‘सिम्पल’ अ‍ॅपद्वारे आता मधुमेही रुग्णांची नोंद

0
30


आरोग्य मंत्र्यांची माहिती

मुंबई : उच्च रक्तदाबाच्या रुग्णांवरील उपचार व पाठपुरावा करण्यासाठी चार जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यात येणारे ‘सिम्पल’ अ‍ॅप आता दुस-या टप्प्यामध्ये नऊ जिल्ह्यांत वापरण्यात येणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आता मधुमेह रुग्णांची देखील नोंद ठेवण्यात येणार असून त्यासंदर्भातला पथदर्शी प्रकल्प वर्धा जिल्ह्यात सुरू आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली.

राज्यात सध्या भंडारा, वर्धा, सिंधुदुर्ग आणि सातारा या चार जिल्ह्यांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या अ‍ॅपच्या माध्यमातून रुग्णांची नोंदणी केली जात आहे. बदलत्या जीवनशैलीशी निगडित उच्च रक्तदाबाच्या आजारावर नियंत्रणासाठी इंडिया हायपरटेन्शन कंट्रोल इनिशिएटिव्ह (आयएचसीआय) यांच्या मदतीने हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.

रुग्णांची नोंदणी ते त्यांचा पुढील ३० दिवसांपर्यंत पाठपुरावा या अ‍ॅपच्या माध्यमातून करण्यात येतो. विशेष म्हणजे, या अ‍ॅपमध्ये नोंदणी केलेल्या रुग्णांची रक्तदाबाची तपासणी उपचार मोफत केले जात आहेत. त्याचबरोबर त्यांना संपूर्ण महिनाभराच्या गोळ्यादेखील मोफत दिल्या जातात. या अ‍ॅपमुळे रक्तदाबाच्या रुग्णांचा पाठपुरावा करणे सोपे झाले आहे. रुग्णाला उपचार सुरू करून ३० दिवस पूर्ण होताच पुढील पाठपुराव्यासाठी त्याला मोबाईलवर एसएमएस पाठविला जातो.

एखादा रुग्ण ३० दिवसांनंतरही उपचाराला आला नाही, तर त्याची यादी केली जाते. ती यादी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्टाफ नर्सकडे जाते. त्यावरून नर्सकडून त्या रुग्णाशी संपर्क केला जातो. रुग्णाकडून प्रतिसाद न मिळाल्यास, ती यादी एएनएम, आशा वर्कर यांना दिली जाते. आशा वर्करकडून संबंधित रुग्णाच्या घरी भेट दिली जाते व उपचाराबाबत पाठपुरावा केला जातो.

महाराष्ट्रासह अन्य पाच राज्यांमध्ये या अ‍ॅपचा वापर सुरू असून आतापर्यंत भंडारा, वर्धा, सिंधुदुर्ग आणि सातारा या चार जिल्ह्यांमध्ये १ लाख २७ हजार ८८२ रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here