ब्लॉग

क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा यांनी कसा इंग्लंडमध्ये जाऊन इंग्रजांना धडा शिकवला!

क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा

वेदकाळा पासून स्वकीय व परकीयांचा विरोधत या भारतीय मातीत अर्क क्रांत्या घडून गेलेल्या आहेत .श्रीकुष्णाने मथुरेत दृष्ट कंसाला ठार मारून राज्य क्रांती केल्याचे आपल्या वाचनात वा ऐकण्यात आले असेलच. हरिहर व बुक्क या बंधूनी सुल्तानशाहीचे पानिपत करून विजयनगरचे साम्राज्य स्थापन केले. शिवरायांनी तर मुघलांशी दोन हात करून मराठ्याचे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. नानासाहेब, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी १८५७ चे पेटवलेले यज्ञकुंड  सर्वज्ञात आहे अशा अनेक राज्यक्रांत्या या भारताचा इतिहासात घडलेल्या आहेत. परंतु या सर्वांचे प्रेरक व प्रेरणा देणारे आहेत ते भारतातील संत महात्म्य होय. क्रांती या शब्दाचा अर्थच असा आहे की उत्क्रांती. हळूहळू होणारे बदल, परंतु क्रांती या शब्दात एवढ सामर्थ्य आहे की अन्याय हा शब्द किंवा कृती त्याचा समोर कधीही टिकलेली नाही.  म्हणूनच ब्रिटिशांचा बलाढ्य साम्राज्याला अनेक भारतीय क्रांतिवीरांनी  बलाढ्य असे सुरुंग लावलेले होते. म्हणूनच भारतविषयी स्फूर्ती देणारी गीते ऐकली की क्रांतीची ज्योत आजही ऐकणाऱ्याच्या मनात तेवल्याशिवाय राहत नाही.

आत्तापर्यंत आपल्याच समाजातील लोकांच्या मनात असा गोड गैरसमज आहे. की भारतातील जनता ही देवावर भरोसा ठेवणारी, अंधश्रद्धाळू, बुवाबाजीवर विश्वास ठेवणारी व मुकाट्याने होणारे अत्याचार सहन करणारी आहे. पण हा इतिहास नाही, भारतीय जनता अशी नाही आहे आणि हेच जाणून घेण्यासाठी आपण सर्वांना ज्ञात होण्यासाठी क्रांतीचा इतिहास आपण वाचला पाहिजे, ऐकला पाहिजे. आज येथे एका क्रांतिवीराने इंग्रजांच्याच साम्राज्यात राहून तेथे त्यांना कसा धडा शिकवला ते पाहणार आहोत. महान क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांच्या विषयी आपण आज माहिती घेणार आहोत.

मदनलाल धिंग्रा

ब्रिटिश राजवटीत अत्याचाराचा कर्दनकाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्झन वायलीसारख्या व्यक्तीला इंग्लंडच्या राजधानीत लंडनमध्येच यमसदनाला धाडून आपल्या शूरतेचे धीरतेचे प्रत्येय साऱ्या जगाला दाखवून दणारे व हसतहसत फाशी जाणाऱ्या या क्रांतिवीराचे नाव आहे मंदनलाल धिंग्रा.

देश प्रेमाने प्रेरित होऊन आपले कुटुंब सोडून ते मुंबईला आले. येथे एका बोटीवर ते फायरमन म्हणून कमला राहिले व त्याच बोटीवरून  इंग्लंडला पोहोचले होते. धिंग्रा इंग्लंडला जाण्यापूर्वीच सावरकरही इंग्लंडला गेलेले होते. इंग्लंडमध्ये एकदा सावरकरांच्या व्याख्यानाला धिंग्रा आले होते. सावरकरांचे देशप्रेमाने भरलेले व्याख्यान ऐकून ते प्रभावित झाले आणि शामजी कृष्णा वर्मा यांनी स्थापन केलेल्या “भारतसदन” मध्ये ते राहण्यास आले. तिथे सावरकरांशी त्यांची घनिष्ठ मैत्री झाली आणि स्वदेशीच्या कार्यास मोठ्या जोमाने, वेगाने सुरुवात झाली.

१८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या स्मृती दिनानिमित्त इंग्लंडमध्ये १० मे १९०८ ला एक भव्य असा समारंभ घेण्यात आला होता. या समारंभास धिंग्रा आले होते, येताना त्यांनी आपल्या छातीवर एक बिल्ला लावला होता त्यावर असे लिहले होते की, १८५७ च्या हुतात्म्यांस विनम्र अभिवादन. केवढी ती धीराची छाती. यावेळी त्यांच्याच एका इंग्रज धारणी मित्राने त्यांची चेष्टा केली. ती चेष्टा त्यांच्या इतकी जिव्हारी लागली की, ते सुरा घेऊन त्या मित्राच्या अंगावर धावून गेले. सुदैवाने इतर मित्रांच्या मध्यस्थीमुळे काही विपरीत घडले नाही.

