ब्लॉगकथाजगलाईफ स्टाईलवैयक्तिक ब्लॉग

कोंढाणा आधीपासूनच होता “सिंहगड”!

कोंढाण्याचा रणसंग्राम ज्यात सुभेदार तानाजी मालुसरे यांनी अवघ्या पाचशे मावळ्यांसह बाराशे गडकरींवर मात करून गड जिंकला. ही गाथा आहे तानाजी मालुसरे यांच्या अफाट शौर्याची आणि अतुल पराक्रमाची!

किल्ले कोंढाणा स्वराज्यात का हवा होता?
कोंढाणा का अवघड होता जिंकायला?
तानाजी मालुसरे यांनी कडा चढून जायला घोरपडीचा वापर केला होता का?
कोंढाणाला सिंहगड हे नाव शिवरायांनी दिले कधी दिले?

या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखा मध्ये मिळतील आणि त्यासाठी तुम्हाला हा लेख पूर्ण वाचावे लागेल. राजगडाच्या ईशान्येला अवघ्या सहा कोसांवर कोंढाणा किल्ला होता. बारा मावळ प्रदेशाचे मध्यवर्ती केंद्र असलेला हा कोंढाणा किल्ला प्रजेच्या स्थैर्यासाठी स्वराज्यात असणे अत्यंत गरजेचे होते. पुरंदर किल्ल्या प्रमाणेच कोंढाणा किल्ल्याचे महत्त्व फार होते. ह्या किल्ल्याचे महत्व केवढे होते याची प्रचिती हा लेख वाचताना तुम्हाला येईलच.

विजापूरच्या आदिलशाही बादशहाने शहाजीराजांना कैद केल्यावर त्यांच्या सुटकेसाठी शिवाजीराजांना ते राजकारण करावे लागले त्या राजकारणात हा किल्ला विजापूरकरास परत द्यावा लागला. मिर्झाराजा जयसिंगाने स्वराज्यावर स्वारी केली, त्यांच्याबरोबर झालेल्या तहामध्ये जे २३ किल्ले शिवाजीराजांनी मुघलांना द्यायचे ठरविले. या दोन्ही गोष्टींवरून किल्ल्याचे महत्त्व स्वराज्याच्या रक्षणासाठी किती महत्त्वाचे होते हे दिसून येते.

एके दिवशी जिजाऊ शिवरायांना म्हणाल्या, “शिवबा… समोरच्या कोंढाण्यावर मुघलांचे हिरवे निशाण फडकत आहे. हा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही. तो परत घे.” कोंढाणा आपल्या स्वराज्यात असावा असे शिवरायांना मनापासून वाटत होते.

ते कोंढाण्यावर स्वारी करण्यासाठी सज्ज झाले. शिवरायांबरोबर बालपणापासून, शत्रूची खांडोळी करणाऱ्या तानाजी मालुसरे यांना आपण असताना महाराज कोंढाण्यावर स्वारी करणार, हे मानवले नाही. त्यावर तानाजी म्हणाले, महाराज आम्ही जिवंत असताना असल्या जिवावरच्या कामगिरीवर आपण जाणार? मग आम्ही कशाला?

ते काही नाही. “आधी लग्न कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे!” मीच कोंढाणा जिंकणार! मला आशीर्वाद द्या! महाराजांनी ही कामगिरी तानाजी मालुसरे यांना दिली.

चार दिवसावर आलेले रायबाचे लग्न रद्द करून, तानाजी मालुसरे आपल्या मावळ्यांसह राजगडावरून खाली उतरले. तो दिवस होता ३ फेब्रुवारी १६७०. गड सोपा नव्हता, जिंकण्याची कामगिरीही ही सोपी नव्हती कारण किल्लेदार जातीचा राजपूत होता.

राजस्थानमधील जोधपूरच्या भिनय गावात राठोड वंशात त्याचा जन्म झाला होता. मोठा समशेरबहाद्दर, कडवा मर्दाना, त्याचं नाव होतं उदयभान राठोड.

