Connect with us

साहित्य

दक्षिण कोकणची कशी म्हणून ओळखली जाणारे आंगणेवाडी

Published

on

aanganewadi

सिंधुदुर्ग म्हटला की सगळ्यात पहिला लक्ष जातो तिथल्या समुद्रकिनाऱ्यावर आणि देवगड च्या हापुस आंब्यावर. पण त्याच बरोबर तिथल्या खड्या, नाले आणि मंदिर. सिंधुदुर्गातील प्रत्येक गावा मध्ये कमीत कमीत एक मंदिर तर असतंच. आंगणेवाडी आणि कुणकेश्वर या देवस्थानाची जत्रा तर खूपच प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो संख्येने लोक या देवस्थानांना भेट देतात आणि जत्रे च्या वेळी मुंबई आणि उपनगरातून तसेच महाराष्ट्राच्या कान कोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने चाकरमानी गावी येतात, त्याचप्रमाणे देवीचे इतर भक्त ही नचुकता येतात.

तर आज आपण सिंधुदुर्गातील अशाच एका प्रसिद्ध ठिकाणांची आपण आज माहिती घेणार आहोत. की काय आहे आंगणेवाडी आणि तसेच जाणून घेणार आहोत मंदिराचा आणि देवीचा इतिहास व इतर गोष्टींचा आढावा या लेख मार्फत घेणार आहोत. 

आंगणेवाडी आई भराडी देवी –

दक्षिण कोकणची काशी मसुरे आंगणेवाडीची देवी भराडी ही नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते. भराडी देवीचा महिमा अगाध आहे. तिच्या भक्तगणांच्या भक्तीचा मळाच असा रसरशीत, भावभक्तीने चिंब झालेला, की हे सारे पहिले म्हणजे आई भराडी देवी ही भक्तांच्या नवसाला पावणारी तर आहेच, पण दक्षिण कोकणच्या या पुण्यभूमीने कधी काळी भवानी मातेला साकडं घातलं असेल, नवस बोलला असेल म्हणूनच तुळजापूरची भवानीच स्वत्व रूपाने आंगणेवाडीच्या अवतरली असणार असे वाटल्या वाचून राहत नाही. भराडी आईचा यात्रोत्सव म्हणजे या पुण्यभूमीने बोललेल्या नवसाची फेडच असावी असे वाटू लागते आणि याही अर्थाने ही देवी माझी नवसाची असे वाटू लागते.

आंगणेवाडीच्या भराडी देवीबाबत अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. असंही सांगतात की, आंगणेवाडीतील एक जण चिमाजी आप्पा यांच्या सेवेत गुप्तहेरांचे काम करीत असे. त्यांचा स्वामी निष्ठेवर प्रसन्न होऊन श्री तुळजा भवानी देवी आंगणेवाडीच्या भरडावर प्रकट झाली. ही देवी या अंगाने नामक पुरुषाला दिसली नाही. परंतु त्याच्या गाईने हि पाषाणरूपी देवी दाखवून दिली. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार ही देवी तांदळाच्या वाड्यातून भरड माळावर प्रकट झाली. म्हणून अंगाने मंडळी गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून वडे देतात. अशा अनेक आख्यायिका असलेली आई भराडी देवी लाखो भक्तगणांची श्रद्धा असून नित्यनियमाने नवसाला पावते. साक्षात तुळजाभवानीच कोकणच्या नवसाला पावन होऊन भराडी रूपाने प्रकटली.

आंगणेवाडीचा यात्रोत्सव आई भराडी सांगेल त्याच दिवशी होतो. देवदेवतांच्या जत्रा-यात्रा महाराष्ट्रात आणि देशातही ठिकठिकाणी होतात. परंतु भराडी देवीच्या यात्रेचे वैशिष्ट्य असे की जत्रेची तारीख देवी देते अन त्यावर्षी त्या तारखेला यात्रोत्सव येतो.

देवदिवाळीच्या दुसऱ्या दिवशी डाळप होते. तिसऱ्या दिवशी प्रमुख आंगणे मानकरी देवळात जमतात. वंशपरंपरागत असले तरी दरवर्षी क्रमाने चार नवीन मानकरी निवडले जातात. हे मानकरी तांदूळ लावून देवीला कौल लावतात. “शिकारेक संपूर्ण गाव जमतलो शिकार करूक तू हुकूम दे, शिकार साध्य करून दी असं गाऱ्हाणे घालून कौल लावतात. पाषाणाला तांदूळ लावून उजवा कौल मिळण्याची वाट बघतात. कौल मिळायला कधी दोन – तीन तास लागतात तर कधी चार-पाच दिवसही लागतात. शिकारीला बाहेर पडण्याचा हा कौल मिळताच सारा गाव शिकारीसाठी बाहेर पडतो. तीन-तीन, चार-चार दिवस लागतात, शिकार साध्य झाल्याखेरीज ते घरी परतत नाहीत. या पारध करण्याकरिता आचरा, पिरवाडी, शेलटी, वेरली, महान, मसुरे पंचक्रोशीतील जंगलभाग पालथा घालतात. शिकार ही डुकरांचीच करायची असते. डुकराची शिकार साध्य झाली की पारध वाजत गाजत मंदिरापाशी आणतात. ज्यांच्या गोळीने शिकारीचा वेध घेतला त्याला मनाचा विडा दिला जातो. मंदिराच्या उजव्या बाजूला पातोळी आहे. तिथे डुकराचे मांस सुटे केले जाते आणि कोष्टी प्रसाद म्हणून हे मांस सर्वाना वाटले जाते. एकदा हा कार्यक्रम संपला की, जत्रेची तारीख देवी कडून मागण्याचा दुसरा टप्पा सुरु होतो. शिकार साधल्याच्या तिसऱ्या दिवशी गाव पुन्हा देवळात जमतो. काही धार्मिक विधी होतात. देवीपुढे पंचाग ठेवले जाते आणि तारीख ठरवून देवीचा कौल मागिताला जातो. देवीने कौल देताच जत्रेची तारीख निश्चित होते आणि हि तारीख वाऱ्याच्या वेगाने संपूर्ण महाराष्ट्रात व लगतच्या राज्यात पसरते.