याच दरम्यान इंग्रज भारतातील जनतेवर प्रचंड अत्याचार करत असल्याच्या बातम्या इंग्लंडमध्ये पोहोचत होत्या. अगदी छोट्या छोट्या कारणांवरून भारतातील तरुणांना जेलमध्ये डांबले जात होते. अगदी इंग्लंडमध्येही भारतीयांवर कडक नजर ठेवली जात होती. त्यांच्या मागे पोलीस लावण्यात आले होते. त्यामुळे अशा जुलमी इंग्रजांना त्यांच्याच मायभूमीत म्हणजे चक्क इंग्लंडमध्येच हादरा द्यायचा असे धिंग्रा व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरविले.

परंतू मदनलाल यांच्या इंग्लंडमधील हालचाली भारतात त्यांच्या घरी समजत होत्या, म्हणूनच की काय त्यांचे वडील बंधू डॉ. धिंग्रा यांनी त्यांना इंग्लंडमधील “नॅशनल इंडियन अससोसिएशन” या संस्थेत सामिल होण्यास सांगितले. नावावरून जरी ही संस्था भारताच्या हितासाठी झटणारी संस्था असं वाटत असल तरी मात्र प्रत्येक्ष या संस्थेचा हेतू वेगळा होता. इथे आलेल्या भारतीय तरुणांना या न त्या कारणाने या संस्थेत गुंतवून ठेवायचे, जेणेकरून ते तरुण भारताच्या स्वातंत्र्याविषयी हालचाली करणार नाहीत आणि म्हणूनच धिंग्रांच्या वडील बंधूंना वाटले की यामुळे आपला भाऊही इंग्लंडमध्ये सुरक्षित राहील. या संस्थेचे कोषाध्यक्ष होते कर्झन वायली.

या कर्झन वायलींना ही डॉ. धिंग्रा यांनी पत्र पाठवून मदनलाल यांना समाजवण्याविषयी सांगितले. नेमका याच संधीचा फायदा मदनलाल यांनी घेतला आणि ते कर्झन वायली यांना येऊन भेटले. त्यांच्याशी मैत्री वाढवली व नंतर सावरकर व इतर भारतीय मित्रांशी आपले पटत नसल्याचा बहाणा केला. हे सगळे खरे वाटावे म्हणूनच की काय धिंग्रा “भारतसादन” सोडून लेडीबरी रोडवर राहावयास गेले. पण त्यामुळेच की काय कर्झन वायलींचा धिंग्रावर विश्वास बसला पण त्याला कुठे माहित होते की, धिंग्रा यांच्या मनात देशप्रेमाची तेवत असलेली ज्योत ही कधीच न विझणारी होती.

तदनंतर १८६७ मध्ये कर्झन वायली हा लष्करी अधिकारी बनून भारतात आला होता. ब्रिटिश राजवटीत भारतात त्याने अनेक उच्चपदे भोगली, आणि ती भोगत असतानाच भारतीयांवर अनेक जुलमी, मानवतेला काळिमा फासणारे अत्याचारही केले. १९०१ ला पुन्हा लंडनला येऊन “भारत सदनचे” सूत्रसंचालक बनले. जणू सारी सत्ताच हाती आल्यासारखे वाटून येथील भारतीयांवर त्यांनी अत्याचार चालू केले.

याच दरम्यान सावरकरांचे वडीलबंधू बाबाराव सावरकरांना देशद्रोही कविता छापल्या बद्दल ८ जून १९०९ ला काळ्यापाण्याची जन्मठेप झाली. या बातमीने सावरकर पुरते खचून गेले. मात्र मदनलाल या बातमीने संतापले या कृत्याचा बदला घ्यायचाच असे त्यांनी ठरविले आणि योगा योगानेच म्हणावं लागेल त्याच दिवशी “रॉयल कलोनिअल इंस्टिट्युटच्या” सभेला वंग भंगला जबाबदार असणारे लॉर्ड कर्झन व बंगालचे माजी गव्हर्नर ब्रोमफिल्ड कुल्लर येणार होते. या दोघांनाही एकाचवेळी उडवायचे असा निश्चय करून मदनलाल सभास्थळी गले, परंतु तेथे पोहोचण्यास त्यांना थोडासा उशीर झाला होता. त्यामुळे हॉलचा दरवाजा बंद झाला होता. हाताशी आलेला बेत फसला म्हणून ते खूप निराश झाले होते. पण तरीही निराशेने खचून जाणाऱ्यातले ते नव्हते, म्हणूनच त्याचवेळी त्यांनी निश्चय केला की, आता उडवायचे ते खुद्द कर्झन वायलीलाच आणि ते कमला लागले, प्लान तयार झाला. दिवस, वेळ, तारिख निश्चित करण्यात आली.