३८ वर्षाचा उदयभान अत्यंत शूर होता. आज तो कारभारात अतिशय कडक होता. किल्ल्यावर व घेर्‍यात त्याची जरफ फार होती. वेळप्रसंगी तो लोकांची मुंडकी छाटावयासही मागे फिरत नसे. औरंगजेबाचा तो एकनिष्ठ सरदार होता. किल्ल्यावर जवळजवळ दीड हजार हत्यारबंद राजपुतांची कडवी शिबंदी होती. तोफा होत्या, बारूद गोळा, बंदुका आणि रसल गच्च भरल्या होत्या.

ऐकून मुकाबला कठीण होता. महाराजांना काहीही करून कोंढाणा हवा होता. सुभेदार तानाजी मालुसरे यांनी कामगिरीचा विळा उचलल्यामुळे महाराजांना आता कोणतीच काळजी उरली नव्हती. तानाजीच्या मदतीला त्यांचा प्रत्यक्ष पाठचा भाऊ उभा होता. त्याचं नाव सूर्याजी. सूर्याजी म्हणजे जणू धाकटा तानाजीच. तसाच शूर आणि धाडसी. लहानपणापासून ज्यांनी सांभाळले असे शेलार मामा या दोघांची खंबीर साथ तानाजी मालुसरे यांना होती.

गडाचा आकार काहीसा कुऱ्हाडी सारखा होता. पुण्याच्या दिशेने जो दरवाजा होता त्याला पुणे दरवाजा असे म्हणतात आणि खेड शिवापुर च्या दिशेला जो दरवाजा आहे त्याला कल्याण दरवाजा असे म्हणतात. या दोन दरवाज्यांशिवाय गडामध्ये शिरायला दुसरी वाट नाही.

गडाच्या सर्वांगाला सर्वत्र उभे खोल-खोल कडे होते. तटबंदी अगदी पक्की होती. विशेषता कलावंतीच्या बुरुजापासून दक्षिणेच्या झुंजार बुरुजापर्यंत फारच कडक बाजूबंद घातला होता. गडाखाली शत्रू आला तर त्याच्यावर मारा करण्यासाठी तोफा-बंदुकाना माऱ्याच्या जागा ठेवलेल्या होत्या, त्याला जंगा म्हणत. काही बाजूला साधी गडग्याची तटबंदी होती काही बाजूला मुळीच तटबंदी नव्हती. पश्चिमेच्या बाजूला गडाला एक कडा होता, तो कडा इतका ताठ होता ठीक तिथून खाली वाकून बघणे ही भितीदायक वाटे. त्याचे नाव होते द्रोणागिरी कडा.

या कड्याच्या अवघडपणा मुळे शत्रूचे तिकडून वर चढण्याचे भय बिल्कुल नव्हते. म्हणून त्याबाजूला पक्की तटबंदी घालावी हे कोणालाही गरजेचे वाटले नाही. गडाच्या याच बाजूला फारसा राबता नव्हता. चौक्या, पहारी नव्हते गडाची हीच बाजू बळकट होती आणि नेमकी तानाजींना पश्चिम कड्याची बाजू नाजूक वाटली आणि त्यांनी येथूनच वर जाण्याचे ठरविले. गडाचे पहारी नेहमीप्रमाणे दक्षतेने गस्ती घालीत होते. गडाचे दरवाजे बंद होते. रात किड्याशिवाय आणि गडावरच्या राखणदार शिवाय सारा गड शांत होता. गडाच्या पश्चिमेकडील दरीत मध्यरात्री कोणतीही चाहूल न देता मावळे पुढे – पुढे सरकत होते.

