‘शिवजयंती’वरून राष्ट्रवादीनंतर आता आ. नितेश राणेंचा शिवसेनाला टोला

0
40


मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची शासकीय तारखेनुसार जयंती १९ फेब्रुवारीला साजरी केली जाते, मात्र शिवसेनेकडून दरवर्षी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते. त्यामुळे यंदा राज्यातील सत्तेत महत्त्वाची भूमिका बजावणारी शिवसेना तारखेनुसार की तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी तिथीचा हट्ट सोडा आणि १९ फेब्रुवारीला शिवजयंती जाहीर करा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे.

राष्ट्रवादीच्या या आवाहनानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन शिवसेनेला टोला लगावला आहे. राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आहे. मग तर एकच शिवजयंती झाली पाहिजे, एकदा काय तो दोन शिवजयंतीचा वाद मिटवून टाकाच. एक शिवप्रेमी म्हणून तुमच्याबरोबर आहे. ‘हीच ती वेळ, जय शिवराय’ असे म्हणत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवजयंतीच्या तारखेवरुन वाद हा नवा नाही. दरवर्षी शिवसेनेकडून १९ फेब्रुवारीऐवजी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते. मागील सरकारमध्ये शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तिथीनुसारच शिवजयंती साजरी करण्यात यावी अशी मागणी केली होती. इतकेच नाही तर शिवसेनेचे माजी खासदार यांनी चंद्रकांत खैरे यांनी सांगितले होते की, शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळी इंग्रज भारतात नव्हते. त्यामुळे इंग्रजी पद्धतीने कालगणनाही केली जात नव्हती. त्यामुळे शिवाजी महाराजांची जयंती मराठी तिथीप्रमाणेच साजरी करायला हवी ही शिवसेनेची भूमिका आहे असे मत त्यांनी व्यक्त केले होते.

२०१८ मध्ये शिवजयंतीच्या या तारखेवरुन शिवसेना आणि अन्य मराठा संघटनांमध्ये औरंगाबाद येथे मारहाणीचा प्रकारही घडला होता. शिवजयंती १९ फेब्रुवारीला तारखेनुसार साजरी केली जात असताना शिवसेना नेत्यांकडून तिथीचा घोळ घालून वेगळी जयंती साजरी करण्याचा घाट घातला जातो. हा शिवरायांचा अवमान आहे, त्यामुळे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचे बंद करावे अशी मागणी आमदार नितेश राणेंनी केली होती.

शिवजयंती तिथीनुसार साजरी करावी याबाबत शिवसेना-मनसेचे एकमत आहे. शिवाजी महाराजांची जयंती केवळ उत्सव नव्हे तर आपला सण आहे. आपण दिवाळी, गणपती आणि अन्य कोणताही सण तारखेनुसार साजरे करत नाही. मग शिवाजी महाराज है दैवत आहेत. त्यांची जयंती तिथीनुसार व्हावी अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली होती. राज्यातील सत्तेत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्रितपणे सरकारमध्ये आहेत. त्यामुळे शिवजयंतीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणे गरजेचे आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here