शब्देविण संवादू

0
51


आराधना गोखले-जोशी

माध्यम अभ्यासाच्या विद्यार्थ्यांना मार्शल मॅकलुहान याचा ‘संपूर्ण जग हेच एक खेडं’ हा सिद्धांत शिकवत होते. या सिद्धांतानुसार येत्या काही वर्षात संपूर्ण जग एखाद्या खेडेगावासारखं होणार आहे. खेडेगाव जसं परिपूर्ण असतं, त्यांच्या गरजा जशा तिथल्या तिथेच पूर्ण होतात, त्याप्रमाणे हल्लीच्या काळात आपल्या गरजा आपल्याला हव्या त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. जग जवळ येत आहे, संस्कृतीची देवाण-घेवाण होत असतानाच त्याचा मुख्य प्रभाव आपल्या भाषेवर पडणं अगदी स्वाभाविक आहे. आज जगाची म्हणून एक भाषा बनली आहे, बनत चालली आहे. समाज माध्यमांच्या वाढत्या वापरामुळे तर या भाषेत अनेक बदल घडताना सातत्यानं दिसून येत आहेत.

मध्यंतरी ‘प्रभावी संवाद कौशल्य’ या विषयाच्या उत्तरपत्रिका तपासत असताना भाषा बदलाचे परिणाम विद्यार्थ्यांवर किती खोलवर झाले आहेत, ते बघायला मिळालं. संवाद लेखन विषयक उत्तर लिहिताना अनेक ठिकाणी Good Morning ऐवजी नुसतं GM किंवा take care ऐवजी TK अशासारखे प्रयोग उत्तरांमध्ये दिसून आले. अर्थात ही भाषा व्हॉट्सअ‍ॅपची आहे, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगावं लागलं. मात्र, तरीही अशी भाषा उत्तरपत्रिकांमध्ये सर्रास वाचायला मिळत आहे.
याशिवाय आणखी एक प्रकार संवादासाठी वापरला जातोय, तो म्हणजे इमोजींचा. हल्ली सोशल मीडियावर आपण या इमोजींच्या भाषेत व्यक्त होत असतो. ही भाषा वापरायला सुटसुटीत तरीही आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचवणारी आहे. एक वाक्य किंवा एक परिच्छेद टाईप करून समोरच्याला पाठवण्यापेक्षा एक इमोजी पाठवणं म्हणजे वेळेची बचत. त्यामुळे हे इमोजीही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहेत. म्हणूनच हल्ली १७ जुलै हा दिवस ‘वल्र्ड इमोजी डे’ म्हणून साजरा करण्यात येतो. २०१४ पासून ‘वल्र्ड इमोजी डे’ साजरा करण्यास सुरुवात झाली. याचदरम्यान जेरेमी बर्ज यांनी ‘इमोजीपीडिया’ म्हणजेच इमोजींची विकिपीडिया तयार केली होती.

भाषेचा शोध लागण्यापूर्वी मानव चित्रे, विशिष्ट आवाज, खाणाखुणा याच्या माध्यमातून संवाद साधत होता. आजच्या डिजिटल युगात जगाची भाषा बदलत आहे. जणू डिजिटल माध्यमातून माणसाच्या भावना व्यक्त करण्याचा माध्यमांचा उलटा प्रवास सुरू झाला आहे. शब्द, अक्षरांबरोबरच पुन्हा इमोजीच्या रूपाने चिन्हांचा वापर सुरू झाला आहे. विशेष म्हणजे, ही इमोजींची भाषा जागतिक असून त्याचे संकेत लहानांपासून थोरांपर्यंत सर्वाना माहिती आहेत. त्यामुळेच सोशल मीडियावर हात चालताना नकळत हीच भाषा बोलली जाते. खरं तर, यामुळे वेळही वाचतो आणि मनातील नेमक्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचवता येतात, असं म्हणतात. त्यामुळे इमोजीची भाषा समजायला आणि उमजायला कुणालाही वेळ लागला नाही. काही कालावधीतच ही भाषा सर्वाना अवगत झाली आहे.

‘स्माईली’ किंवा ‘इमोजी’ दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या इमोजीचा वापर सोशल मीडियावर आजची तरुणाई मोठय़ा प्रमाणात करते. एखाद्या घटनेवर लगेच प्रतिक्रिया द्यायची असेल, तर इमोजीचं नाव पहिल्यांदा घ्यावं लागेल. कारण, एक इमोजी बरंच काही सांगून जातो. व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियावर वेगवेगळ्या स्माईली, चिन्हे, म्हणजे इमोजी आपल्याला पाहायला मिळतात. सांकेतिक भाषा म्हणून आपण जसं शाळेत, घरात एकमेकांना इशारे करून संवाद साधतो तसंच सोशल मीडियावर व्यक्त होण्यासाठी या इमोजींचा वापर करत असतो.