५०० मावळ्यांची तुकडी घेऊन तानाजी व सुर्याजी नवमीच्या गडद रात्री अगदी गुपचूप लपतछपत द्रोणागिरी च्या भयान दरीत उतरले. हे लोक कुठून आले, हे आज पर्यंत इतिहासाला सांगता आलेले नाही. तानाजी सर्वांसह या बिकट कड्याच्या जवळ येऊन पोहोचला. काय करायचे, कसे जायचे हे आधीच ठरले होते. त्याप्रमाणे तानाजींनी तरबेज मावळ्यांना त्या कड्यावरून वर चढण्यास सांगितले. मावळ्यांनी कड्यावर झाप टाकली आणि खाच्या खळग्यात हात घालून यांनी कडा चढायला सुरुवात केली.

तानाजी खालीच उभे होते. काळ्या कुट्ट अंधारातून ते मावळे वर गेलं आणि पोहचले. त्या मावळ्यांनी वर पोचता क्षणी वरून खाली माळ सोडली. लगेच तानाजी व त्याच्या सोबत चे मावळे, त्यामुळे वरून सरसर चढत वर गेले. एवढ्यात गडावरच्या गस्ता करणाऱ्या शिपायांना चाहूल लागली, कुणीतरी परके लोक गडावरती शिरले आहेत. असा त्यांना संशय आला आणि गडावरती एकच आरडाओरडा सुरू झाला.

तानाजी व त्यांच्या मावळ्यांनी एकदम वीरश्रीने हर हर महादेव म्हणून शत्रुची कापाकाप करण्यास सुरुवात केली. न भूतो न भविष्यती असा एकदम छापा पडला. गडावर एकच भयानक कल्लोळ उसळला. असंख्य मशाली पेटल्या, राजपुतांची धावाधाव उडाली. किल्लेदार उदयभान ला ताबडतोब या अचानक झालेल्या हल्ल्याची खबर मिळाली. तो योद्धा आश्चर्याने व संतापाने बेभान होऊन ढाल-तलवार घेऊन लढाई करण्यास धावला.

कल्याण दरवाजा समोर सूर्याजी आपल्या मावळ्यांना घेऊन थांबला होता. तो गडाचा दरवाजा उघडण्याची वाट पाहत होता आणि कुणीतरी आतून दरवाजा उघडला. आता सूर्याजी ही तानाजीच्या मदतीला आला होता.

गडावरच्या शिपायांना समजेना की हे भयंकर मराठी मावळे आले तरी कुठून?, केव्हा? आणि आहेत तरी किती? बंदूक वाले, बारकंदाज निशान साधावयास चालून आले, तिरंदाज, तोफावरचे गोलंदाज, पटाईत, भालाईत, आडहत्यारी आपली हत्यारे सावरून फुंकलेल्या रणगणा कडे धावले.

उदयभान बेभान होऊन लढत होता, आजवर इतकी सावधगिरी ठेवून, कडक बंदोबस्त राखूनही हे मराठे गनिम गडात घुसलेत तरी कसे? माणसे नव्हे ही शैतान आहेत. असे उदयभान ओरडू लागला.

तानाजी सूर्याजी यांनी तर तोडणी लावली होती. आपल्यापेक्षा शत्रु तिप्पट आहे याची त्यांना जाणीव होती. मराठ्यांच्या समशेरी निर्धाराने वेड्यापिशा होऊन विजेगत फिरत होत्या. शत्रूचे सैन्य अफाट असूनही मावळ्यांच्या धारेखाली मुंडकी सपासप उडत होती. मावळेही जखमी होत होते, काही मरातही होते पण त्यांचे शत्रूच्या मनाने फारच थोडे होते.

हत्यारांचा आवाज आणि लोकांचा आक्रोश याशिवाय काहीही कानांना ऐकू येत नव्हते आणि डोळ्यांना दिसत नव्हते. तानाजी आणि उदयभान दोघेही ही भडकलेल्या आगी प्रमाणे शौर्याने लढत होते आणि आणि त्या वादळी युद्धात, झुंजणाऱ्या या पिसाळलेल्या दोन सिंहांची अचानक समोरासमोर गाठ पडली. जणू दोन प्रचंड गिरीशिखरे एकमेकांवर कडाडून कोसळली.

