैशिष्ट्य म्हणजे येथे दरवर्षी नवीन देखावे केले जातात. त्यासाठी भारतातील विविध तीर्थक्षेत्रे, पर्यटन स्थळे यांचे देखावे गणेश चतुर्थीला बनवले जातात. मुंबईच्या राजाचे देखावे हे पाहण्याजोगे असतात त्यामुळे लाखो गणेश भक्त लालबागच्या राजासह गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाच्या दर्शनाला येतात.

लालबागचा राजाच्या शेजारीच असल्यामुळे तुम्ही मध्य रेल्वेच्या चिंचपोकळी व करी रोड या स्थानकापासून अवघ्या १० ते १५ मिनिटांच्या आत या ठिकाणी पोहोचू शकता.

चिंचपोकळीचा चिंतामणी 

मुंबईतील सर्वात जूना सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून चिंचपोकळीच्या चिंतामणीला ओळखलं जात. या गणपतीची सुरुवात सन १९२० साली झाली होती. लोकमान्य टिळकांनी चालू केलेला गणेश उत्सव आपण देखील चालू करावा या उद्देशाने चिंचपोकळीतील २० ते २५ जण एकत्र आले आणि त्यांनी १९२० साली मंडळाची स्थापना करून सार्वजनिक गणेश उत्सव सुरु केला. सुरुवातीला मूर्ती फक्त तीन ते चार फुटांची असायची. आज ही मूर्ती २३ फुटांची असते.  या वर्षी चिंचपोकळीचा चिंतामणी ९९ व्या वर्षात पदार्पण करेल.

दक्षिण मुंबईमध्ये सुरवातीला हे एकाच मंडळ होते आणि भायखळा ते शिवडी  पर्यंत सारे क्षेत्र चिंतामणीने व्यापलं होत. जस जशी वर्षे उलटत गेली तसतशी नवनवीन मंडळ दक्षिण मुंबई मध्ये स्थापन होऊ लागली. पण आजही मुंबईकरांमध्ये चिंतामणीचे विशेष स्थान आहे. लाखो गणेश भक्त येथे दर्शनाला दरवर्षी येताहेत.

चिंतामणीचे विशेष आकर्षण म्हणजे गणपतीच्या मूर्ती मधले प्रभावळ. याच मंडळाने आकर्षक प्रभावळ बनवण्याची सुरुवात सर्वप्रथम केली. तसेच नवनविन देखावे करण्यासाठी चिंचपोकळीचा चिंतामणी प्रसिद्ध आहे.

चिंतामणीला पोहोचणं हे सर्वात सोपे आहे. मध्य रेल्वेच्या चिंचपोकळी स्थानकात उतरून तुम्ही पूर्वेला उतरलात की चिंतामणीचे दर्शन होईल.

तेजुकाया 

सन १९६७ साली चालू झालेला तेजुकाया गणेश मंडळ आज मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेश मंडळांपैकी एक आहे. तेजुकाया हे नाव ब्रिटिश काळातील एका कर्तबगार बांधकाम व्यवस्थापकाचे नाव होते “राव बहादुर सेठ श्री तेजुकाया जे. पी. यांनी १८९० पासून त्यांनी मुंबईमध्ये अनेक बांधकामे पार पडली, त्याच्या कामापासून प्रेरणा घेऊन, या गणपती बाप्पाला “तेजुकाय” असे संबोधले जाते आणि म्हणूनच नावाला साजेसे असे देखावे इथे बनवले जातात.

तेजुकायाचा आगमन सोहळा देखील मोठा असतो. भक्तगण हजारोच्या संख्येने आगमनासाठी येतात. बाकी इतर सार्वजनिक मंडळांप्रमाणे हा देखील नवसाला पावणारा गणपती आहे. दरवर्षी येथे नवस बोलले जातात आणि मोठ्या प्रमाणावर गणेशभक्त येथे दर्शनाला येतात.

तेजुकायाच अजून एक वैशिष्टय असं की, विसर्जनाच्या वेळी ही २२ फुटांची मूर्ती खांद्यांवरून समुद्रात नेली जाते. तेजुकायाला जाण्यासाठी तुम्हाला करी रोड किंवा चिंचपोकळी या स्थानकांवर जाता येईल.

जीएसबी सेवा मंडळ 

ह्या मंडळाची सुरुवात गौड सारस्वत ब्राम्हणांनी १९५५ साली केली. किंग सर्कलचे जीएसबी सेवा मंडळ हे मुंबईमधील सर्वात श्रीमंत मंडळ आहे. जीएसबी सेवा मंडळाचा गणपती हा पाच दिवसांचा असतो तरीही २०१८ मध्ये या मंडळाचा २६४.७५ करोड इतका विमा होता. तो सगळ्यात जास्त भेट दिल्या जाणाऱ्या लालबागच्या राजाच्या कितीतरी पटीने जास्त आहे. त्याच्या मागच कारण म्हणजे गणपतीने परिधान केलेले सर्व दागिने हे खऱ्या सोन्याचे असतात.

गिरगावच्या राजाप्रमाणे हा गणपती देखील इको फ्रेंडली आहे आणि पूर्णतः शाडूच्या मातीपासून बनविला जातो. दुसरे वैशिष्ट असे की इथे फक्त पारंपारिकरित्या चालत आलेल्या संगीताचा वापर होतो.

मध्य रेल्वेच्या शिव किंवा हार्बर च्या किंग सर्कल या स्थानकातून तुम्ही जीएसबी सेवा मंडळाच्या गणपतीच्या दर्शनाला जाऊ शकता.

डोंगरीचा राजा 

डोंगरीचा राजा हा मुंबईतील काही जुन्या सार्वजनिक गणपतींपैकी एक आहे आणि याची स्थापना सन १९३९ मध्ये झाली. गणेश चतुर्थीमध्ये लोक मोठ्याप्रमाणात बाप्पांच्या भेटीला येतात. या वर्षी गणपती ८१ व्या वर्षात पदार्पण करेल. गणेश चतुर्थीला बरेच लोक गणपतीला नवस बोलतात आणि ते पूर्ण देखील होतात, म्हणूनच नवसाला पावणारा अशी या गणेशाची ख्याती आहे .

या गणपतीला जाण्यासाठी तुम्ही हार्बर मार्गाने सँडहर्स्ट रोड ला उतरून जाऊ शकता.

खेतवाडीचा गणराज 

सन १९५९ मध्ये खेतवाडीच्या गणराजाची सुरुवात झाली पण २००० सालापर्यंत ह्या गणेशाला तेवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती. २००० मध्ये भारतातील इतिहासात पहिल्यांदाच ४० फुटांची मूर्ती बनविली गेली आहे खेतवाडीचा गणराज हे नाव चर्चेत आले. खेतवाडीची गणराज मूर्ती ही सर्वात नेत्रदीपक असते म्हणूनच त्यासाठी खेतवाडीच्या गणराजाला पुरस्कार देखील मिळाले आहेत.

जीएसबी सेवा मंडळा प्रमाणे ह्या मूर्तीला देखील अस्सल सोन्याच्या दागिन्यांनी सजवले जाते. त्याच प्रकारे विविध प्रकारचे संदेश देणारे देखावे इथे केले जातात. मुंबई मधील प्रसिद्ध सार्वजनिक गणेश मंडळ असल्यामुळे दर वर्षी गणेश भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

खेतवाडीच्या गणराजाला भेट देण्यासाठी तुम्हाला  चर्नीरोड किंवा सँडहर्स्ट रोड या स्थानकातून जाण्यास सोपे पडेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here