आरोग्यतंत्रज्ञानब्लॉगलाईफ स्टाईल

होमिओपॅथी पायवाट

होमिओपॅथी हे म्हटले तर अत्यंत अवघड शास्त्र आहे. म्हटले तर सोपे तंत्र आहे. सोपे एवढ्याचकरिता की वैद्यकीय ज्ञान नसलेल्या माणसानेसुद्धा केवळ लक्षणानुसार पुस्तकात पाहून दिलेल्या औषधामुळे कित्येक अवघड समस्या सुटताना दिसून येतात.

तसेच औषधे अतिशय प्रभावी असल्यामुळे त्यांचा गुण त्वरित दिसून येतो. या औषधांचे दुष्परिणाम क्वचित येत असल्यामुळे ती सुरक्षित ठरतात.

या सर्व कारणांमुळे ठराविक मर्यादेत घरच्या घरी उपचार करण्यासाठी ही औषधे फार सोयीची आहेत, हे लक्षात घेऊनच डॉ. हानिमान यांनी वैद्यकीय पदवी नसलेल्या काही तळमळीच्या विद्यार्थ्यांना आपले अनुयायित्व दिले.

ही गोष्ट ध्यानात घेऊन डॉ. हानिमान यांनी आपले ‘ होमीयोपॅथीक डोमेस्टिक फिजिशियन’ अर्थात ‘होमियोपॅथीचा घरगुती वैद्य’ या नावाचे एक अतिशय उपयुक्त पुस्तक लिहिले. अनेक वेळा प्रथमोपचार आणि काही वेळा पूर्ण उपचार म्हणून त्यातील मार्गदर्शन उपयुक्त ठरते.

होमिओपॅथीची तत्वे समजण्यास गूढ आणि व्यवहारात आणण्यास कठीण असल्यामुळे तिच्या लोकप्रियतेला सर्वकाळ मर्यादा राहिली आहे. अशा विद्येच्या इतिहासातील काही विशेष कर्तृत्व आपल्याला समजले तर तिच्यावरील आपला विश्वास खचितच वाढेल.

होमिओपॅथीच्या विकासाची वाट अशी ऍलोपॅथीच्या अडथळ्यामधूनच गेलेली आहे. या औषधांच्या सुपरिणामांमुळे या पंथाकडे वाळलेल्या आणि पुढे त्या पंथांच्यासंशोधनात भर घालणाऱ्या शेकडो डॉक्टरांच्या सुरस पण सत्य कहाण्या होमिओपॅथीच्या इतिहासात आपल्याला आढळतात.

होमिओपॅथीच्या विकासातील आणखी एक टप्पा पाहणे येथे आवश्यक आहे. एका वेळी अनेक औषधे दिली तर ती एकमेकांचा प्रभाव कमी करतात या निरीक्षणावरून डॉ. हानिमान यांनी एका वेळी एकच औषध वापरण्याच्या तत्वावर भर दिला.

परंतु सर्व लक्षणांशी जुळेल असे एकाच औषध शोधून काढण्यासाठी रुग्णांकडून आवश्यक ती बारीक सारीक माहिती मिळणे आणि त्या सर्व माहितीचा सारासार विचार करून औषधांची योजना करणे ही तितकीशी सोपी गोष्ट नाही.

डॉ. हानिमाण यांच्यासारख्या विलक्षण बुद्धीचातुर्य आणि दैवी गुण असणारा मनुष्यच केवळ तीस शक्तीपर्यंतची अवघी दीडशे औषधे उपलब्ध असताना अनेक असाध्य रोगी बरे करू शकत असे.

आज दीड हजार औषधे उपलब्ध आहेत. परंतु केवळ एकाच औषधाने प्रत्येक रुग्णाला संपूर्ण आराम देऊ शकणार होमिओपॅथिक डॉक्टर विरळच.

डॉ. हानिमान यांच्या हयातीत त्यांचे एक शिष्य डॉ. एजिडी यांनी एका वेळी अधिक औषधांचा वापर करणे काही दीर्घकालीन असाध्य लक्षणांच्या वेळी आवश्यक ठरते हे डॉ. हानिमान यांना पटवून दिले.

त्यानंतरच्या काळात या शास्त्रातील संशोधन जसजसे प्रगत होत गेले तसतशी कोणती औषध एकमेकांना पूरक ठरतात, कोणती परस्परांना मारक ठरतात, एखाद्या औषधाचा दुष्परिणाम दिसून आला तर तो कमी करण्यासाठी अन्य कोणती औषधे पाठोपाठ दिली तरी चालतील किंवा उपकारक ठरतात, अश्या विविध दृष्टिकोनात बहुसंख्य औषधांविषयी नोंद करण्यात आली आहे. त्याचा व्यवहारात फार उपयोग होतो.