तलवारींचे भयंकर घाव एकमेकांवर थडकू लागले, दोघेही जबरदस्त योद्धे होते. कोण कोणावर भारी होता हे सांगणे कठीण होते. दात खाऊन व बळ पणाला लावून हे दोघे पण एकमेकांवर आवेशाने तलवारींचे घाव घालत होते. एकाला गड घ्यायचा होता तर दुसऱ्याला तो द्यायचा नव्हता. दोघांनाही एकमेकांचे प्राण हवे होते.

मुघलशाहीची आणि शिवशाहीची कोंढाणा किल्ल्यासाठी अटीतटीची झुंज लागली होती. इतर मावळ्यांचीही पराकाष्ट चालली होती. सूर्याजी ही शर्त करत होता. तेवढ्यात तानाजीच्या ढालीवर उदयभानचा एक घाव असा कडकडून कोसळला की तानाजी ची ढाल खाडकन तुटली. बिन ढालीच्या शत्रूवर घाव घालायला आणि त्याची खांडोळी पाडायला उदयभान आसुसला.

तानाजींनी आपल्या कमरेचा शेला डाव्या हाताला गुंडाळला आणि उदयभानचे घाव आपल्या डाव्या हातावर घ्यायला सुरुवात केली. स्वतः त्यांनी उदय भानावर इतक्या त्वेषाने घालायला सुरुवात केली की, जणू विजा कोसळू लागल्या. डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच आक्रोश उठला. तानाजीच्या वज्रघातीचा तडाका उदयभानाला बसला. उदयभानच शिलाग्राही प्रहार तानाजीला बसला. दोन्ही ही महा शिखरे जमिनीवर कोसळली.

हातात ढाल असूनही उदयभान जमिनीवर कोसळला. एका क्षणी दोघेही तुकडे होऊन जमिनीवर पडले. तानाजी पडला, मावळ्यांची चढाई जोरात चालू होती, पण सुभेदार पडल्याची हाक उठली. सुभेदार पडले! आता कसे व्हायचे मावळ्यांचा धीर दोर तुटल्यागत खचकन तुटला, हाय खाल्ली! आणलेला डाव हातचा सुटला. मावळ्यात एकच बोंब उठली आणि पळापळ सुरू झाली. सूर्याजी दचकला, सक्का भाऊ गेला पण सर्व मावळे पळता आहेत हे पाहून, तो तसाच धावला आणि पळत्या मावळ्यांच्या पुढे आडवा उभा राहिला.

सूर्याजी कडाडला, तुमचा सुभेदार येथे मरून पडला असताना तुम्ही पळून जाता, ना मर्दासारखे पळून जाण्यापेक्षा लढून मरा. तुमचा सरदार पडला म्हणून काय झाले? तुम्ही अवलाद कुणाची? जग काय म्हणेल तुम्हाला? महाराज काय बोलले होते गड जिंकून दाखवा. फिरा माघारी.

तेवढ्यात आलेला बाण सुर्याजीने आपल्या छातीने रोखला ही मावळ्यांना अवसान चढले. सगळे मावळे पुन्हा उलटले एकसाथ राजपूतांवर तुटून पडले. सूर्याजी ने भाऊ पडल्यावर हिंमत दाखवून उरलेले राजपूत झोडपून काढण्यास सुरुवात केली नव्या उमेदीने आलेला हल्ला राजपुताना आवरेना. तानाजी पडेपर्यंत जवळजवळ पाचशे राजपूत ठार झाले होते, घनघोर युद्ध माजले होते, हजारांच्यावर गडकरी मेले उरलेल्यांना पळता भुई थोडी झाली.

अनेक राजपूत कड्यावरुन पडून मेले आणि किल्ला काबीज झाला. कोंढाणा किल्ल्यावर भगवा झेंडा फडकला. गड फत्ते झाला. पहाटे तीनच्या सुमारास गड मावळ्यांच्या ताब्यात आला. तो दिवस होता ३ फेब्रुवारी १६७०.

