सरकारने थकवले ‘एअर इंडिया’चे १३५० कोटी

0
48


नवी दिल्ली : सध्या विक्रीला काढलेल्या ‘एअर इंडिया’ला कर्जाच्या खड्डय़ात घालण्यात सरकारमधील मंत्री आणि अधिका-यांनी हातभार लावल्याची माहिती समोर आली आहे. अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठीची ‘एअर इंडिया’ची तब्बल ८२२ कोटींची बिले केंद्र सरकारने थकवली आहेत. विविध मंत्रालयातील अधिका-यांनी केंद्र सरकारच्या हमीवर खरेदी केलेल्या तिकिटाचे ५२६ कोटी १४ लाख थकीत आहेत. असे एकूण १३५० कोटी सरकारनेच थकवले आहेत.

सरकारची मालकी असलेल्या ‘एअर इंडिया’वर जवळपास ६० हजार कोटींचे कर्ज आहे. नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘एअर इंडिया’ आणि ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ या दोन कंपन्यांमध्ये १०० टक्के हिस्सा विक्री करण्याला मंजुरी दिली. त्यानुसार दोन्ही कंपन्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र ‘एअर इंडिया’ला आर्थिक संकटात लोटण्यात सरकारमधील मंत्री, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वगार्चा मोठा वाटा असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.

सर्वसाधारणपणे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती , पंतप्रधान या अतिमहत्वाच्या व्यक्ती देश-विदेशातील दौ-यांसाठी सरकारी विमान कंपनी असल्याने ‘एअर इंडिया’ने प्रवास करतात. यासाठी एअर इंडियाची चार्टर विमाने वापरली जातात. या प्रवासाचा खर्च संबंधित मंत्रालयांकडून कंपनीला दिला जातो. निवृत्त लष्करी अधिकारी लोकेश बत्रा यांनी ‘एअर इंडिया’च्या थकबाकीचा तपशील माहिती अधिकारात विचारला होता. त्यावर दिलेल्या माहितीनुसार अतिमहत्वाच्या व्यक्तींनी ३० नोव्हेंबर २०१९ अखेर एअर इंडियाचे ८२२ कोटी थकवले आहेत. कंपनीला डिसेंबरअखेर ८ हजार ५५६ कोटींचा तोटा झाला होता.

राष्ट्रीय आपत्ती दरम्यान बचाव कायार्साठी ‘एअर इंडिया’कडून पुढाकार घेतला जातो. मात्र दुर्दैवाने त्याचीही ९ कोटी ६७ लाखांची थकबाकी ‘एअर इंडिया’ला अद्याप मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच परदेशी पाहुण्यांच्या प्रवास खर्चापोटी १२ कोटी ६५ लाख केंद्र सरकारने थकवले आहेत.

अधिका-यांचा तिकीट खर्च बुडीत खात्यात
अतिमहत्वाच्या व्यक्ती आणि मंत्र्यांनी ‘एअर इंडिया’चे ८२२ कोटी थकवले असून विविध मंत्रालयातील अधिका-यांनी केंद्र सरकारच्या हमीवर खरेदी केलेल्या तिकिटाचे तब्बल ५२६ कोटी १४ लाख थकीत आहेत. तीन वर्षापासून २३६ कोटी १६ लाख अद्याप वसूल झालेले नाहीत. ‘एअर इंडिया’ने २८१ कोटी बुडीत खात्यात वर्ग केले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here