देवीचा कौल घेऊन रानडुकराच्या शिकारीसाठी गाव बाहेर पडतो. शिकार होताच तो प्रसाद म्हणून वाटून नंतर गाव देवीकडून जत्रेची तारीख घेतात. या मागचं कारण माहित आहे का ? डुकराची शिकार का केली जाते हे पण जाणून घेणं तितकाच महत्वाचं आहे. आंगणेवाडीची ही देवी भराडी म्हणजेच सात्विक देवस्थान तिला मांस-मद्य पूर्ण वर्ज्य (त्यामुळे विशेषतः आंगणे मंडळी दारू निषिध्द मानतात) आंगणे लोक दारू पीत नाहीत. आणि दारू पण ही जी पारध केली जाते ती पंचक्रोशीतील असुरी शक्तींना शांत करण्यासाठी देवीचे सांगणे असे की, “पंचक्रोशीतील असुरी शक्तींना शांत करा अन मग माझा उत्सव आनंदाने साजरा करा. असं केल्याने गवावर व गावातील इतर व्यक्तींवरील संकटे दूर होतात.

आंगणेवाडीची जत्रा दोन दिवस चालते, दुसऱ्या दिवशी साधारण दुपारी तीन-चार च्या मानाने व्यापारी लावलेली दुकाने मोडायला घेतात. म्हणून दुसऱ्या दिवशीच्या जत्रेला मोड जत्रा असे म्हणतात. जत्रेच्या पहिल्याच दिवशी खुद्द आंगणेवाडीतील लोकांना दर्शन दिले जात नाही. त्यांना मोड जत्रेदिवशी दर्शन मिळते. त्यानंतर २१ ब्राम्हण येऊन साम्राज्ञा होते. देवळाचे शुद्धीकरण आधी विधी होतात. रात्री १ ते २ वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालतो. जत्रेच्या चौथ्या दिवशी मुंबईकर व गावातील ग्रामस्थांनी बसविलेले नाटक सादर केले जाते.ते नाटक मंदिरालगतच्या रंगमंचावर सादर केले जाते.तसेच गावाचे एक भजन मंडळ आहे ते या जत्रे दिवशी देवी समोर भजन सादर केले जाते.

 पाचव्या दिवशी जत्रेत देवीला जमा झालेले नारळ, तांदूळ, पेढे, साखर, गूळ हा प्रसाद वाटण्यासाठी देवीचा कौल घेतला जातो. कौल मिळताच तो गावाला प्रसाद म्हणून वाटतात. देवीने यात्रौत्सव सुरळीतपणे पार पाडून घेतला म्हणून देवीप्रती कृतज्ञता व्यक्त होते. दरवर्षी आंगणेवाडीच्या या अंगणात देवी भराडीच्या महाउत्सवाला उधाण येते आणि सारे भक्तगण जय जय भराडी देवी नाम गजरात ओले चिंब होतात.

आंगणेवाडी जागृत देवस्थान हे याआधीच पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर झाले आहे. वर्षभरात एक लाखापेक्षा अधिक लोक पर्यटक म्हणून भराडी देवीच्या पायी नतमस्तक होतात तर तब्बल आठ लाखांपेक्षा जास्त लोक भराडी आई देवीच्या दर्शनाला जत्रे दिवशी आंगणेवाडीत आणि आजू बाजूच्या गावांत मुंबई व राज्यातील इतर ठिकाणावरून गावी येतात आणि देवीच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जातात. आंगणेवाडीच्या भराडी आई देवीची जत्रा ही जास्त करूनजानेवारी महिन्यात येते. जर तुमचा प्लॅन असेल आंगणेवाडीच्या भराडी आईच्या दर्शनाचा, तर जत्रेच्या वेळी या. कारण जत्रेच्या वेळी गावात एक वेगळेच वातावरण आणि उत्साह असतो.

आंगणेवाडी हे मालवण या पर्यटन स्थळापासून अवघ्या १५ किमीअंतरावर असलेल्या मसुरे गावात ही वाडी आहे. या वाडी मध्ये राहणारे ९५% ग्रामस्थ हे अंगाणे आडनावाने ओळखले जातात म्हणून या वाडीला आंगणेवाडी हे नाव प्राप्त झाले. एक छोटीशी वाडी असून एवढी मोठी जत्रा भरणे हे खूप कौतुकास्पद आहे.