सेनापति मृत्युमुखी पडला तरी शिवरायांचे मावळे स्वराज्यासाठी मागे हटले नाहीत. गवताच्या गंजी पेटवून कोंढाणा जिंकल्याची वार्ता राजगडावर शिवराय व जिजाऊंना देण्यात आली.

इकडे राजगडावर कोंढाणा सर करणाऱ्या तानाजी मालुसरे यांची जोरदार स्वागत करण्याची तयारी सुरू झाली. तानाजी ला घेऊन येण्यासाठी मानाची पालखी पाठवण्यात आली. राजगडाच्या सुवेळा माचीवर तानाजी चा सरकारी वाडा होता, रायबाचे लग्न उमरट येथे होणार असल्यामुळे त्यांचा मुलगा व पत्नी उमरट जाण्यासाठी उत्सुक होते.

कोंढाण्याच्या कामगिरीसाठी तानाजींनी आपल्या एकुलत्या एक मुलाचे लग्न पुढे ढकलले होते. शिवरायांनी पाठवलेल्या पालखीमध्ये तानाजींचा मृतदेह ठेवून राजगडावर पद्मावती माची वर आली. त्याच्या सोबत असलेला तानाजीचा भाऊ सूर्याजी, हिरोजी फर्जंद, शेलार मामा, खंडोजी नाईक बरोबर होते. हे मावळे काहीही बोलत नव्हते.

जिजाऊ स्वतः सदरच्या पायऱ्या उतरून खाली आल्या त्यांच्यासोबत महाराज देखील होते. त्यांच्यासोबत तानाजीचे पत्नी आणि मुलगा रायबा स्वागतासाठी उभे होते. माय लेखाने पालखीत असलेल्या तानाजीचा रक्ताने माखलेला चेहरा पाहिला, त्यावर पांढरे वस्त्र टाकले होते, डोक्यावर सरदारी फेटा होता.

दारावर उभ्या असलेल्या जिजाऊंना पालखी जवळ आल्यावर खरा प्रकार कळला. मोठ्या धीराने महाराजांनी या सर्वांचे सांत्वन केले. शिवरायांना आपल्या परमप्रिय मित्राच्या निधनाने खूप दुःख झाले, गड ताब्यात आला पण सिंहासारखा शूर तानाजी गेला. खूप हळहळले आणि म्हणाले “गड आला पण, सिंह गेला”.

महाराजांनी आपल्या गळ्यातील राजमाल तानाजीच्या देहावर ठेवली. जिजाऊने तानाजीच्या मृतदेहाला पंचारतीने ओवळून अंतिम दर्शन घेतले. शिवराय तानाजीच्या पत्नी, मुलगा, भाऊ सूर्याजी, शेलार मामा सहित हजार मावळे तानाजी चा मृतदेह घेऊन उंबरट ला निघाले.

त्यांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करुन महाराज राजगडावर आले, या डोंगर घाटातून तानाजीचा मृतदेह कोकणात नेण्यात आला होता त्याचे मढे घाट असे नाव पडले.

तानाजी कोंढाण्यावर मरण पावला म्हणून मग महाराजांनी कोंढाण्याचे नाव सिंहगड ठेवले असे मात्र मुळीच नाही. सिंहगड हे नाव पूर्वीपासूनच कोंढाण्याला मिळाले होते. तानाजीच्या मरणा पूर्वीच्या दिनांक ३ एप्रिल १६६३ च्या पत्रामध्ये मोरोपंत पिंगळे व निळोपंत मुजुमदार यांना लष्करी व खास किल्ले हशमान सह, सिंहगडावर खबरदार राहण्याचा हुकूम महाराजांनी दिला होता. म्हणजेच सिंहगड हे नाव नवीन नाही.

Tags
Show More

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close