होईल स्क्रीन टाईम कमी, वेळ लागे सार्थकी!

0
46


मोबाईल स्वत:चा स्क्रीन टाईम नोंदवून ठेवू लागला हे एक बरं झालं. दिवसभर आपण किती वेळ मोबाईलवर व्यतीत केला हे चटदिशी समजते, तेही अगदी सविस्तर! कुठले अ‍ॅप्लिकेशन किती वेळ वापरले गेले, हे देखील अचूक कळते. सोशल मीडिआच्या वापराबाबतची निराळी नोंद तिथे दिलेली असते. तसेच, दिवसागणिक व आठवडय़ाच्या वेळेची तुलनात्मक माहिती देखील दिली जाते. ज्यावरून, कालच्यापेक्षा आज आपण मोबाईल जास्त हाताळला की कमी हे आपल्या लक्षात येते. तुम्ही कधी पाहिलात का तुमच्या मोबाईलचा स्क्रीन टाईम? एकदा तपासाच आणि तो हळूहळू कमी होत जाईल याची काळजी घेण्याची मनोमन निश्चय करा.

कामानिमित्त मोबाईलचा वापर करणं चुकीचं बिलकूल नाही. पण, सोशल मीडिया किंवा मनोरंजनपर अ‍ॅप्स, गेम्सच्या अ‍ॅप्लिकेशन्सवरून कधी नोटिफिकेशन येते आणि आपल्याच नकळत आपलं लक्ष विचलित होऊन, आपण काही तरी भलतेच वेळखाऊ स्क्रोलिंग करत बसतो. दुस-या नोटिफिकेशने किंवा आणखी कुठल्या कारणाने भानावर आलो, की महत्त्वाचं काम राहून गेल्याचं लक्षात येतं.

मोबाईल, टॅबसारखी टेक्नॉलॉजी हाताळताना हे असं भरकटणं फार वाईट. यामुळे, आपल्यातील चंचलवृत्ती बळावते. स्थिरचित्ताने काम करणे कमी होते. सतत चुळबूळ, हाताला चाळा. जरासा फावला वेळ मिळताच फोन शोधायला लागतो. इंटरनेटवर टाईमपास करतो किंवा तेच तेच फोटो पुन्हा पुन्हा पाहत बसतो.

मनाला आळसाने ग्रासण्याचे प्रमाणही वाढते. बसल्याजागी मनोरंजनाचे हजार पर्याय समोर खुले असतात. शरीराला हालचालींच्या स्वाधीन न करण्याची जणू सवयच जडते. काढला पर्समधून मोबाईल की झाले ठप्प शरीर तिथल्या तिथे.

विचार करणे, मेंदूवर ताण देणे मंदावत जाते. पूर्वी एखादा संदर्भ आठवत नसला, की कित्येक तास त्याचा विचार डोक्यात घोळत राहायचा. आता, सर्च करून मोकळे होतो. झटक्यात उत्तर सापडते आणि विषय संपतो. याचे एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे, फोन नंबर्स लक्षात ठेवणे. पूर्वी किमान ३० ते ४० फोन नंबर्स सर्रास तोंडपाठ असायचे, हल्ली साधे घरातल्यांचे नंबर्स नीट पाठ नसतात. स्मरणशक्तीला बुरशीच्या विळख्यातून मुक्त करायचे असेल, प्रत्येकाने प्रयत्नपूर्वक स्क्रीन टाईमिंग कमी करण्यावर भर द्यायला हवा.

आपल्यापासून सुरुवात केली, तर पुढच्या पिढीपर्यंत योग्य सवयी पोहोचतील. मोबाईल गरजेपुरता वापरण्याचा महत्त्वाचा धडा नकळतपणे त्यांना देता येईल. घरातील लहान मुलंही तुमचंच अनुकरण करीत असल्याने, त्यांनी मोबाईलचा अतिरिक्त वापर करू नये असे, जर तुम्हाला वाटत असेल; तर प्रथम घरातील पालक मंडळींना स्वत:बाबत हा बदल अमलात आणावा लागेल.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here