“नॅशनल इंडियन अससोसिएशनचा” वार्षिक मेळावा जहांगिर हॉलमध्ये ९ जुलै १९०९ ला होणार होता. हीच वेळ योग्य आहे असे ठरवून त्यांनी निश्चय केला. सावरकर आदींशी बोलणे झाले आणि तो दिवस उजाडला. कार्यक्रम ठरल्याप्रमाणे जहांगिर हॉलमध्ये संपन्न झाला. रात्री अकरा वाजता कार्यक्रम संपवून धिंग्रा कर्झन कायलींशी गप्पा मारत हॉलच्या मुख्य दारातून पायऱ्यांपर्यंत पोहचले इतक्यात तेथे काही खास कर्झन वायलींना सांगावयाचे आहे असा बहाणा करून त्यांना आपल्या अगदी जवळ बोलावून घेतले आणि त्यांना काही कळायच्या आत आपल्या जवळील रिव्हॉल्वरने दोन गोळ्या झाडल्या त्यांच्या उजव्या व डाव्या डोळ्यांच्या मधून चिंधड्या उडवत त्यांच्या मेंदूत घुसल्या त्याक्षणी ते खाली कोसळले. धिंग्रा यांनी आणखी दोन गोळ्या त्यांच्या छातीवर झाडल्या. बंदुकीच्या आवाजाने मुळचे मुंबईचे असलेले पण शांघाय येथे डॉक्टरकी करणारे कावसजी मध्ये आले. त्याचवेळी स्वतःचे रक्षण करण्याच्या हेतूने धिंग्रा यांनी त्यांच्यावरही गोळी झाडली. आता आपल्याच पिस्तुलने स्वतःवर गोळी झाडून जुलमी इंग्रजांच्या हातातून सुटका करून घेण्यासाठी पिस्तूल स्वतःच्या मस्तकी लावले. पण त्यांच्या दुर्दैवाने अनेक शिपायांनी त्यांना घेरले ते पकडले गेले. त्यांना वोल्टन स्ट्रीट पोलीस ठाण्यावर नेण्यात आले. हा सारा वृत्तांत सावरकरांना समजला. सावरकरांनी धिंग्रांसोबत ज्ञानचंद वर्मांना पाठविले होते. याच ज्ञानचंद वर्मांनी तिथे घडलेला सारा वृत्तांत सावरकरांना सांगितला. साऱ्या जगभर या वार्तेने खळबळ उडाली इंग्लंडमधील सर्व वृत्तपत्रांमध्ये मदनलाल धिंग्रांबद्दल छापून आले.

बडे इंग्रज अधिकारी या वार्तेने धास्तावले. अवघ्या दीड महिन्याच्या आतच केस निकालात काढली. बघा ९ जुलै १९०९ – कर्झन वायली या अत्याचारी, जुलमी नराधमास यमसदनी धाडले. १० जुलै १९०९ ला थेट मिनिस्टर कोर्टात खटला सुरु केला २३ जुलै १९०९ ला खटला सेशन कोर्टात वर्ग केला गेला आणि लगेचच १७ ऑगस्ट १९०९ ला फाशी देण्यात आली. यावरून इंग्रज भारतीयांना किती घाबरून होते, तसेच किती तडकाफडकीने खटले निकालात काढत होते याचा आपणास अंदाज येईल.

मदनलाल धिंग्रा यांनी ज्या दिवशी कर्झन वायलीवर गोळी झाडली होती त्या दिवशी ते स्वतः सोबत एक निवेदन घेऊन गेले होते. पण दुर्दैवाने ते निवेदन पोलिसांच्या हाती पडले आणि त्यांनी ते निवेदन समोर येऊ दिले नाही. ही गोष्ट सावरकर आणि ज्ञानचंद वर्मा यांना माहित होती. सावरकरांनी ज्ञानचंद वर्मा यांच्या करवी ते निवेदन पॅरिसमध्ये छापून घेऊन जगामधील सर्व प्रमुख वृत्तपत्रांना पाठविले आणि काय आश्चर्य धिंग्रांच्या फाशी दिवशीच म्हणजे १७ ऑगस्ट १९०९ ला ते निवेदन जगभरात प्रसिद्ध झाले. तेच निवेदन १८ ऑगस्ट १९०९ ला लंडनमध्येही प्रसिद्ध करण्यात आले. या निवेदनाचा मथळा होता “चॅलेंज”

असा हा धीरोत्तर वीर क्रांतिकारक “पेंटनव्हिले” तुरुंगात १७ ऑगस्ट १९०९ ला हसतहसत देशासाठी फासावर गेला. यावेळी आयर्लंडमध्ये “आपल्या  देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे बलिदान देण्याऱ्या धिंग्राचा आयर्लंड सन्मान करते” अशा आशयाची पोस्टर्स जागोजागी लावण्यात आली होती.

पण ब्रिटिशांनी मात्र धिंग्रांच्या मृत्यूनंतरही कहर केला तो म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा देह ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या जे. एल. माथूर यांना देह देण्यास साफ नकार देण्यात आला व तुरूंगातीलच मोकळ्या आवारात त्यांचे दफन करण्यात आले.

देशासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या या महान क्रांतिवीराला तमाम भारतीयांचा सलाम !

Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close