या ज्ञानाच्या आधारे एका लक्षणासाठी किंवा रोगासाठी दोन किंवा अधिक औषधांची मिश्रणे काही वेळा वापरली जातात. अर्थात ही व्यावहारिक तोडजोड झाली, होमिओपॅथीच्या मूळ तत्वाला धरून हे नाही.

परंतु प्रत्येक्षात असे अनेक वेळा करावे लागते हे लक्षात घेऊन डॉ. एरीक पॉवेल यांनी अशा मिश्रणाचा अभ्यास सुरु केला. ते स्वतः होमिओपॅथी आणि वाराक्षर पद्धतींचे तज्ञ होते. परंतु एकाच औषध प्रत्येकवेळी अचूकपणे शोधून काढणे कठीण पडते असे त्यांच्या लक्षात आले.

आपल्या पुस्तकात त्यांनी तसे प्रामाणिकपणे नमूद केले आहे. रुग्णांच्या अनेक लक्षणांशी जुळतील अशी एकापेक्षा अधिक औषधे निवडून त्यांची मिश्रणे वापरण्यास त्यांनी सुरुवात केली. रुग्णांच्या सर्व लक्षणांची सविस्तर नोंद घ्यावयाची तर खूप वेळ द्यावा लागतो, तेवढा वेळ नेहमीच उपलब्ध नसतो.

तसेच त्या माहिती वरून एकच औषध शोधून काढण्यासाठी बराच अवधी लागतो. या काळात दोन अप्रिय गोष्टी घडण्याची शक्यता असते. एक म्हणजे रुग्णाला त्वरित उपचार न मिळाल्यामुळे त्याचे दुखणे वाढीस लागण्याची शक्यता, आणि दुसरे म्हणजे तो रुग्ण कंटाळून होमिओपॅथीचा नाद सोडून देण्याचा धोका. ते टाळण्यासाठी आपण मिश्रणाचा व्यवहार सुरु केला असे डॉ. पॉवेल म्हणतात.

आपल्या प्रदीर्घ अनुभवावर आधारित “द ग्रुप रेमेडी प्रिस्कायबर” या नावाचे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. त्यात विविध विकारांसाठी उपयुक्त असलेल्या अनेक मिश्रणाची यादी दिली आहे.

भारतामध्ये होमिओपॅथीचा प्रवेश एकोणिसाव्या शतकात झाला. लाहोरचे महाराणा रणजीतसिंह असह्य रोगाने आजारी पडले. सर्व उपलब्ध उपाय थकल्यानंतर डॉ. हॉनिगबर्गर या जर्मन होमिओपॅथी डॉक्टरला त्यांच्या उपचारासाठी आणण्यात आले.

त्याने दिलेल्या औषधांमुळे महाराणा पूर्ण बरे झाले. तेव्हा त्याला अनेक बहुमोल वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या आणि राजवैद्य म्हणून दरबारात त्यांची नेमणूक करण्यात आली. तो दीर्घ काळ भारतात राहिला.

त्यांच्याकडून मुख्यतः होमिओपॅथीचा प्रसार सर्वत्र झाला. पुढे मुंबई आणि पूर्वेला बंगालमध्ये विशेषतः होमिओपॅथी रुजली. बंगालमध्ये आजही होमिओपॅथीला फार महत्व आहे. स्वामी विवेकानंद या औषधांचा पुरस्कार करत असत.

श्रीरामकृष्ण परमहंस यांनी कर्करोगासाठी याच पद्धतीचे उपचार घेतले होते. योगी अरविंद घोष आणि कविवर्य रवींद्रनाथ टागोर हे होमिओपॅथीचे चाहते होते.

होमिओपॅथीचे महत्व पटल्यामुळे ऍलोपॅथीचा त्याग करणारे तज्ज्ञ डॉक्टर्स युरोपप्रमाणे भारतातही खूप आहेत. कलकत्ता येथील डॉ. महेंद्रलाल सरकार, एम. डी. हे असले पहिले डॉक्टर म्हणता येतील. नंतरच्या काळात एम. बी. बी. एस. किंवा एम. डी. पदवी घेतलेले अनेक डॉक्टर्स आपल्या अनुभवामुळे होमिओपॅथीकडे वळले. बंगालमधील डॉ. घोष यांनी अनेक आयुर्वेदिक वनस्पतींचे प्रत्ययन केले.

