आसाममधील माजुली बेट नष्ट होण्याच्या मार्गावर

0
20


वृत्तसंस्था, माजुली

ब्रह्मपुत्रा नदीमधील माजुली बेट नष्ट होण्याच्या मार्गावर असून, २०४० पर्यंत हे बेट पूर्णपणे नाहिसे होईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. नदीला अधिक मोठ्या प्रमाणावर पूर आल्यामुळे हा परिणाम होणार असून, नदीकिनारी राहणाऱ्यांनाही त्याचा धोका पोहोचणार आहे.

ब्रह्मपुत्रा नदी हिमालयातून वाहत येते. या नदीचे पात्र सुमारे २९०० किमीचे असून, ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते. या जलमार्गावर अनेक जण अवलंबून आहेत. मात्र, हवामान बदलामुळे मान्सूनच्या काळात नदीला पूर येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा नदीकिनारी राहणाऱ्यांच्या जीवनावर मोठा परिणाम होणार आहे.

माजुली बेटावर सुमारे १ लाख ७० हजार लोक राहतात. मानवी गैरव्यवस्थापनामुळे निर्माण झालेल्या समस्येचा परिणाम येथील रहिवाशांवर होण्याची भीती आहे. पुरामुळे या बेटाचा अधिकाधिक भाग दीर्घकाळ पाण्याखाली जात आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत असून, बेटावरील जमीन नापीक होत आहे. पाऊस आल्यावर बेटावर राहणारे मिशिंग आदिवासी लोक आपल्या जनावरांना घेऊन उंचावरील भागात स्थलांतरीत होतात. मात्र, येत्या काळात स्थलांतरीत होण्यासाठी त्यांना जागाच शिल्लक राहणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘आम्ही नदीवर प्रेम करतो. मात्र, मात्र एक दिवस ती आमची जमीन गिळून टाकेल याची आम्हाला कल्पना आहे. ब्रह्मपुत्रेने शांत व्हावे आणि आम्हाला येथे राहता यावे, अशी प्रार्थनाच केवळ आम्ही करू शकतो,’ असे येथील शेतकरी सुनील मिली सांगतात. सुनील मोहरी आणि भाताचे पीक घेतात.

जागतिक तापमान वाढीमुळे निर्माण झालेले प्रतिकूल हवामान, तसेच अपुऱ्या पर्यावरण नियोजनामुळे भारतात सर्वच भागांत पाणीसमस्या निर्माण झाली आहे. त्याचा फटका लाखो लोकांना बसत आहे. देशात दुष्काळ, अतिवृष्टी, समुद्र आणि नद्यांच्या पातळीत वाढ अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. ‘देशाची लोकसंख्या २०५०पर्यंत १ अब्ज ६० कोटींपर्यंत जाणार आहे. त्यामुळे पाण्याची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे,’ असे जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे म्हणाले.

माजुली बेटाचे क्षेत्रफळ

१८९०मध्ये — आता

१२५० चौ. किमी — ५१५ चौ. किमी

१०,०००

कुटुंबांचे बेटावरून

१२ वर्षांत स्थलांतर

येत्या १५-२० वर्षांत माजुली बेट पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता, माजुली बेट संरक्षण आणि विकास परिषदेने व्यक्त केली आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here