इमोजीचा वापर पहिल्यांदा अमेरिकेत झाला. हार्वी रोस बॉल यांनी जेव्हा पहिला ‘स्माईल फेस’ तयार केला, तेव्हा त्यांना माहीत नव्हते, ही ‘स्माईली’ संवाद साधण्याचे साधन होईल. हा स्माईली फेस बनवण्याचे कारण काय होते, तर १९६३मध्ये हार्वी एक जाहिरात एजन्सी चालवत होते. याचवेळेस म्युचल इन्शुरन्स कंपनी ऑफ अमेरिका त्यांच्याकडे एक समस्या घेऊन गेली होती. काही कारणाने त्या कंपनीचे कर्मचारी कंपनीवर नाराज होते. त्यांची नाराजी घालवण्यासाठी ‘पिवळ्या रंगाचा स्माईली फेस’ तयार करण्यात आला होता. १९७१मध्ये पाच करोड स्माईली, इमोजी छापले व विकले गेले होते. १९९९ मध्ये याच स्माईली फेसचे यूएसच्या पोस्टाने तिकीट छापले. त्यानंतर इमोजीचा वापर १९९५मध्ये जपानमध्ये केला गेला. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी जपानची एक कंपनी पेजरचा वापर करत होती. त्यांनी आपल्या पेजर्समध्ये ‘हार्ट आयकॉन’चा वापर केला होता. हा ‘हार्ट आयकॉन’ जपानमधील तरुणवर्गात प्रचंड लोकप्रिय झाला. याच्यातून त्यांना त्यांच्या ‘इमोशन्स (भावना) शेअर’ करता आल्या. तेव्हापासून आजपर्यंत या ‘इमोजी’ भावना व्यक्त करण्याचे साधनच बनलं आहे. कधीकधी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याला योग्य शब्दच सुचत नाहीत. अशावेळी त्या शब्दांची जागा इमोजी घेतात.

अनेकदा सामाजिक बदलाची दखलही इमोजीच्या माध्यमातून घेतली जात असल्याचं बघायला मिळतं. एलजीबीटी समुदायाबद्दल ऐतिहासिक निकाल आल्यानंतर त्याचीही दखल इमोजींमधून घेतली गेली. त्यामुळे एक नवी कुटुंबव्यवस्था त्यातून दर्शवली गेली. एकेरी पालकत्व, समलैंगिकता यासारखे विषयही इमोजींच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. असे सामाजिक बदल सामावून घेतल्यामुळे इमोजी हे केवळ चिन्ह, प्रतीक न राहता, समाजाचा आरसा म्हणून पुढे येतात. केवळ हसणं, रडणं एवढय़ापुरतं इमोजीचं विश्व आता मयार्दित नसून, त्यात निसर्ग आणि मानवी जीवनाशी संबंधित अनेक घटक सामावले आहेत.

‘युनिकोड कन्सॉर्शियम’ ही आंतरराष्ट्रीय संस्था लिपिचिन्हांचे आणि भावचिन्हांचे प्रमाणीकरण करते. जगातील कोणतीही व्यक्ती इमोजी तयार करू शकते. मात्र, आपल्या हातातील फोन आणि संगणकांवर ती दिसण्यासाठी या संस्थेची मान्यता आवश्यक असते. दरवर्षी अशा अनेक इमोजी इंटरनेटवर दाखल होतात आणि त्यांना ही संस्था मान्यता देते. २०१९ या वर्षाच्या सुरुवातीला युनिकोड कन्सॉर्शियमने विविध वर्णाच्या जोडप्यांच्या ७१ इमोजींना मान्यता दिली. सध्याच्या युनिकोड मान्यताप्राप्त यादीनुसार, जगभरात २,८२३ इमोजी वापरात आहेत.

आपल्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे, महाराष्ट्र सरकारलाही या संस्थेचं सदस्यत्व मिळालं आहे. त्यामुळे गुगल, फेसबुक, आयबीएम, अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, सॅप आणि सीमॅन्टेक अशा कंपन्यांच्या रांगेत महाराष्ट्राला स्थान मिळालं आहे. असं सदस्यत्व प्राप्त करणारं महाराष्ट्र हे भारतातील दुसरं राज्य आहे. मराठी भाषा व संस्कृतीशी जोडलेल्या लिपिचिन्हांना आणि भावचिन्हांना (इमोजी) आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळण्यासाठी या सदस्यत्वामुळे सोपे जाणार आहे.

भारतीयांच्या दृष्टीने आणखी एक विशेष बाब म्हणजे जगभरात इमोजींचा सर्वाधिक वापर भारतीय लोक करत असल्याचं बोबल एआय या कंपनीच्या अहवालात म्हटलं आहे. यामध्ये सर्वाधिक वापरले गेलेले इमोजी हे ‘हसून हसून डोळ्यांतून पाणी येणे’ आणि ‘फ्लाईंग किस करणारे’ आहेत.

पारंपरिक भाषेत आपल्याकडे शब्दांचं वैविध्य असूनही शब्द वापरताना आपण भयंकर कंजुषी करतो. तोच न्याय आपण इमोजींना लावतो. यातून काहीवेळा संवादाचा विसंवाद होतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इमोजीमुळे आपला शब्दसंग्रह कमी होण्याची भीतीदेखील आहे. भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी तर इमोजीच्या अतिवापरामुळे आपण अश्मयुगीन सांकेतिक भाषेच्या युगात परतणार की काय? अशी भीती वेळोवेळी व्यक्त केली आहे. त्यांचा हा इशारा लक्षात घेता, ‘इमोजी’ ही भाषांच्या मुळावर येण्याचा धोका कायम आहे. आधीच जगातील ब-याचशा भाषांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागले असताना, इमोजींचा वापर हा भाषांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे त्यांचा वापर कमीत कमी आणि सारासार विचार करून करणे आवश्यक आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here