त्यावर आधारित असे “ड्रग ऑफ हिंदुस्तान” हे पुस्तक त्यांनी १९४४ मध्ये प्रकाशित केले. डॉ. विल्ल्यम बोरिक यांचा “लक्षणकोश आणि निघूट” असे होमिओपॅथीचे जे जगमान्य पुस्तक तयार केले, त्याच्या १९२७ साली निघालेल्या नवव्या सुधारून वाढवलेल्या आवृत्तीत काही हिंदुस्थानी औषधांना अधिकृत स्थान प्राप्त झालेले आहे.

त्यापैकी अशोक वृक्षाच्या सालापासून तयार केलेले औषध कलकत्याच्या डॉ. एन. डी. रॉय यांनी संशोधिलेले आहे. त्याचा उपयोग स्त्रियांचे पाळीचे विकार आणि अर्धशिशीचे डोके दुखणे यावर विशेषतः होतो.

आयुर्वेदामधील अशोकारिष्ठांचे स्त्रीरोगमधील उपयुक्त सर्वश्रुत आहेतच. आणखी एक उपयुक्त औषध म्हणजे ‘सिझेजियम जम्बोलीनम’ अर्थात जांभळाच्या अर्कापासून तयार केलेले औषध होमिओपॅथीमध्ये मधुमेहावरील एक प्रभावी औषध म्हणून त्याची ख्याती आहे.

तसेच ‘जस्टीशिया अधातोडा वसाका’ हे वसाका पासून तयार केलेले औषध खोकला, सर्दी, दमा या विकारांवर गुणकारी मानले जाते.

आयुर्वेदांतील मूळ तत्वांच्या आधारे होमिओ औषधांची योजने करणारे संशोधन डॉ. बिनयतोष भट्टाचार्य यांनी दीर्घ काळ केले. ते मूळचे बंगालमधील, संस्कृत विषयातच पी. एच. डी. झालेले. भारतीय प्राचीन शास्त्रविद्यांची आवड असणारे आणि तोच व्यासंग करणारे असे विद्वान होते.

बडोदा संस्थानातील ओरिएंटल इन्स्टिट्यूटचे प्रमुख, आणि संस्कृतचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली बंगालमधील रहिवासी असल्याने होमिओपॅथीकडे ओढा, संस्कृतज्ञ आणि जिज्ञासू असल्यामुळे आयुर्वेदाचे सखोल ज्ञान आणि नाडी परीक्षेवर प्रभुत्व असे क्वचित एकत्र आढळणारे गुण त्यांच्या जवळ होते.

त्याचा त्यांनी योग्य उपयोग करून घेतला. होमिओपॅथीमधील संशोधक डॉ. हेरिंग यांनी रोग बरे होण्याविषयीचे दोन नियम प्रतिपादिले आहेत.

  • रोग उलट्या क्रमांकाने बरे होतात. म्हणजे उपचार सुरु केल्यानंतर रोग्याला पूर्वी जे रोग झालेले असतील किंवा जी लक्षणे उद्भवली असतील ती प्रथम दूर होतात आणि नंतरच्या काळात निर्माण झालेली लक्षणे सर्वात शेवटी बरी होतात.
  • अंतर्गत अवयवांतील लक्षणे किंवा दोष प्रथम दूर होतात, बाहेरील लक्षणे नंतर बारी होतात; तसेच लक्षणे दुरुस्त होण्याचा क्रम शरीराच्या वरच्या म्हणजे डोक्याकडील भागांकडून खालच्या बाजूला अशा तऱ्हेचा असतो. डॉ. भट्टाचार्य यांना असे जाणवले की आयुर्वेदामधील ‘कफ – वात – पित्त’ हा त्रिदोष सिद्धांत या दोन नियमांशी जुळणारा आहे.

होमिओपॅथीमध्ये रुग्णाच्या पूर्ण व्यक्तिमत्वाचा विचार केला जातो, त्याप्रमाणे आयुर्वेद कफ, वात किंवा पित्त यापैकी कोणत्या प्रकारांत रुग्णाची प्रकृती बसते, किंवा त्याचे व्यक्तिमत्व कसे आहे याचा प्रथम अभ्यास केला जातो.

