श्रीरंगपटण

0
46


कर्नाटक राज्यातील एक इतिहासप्रसिद्ध तीर्थक्षेत्र व मध्ययुगीन अवशेषांचे स्थळ. ते म्हैसूरच्या ईशान्येस सुमारे १४ किमी म्हैसूर-बंगळूरु मार्गावर कावेरी नदीच्या दोन शाखांमधील बेटावर वसले आहे. मंडय़ा जिल्ह्यातील या तालुक्याच्या ठिकाणाला तेथील श्रीरंगनाथ या प्रमुख देवतेच्या नावावरून श्रीरंगपटण हे नाव पडले आहे. या नगराचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही; तथापि, गौतम ऋषींचे येथे वास्तव्य होते, असे सांगितले जाते. त्यामुळे येथील एका लहान बेटास आजही गौतमक्षेत्र म्हणतात.

या नगराची स्थापना होयसळ राजा विष्णुवर्धन याचा भाऊ उदयादित्य याने ११२०मध्ये केली. विष्णुवर्धनाने रामानुजाचार्याना अष्टग्रामांचा अग्रहार दिला, त्यापैकी श्रीरंगपटण एक होते. पुढे विजयानगरच्या तिम्मण सेनापतीने १४५४मध्ये येथे किल्ला बांधला आणि येथील श्रीरंगनाथ मंदिराचा विस्तार केला. श्रीरंगपटण पुढे विजयानगरच्या अमलाखाली आले. त्याचा राज्यपाल श्रीरंगराय होता. तिरुमलराय हा येथील शेवटचा राज्यपाल. विजयानगरच्या ऱ्हासानंतर (१५६५) म्हैसूरच्या ओडेयर राजांनी १६१०मध्ये श्रीरंगपटण घेतले व आपली राजधानी तेथे केली. हैदर अलीने व पुढे टिपू सुलतानाने (कार. १७८२ -१७९९) येथेच राजधानी ठेवली. टिपूचा इंग्रजांनी श्रीरंगपटणच्या लढाईत १७९९मध्ये पराभव करून तेथे पूर्वीच्या ओडेयरांना सत्ताधीश केले आणि त्यांच्याकडून पन्नास हजार रुपये खंडणी घेऊन हे गाव त्यांच्याकडे ठेवले. पण ओडेयर राजांनी म्हैसूर ही आपली राजधानी केली. त्यामुळे श्रीरंगपटणचे राजकीय महत्त्व कमी झाले व शहराचाही संकोच झाला. टिपूच्या वेळी त्याची लोकसंख्या सुमारे १,५०,००० एवढी होती.

श्रीरंगपटणमध्ये रंगनाथस्वामी मंदिराव्यतिरिक्त नरसिंह आणि गंगाधरेश्वर अशी आणखी दोन मंदिरे आहेत. शिवाय कावेरी नदीकाठी बांधलेला भक्कम किल्ला, दर्या दौलत बाग, जुम्मा मशीद इत्यादी ऐतिहासिक ठिकाणे आहेत. भारतातील त्या काळच्या अभेद्य किल्ल्यांपैकी येथील किल्ला असून त्याच्या दक्षिणेस गजद्वार आहे. त्यावर फार्सीत एक कोरीव लेख आहे. त्या किल्ल्याच्या बांधकामाचा हिजरी १२१९ असा उल्लेख आहे. किल्ल्याभोवती भक्कम तटबंदी असून किल्ल्यातील टिपूचा प्रसिद्ध लाल महाल हा राजवाडा पुढे ब्रिटिशांनी लष्करी छावणीसाठी वापरला. टिपूचा मृत्यू या किल्ल्यातच झाला.

कावेरीच्या दक्षिण तीरावरील दर्या दौलत बाग टिपूने १७८४मध्ये बांधली व तेथे उन्हाळी प्रासाद उभारला. ही सार्सानिक शैलीतील वास्तू असून तिचे स्तंभ व कमानी लाकडी आहेत. येथे परदेशी दूतांना टिपू भेटत असे. यातील भित्तिचित्रे विविध प्रकारची असून त्यात कर्नल बेलीच्या शरणागतीचे (१७८०), निजामाच्या सैन्याचे तसेच अनेक राजे व पाळेगार, हैदर व टिपू यांची वैशिष्टय़पूर्ण चित्रे आहेत. टिपूने बांधलेली जुम्मा मशीद प्रसिद्ध असून तिचे दोन मोठे मनोरे, मशिदीच्या सभागृहातील मेहरबीच्या कमानी, मनो-यांवरील पुष्पांचे रचनाबंध इत्यादी मनोवेधक आहेत. मशिदीत एक फार्सी कोरीव लेख आहे.

येथील रंगनाथ मंदिराचे काही बांधकाम नवव्या शतकात गंग वंशाच्या राजवटीत झाले, असे म्हणतात. हे होयसळ शैलीत बांधलेले कर्नाटकातील एक भव्य मंदिर असून या क्षेत्राला आदिरंगम म्हणतात. त्याचे बांधकाम तीन कालखंडांत पूर्ण झाले. मूळ मंदिराचे ग्रॅनाइट पाषाणातील गर्भगृह, स्तंभ अवशिष्ट असून त्यांची छते कलात्मक आहेत. नवरंग मंडपाचे बांधकाम विजयानगर साम्राज्यकाळात झाले. तेथे द्वारपालांच्या भव्य मूर्ती आहेत. याशिवाय गोपूर, मुखमंडप आणि गर्भगृहाचे शिखर यांचेही बांधकाम याच काळातील आहे. शेषशायी विष्णूची प्रमुख पूजामूर्ती भव्य असून विष्णूचा मुकुट व अलंकार सुस्पष्ट आहेत. गर्भगृहाच्या पुढील दोन स्तंभांवर विष्णूचे २४ अवतार कोरले असून प्रत्येक अवताराच्या खाली त्याचे नाव आहे. हैदर व टिपू या दोघांनी येथील पूजाअर्चेसाठी व्यवस्था केली होती.

येथील गंगाधरेश्वर आणि लक्ष्मी – नरसिंह ही दोन मंदिरे अनुक्रमे विजयानगरचे राजे आणि कंठिरव ओडेयर यांनी बांधली. मात्र नरसिंहाची लक्ष्मीसहित सुरेख मूर्ती होयसळ राजांनी घडविलेली आहे. या दोन्ही मंदिरांत मूर्तिकाम आढळते. गंगाधरेश्वर मंदिरातील सुबह्मण्यम्ची बारा हाताची मूर्ती लक्षणीय आहे. प्राचीन अवशेष व रंगनाथ मंदिर, पक्षी अभयारण्य इत्यादींमुळे श्रीरंगपटण हे पर्यटकांचे आकर्षणस्थळ झाले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here