कफ, वात आणि पित्त या शरीरातील तत्वांचे किंवा दोघांचे उद्दीपन अथवा विविध ऋतूंमध्ये होत असते. उदाहरणार्थ, उन्हाळ्यात पित्त वाढते, वात साठून राहतो आणि कफाचे प्रमाण कमी राहते; तर थंडीत पित्त कमी होते, वात वाढतो आणि कफ साठून राहतो. तसेच पावसाळ्यात पित्त साठून राहते, वाताचे प्रमाण कमी राहते आणि कफ वाढतो.

होमिओपॅथीमध्ये हवामान आणि ऋतूंच्या संदर्भात लक्षणांच्या वृद्धीचा आणि शमनाच अशा प्रकारे विचार मांडलेला आढळतो. डॉ. भट्टाचार्य यांनी आपल्या संशोधनावरून होमिओपॅथीमधील विविध औषधे कफ – वात – पित्त यापैकी कोणत्या दोघांशी निगडित आहेत याची एक विस्तृत यादी तयार केली आहे.

नाडीपरीक्षा करून कफ, वात किंवा पित्त प्रकृतीचे निदान करता येते, त्यांच्या आधारानेही योग्य अशी होमिओ औषधे ते आपल्या रुग्णांसाठी शोधून काढत असत. त्यांच्या संशोधनाचा पुढील भाग आणखी महत्वाचा आहे. विविध औषधांची मिश्रणे देणे कसे उपयुक्त ठरते हे त्यांनी प्रयोगांनी सिद्ध केले, आपले शरीर सप्त धातूंनी उपयुक्त असते, आणि आपण जे अन्न खातो त्याचे रूपांतर कामाने या धातूंमध्ये होत असते, या आयुर्वेदीय विचारावर त्यांचे हे संशोधन आधारित आहे.

रस, रक्त, मास, मेद, अस्ति, शोणित, शुक्र असे हे सप्त धातू अन्नापासून क्रमाक्रमाने एकमेकांपासून शरीरात निर्माण होतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये रोग निर्माण होतो त्यावेळी या सप्तधातूंच्या निर्मिती प्रक्रियेत एकापेक्षा अधिक ठिकाणी बिघाड उत्पन्न होणे शक्य असते. त्यामुळेच केवळ एका औषधाने तो रोग बारा होऊ शकणार नाही, या विचाराच्या आधाराने सात होमिओपॅथीक औषधांची मिश्रणे देण्याचा प्रयोग त्यांनी करून पहिला. तो यशस्वी झाला.

बडोदा येथे आपल्या संशोधनातील अनुभवांवर आधारित पद्धतीने नाडीपरीक्षा करून निदानानुसार अशा मिश्रणाचा उपयोग करून त्यांनी असंख्य रुग्णांना व्याधीमुक्त केले. त्यांचे हे सर्व संशोधन ‘ द सायन्स ऑफ त्रिदोष ‘ आणि ‘ त्रिदोष अँड होमिओपॅथी ‘ या दोन पुस्तकांत त्यांनी मांडलेले आहे.

डॉ. घोष यांच्या ‘दृग्झ ऑफ हिंदुस्थान ‘ या पुस्तकांतील विचारांपासून स्फूर्ती घेऊन पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी या संस्थेने ‘ आयुर्वेद औषधी संशोधिका ‘ १९७७ मध्ये स्थापन केली. आयुर्वेदीय वनस्पतीजन्य औषधे होमिओपॅथीच्या पद्धतीनुसार सूक्ष्म प्रमाणात निर्माण करणे हा या योजनेचा उद्धेश aahe.

त्यामुळे आयुर्वेदानुसार मोठ्या मात्रेत किंवा मोठ्या प्रमाणात काढा, गोळ्या किंवा पूड द्यावी लागत नाही. सूक्ष्मीकारांमुळे मूळ औषधाची शक्ती वाढत असल्याने ते अल्प प्रमाणात होमिओपॅथीसारख्या साबुदाण्याच्या आकाराच्या गोळ्यांच्या स्वरूपात दिले तरी परिणामकारक ठरते.

या संशोधनात औषधांचे होमिओ पद्धतीप्रमाणे प्रत्ययन किंवा प्रूविंग निरोगी स्वयंसेवकांमध्ये करून त्यांना अनुभवास येणाऱ्या लक्षणांची नोंद करण्याचा प्रयोग अद्याप केलेला नाही. आयुर्वेदीय औषधांचे होमीओपॅथीसारख्या गोळ्यांमध्ये रूपांतर करणे हाच मर्यादित उद्देश ठेवून हे प्राथमिक कार्य चालू आहे.

मिरे, कडुलिंब, वावडिंग, ओवा, अशोक, आवळा, इत्यादी बारा वनस्पतींपासून तयार केलेली औषधे सध्या वापरली जात आहेत. या प्रयोगाला चांगले यश लाभले आहे. स्वस्थ, स्वदेशी, सुटसुटीत, सौम्य आणि सुमधुर सूक्ष्म औषधे तयार करणे, हे या प्रकल्पाचे ध्येय आहे.

प्रयोगशाळेतील या कार्यला संशोधकांनी आयुर्वेदातील शास्त्रधारही शोधून काढले आहेत. सुश्रुतसंहिता, भावप्रकाश, चरकसंहिता इत्यादी अनेक ग्रंथांचे परिशीलन करून संशोधनातील मूलभूत विचारांना पुष्टी प्राप्त करून दिलेली आहे. ते विचार असे :-

  1. सूक्ष्म औषधे शरीरात सूक्ष्म भागापर्यंत जाऊन पोहोचतात.
  2. सूक्ष्मीकरणांमुळे पदार्थाची शक्ती आणि गुण वाढतात.
  3. शक्तीवर्धनामुळे औषध अल्प प्रमाणात वापरता येते.

आयुर्वेदाच्या आधाराने होमिओपॅथीमध्ये चालू असलेल्या संशोधनाची दोन अंगे आपण पहिली. होमिओ शास्त्रानुसार या औषधांचे प्रत्येयन किंवा प्रूविंग निरोगी स्वयंसेवकांमध्ये करून आयुर्वेदामध्ये ज्ञात असलेल्या परिणामांव्यतिरिक्त निराळ्या गुणांचीसुद्धा नोंद घेणे हा डॉ. घोष यांनी अंगीकारलेला प्रकार हा एक भाग, तर केवळ होमिओ पद्धतीने औषधांचे सूक्ष्मीकरण करून आयुर्वेदातील गुणांच्याच दृष्टीने ती औषधे वापरणे, हे ज्ञानप्रबोधिनीचे कार्य, हा दुसरा भाग.

या दुसऱ्या प्रकाराने सध्या उपलब्ध असलेल्या ऍलोपॅथीमधील औषधांचे सुक्षमीकरण करून ती वापरण्याचे प्रयत्न सतत चालू आहेत. उदा. स्टेप्टोमायसिन हे प्रतिजीवक किंवा अँटिबॉइटिक गटातील औषध क्षयरोगावरील उपचार म्हणून सर्वाना माहित आहे. ते औषध सतत दीर्घकाळ इंजेकशनच्या रूपाने घ्यावे लागते.

मज्जासंस्था आणि शरीराच्या इतर भागांवर त्याचे दुष्परिणामही काही वेळा होतात. धोकादायक रोगापासून मुक्त होण्यासाठी रुग्ण तो त्रास सहन करतो . परंतु या औषधाचे सूक्ष्मीकरण करून ते वापरले तर काही वेळा त्यांचे उपकारक परिणाम दिसून येतात आणि दुष्परिणाम टाळता येतात. अर्थात ही गोष्ट फक्त होमिओ डॉक्टरांना किंवा होमिओ औषध विक्रेत्यांचा माहित असते, त्यामुळे या उपचारांचा प्रयत्न फारशा रुग्णांमध्ये केला जात नाही.

असेच दुसरे उदाहरण कोर्तीसोन किंवा स्टिरॉइड या औषधांचे देता येईल. हे औषध त्वचारोग, दमा किंवा संधिवात या विकारांसाठी अनेक रुग्णांना दीर्घकाळ दिले जाते. त्यांचे अनेक दुष्परिणाम संभवतात, रुग्णांना भोगावे लागतात. हेच औषध सूक्ष्मीकरणाने होमिओ औषधाच्या स्वरूपात वापरले तर काही वेळा त्याचे दुष्परिणाम कमी करता येतात, एवढेच नव्हे, ते औषध थोड्या प्रमाणात आणि अगदी अल्प काळ वापरून मूळ रोग बरा होऊ शकतो.

आधुनिक पाश्चात्य वैद्यकशात्राप्रमाणे होमिओपॅथीमध्ये रोज नवी यंत्रे, अभिनव तंत्रे आणि प्रभावी कृत्रिम रासायनिक औषधे उदयाला येत नाहीत. त्यामुळे डोळे दीपऊन टाकणारा झगमगाट होमिओपॅथीमध्ये नाही. परंतु या शात्राच्या विकासाची आणि संशोधनाची क्षितिजे अमर्याद आहेत याची थोडी जाणीव वरील विवेचनावरून होऊ शकेल.

– दिपीका आडकर

Follow करा – Facebook

Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close