मुंबई-गोवा प्रवास आता ‘सुपरफास्ट’

0
51


चौपदरीकरणाचे काम मेपर्यंत होणार पूर्ण

राजू भिसे (नागोठणे) : गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पनवेल ते सुकेळी या मार्गाचे काम सध्या सुरू असून मे महिन्यापर्यंत हा मार्ग खुला होईल, असे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणा-यांना दिलास मिळाला आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण ही ‘डेडलाईन’ पाळते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

साधारणत: दहा ते बारा वर्षापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर या ८४ किलोमीटर मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला होता. सन २०१४ पर्यंत पूर्ण मार्ग वाहतुकीस खुला होईल, असे शासनाकडून सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात, जागा संपादित करणे, कर्नाळा खिंडीतील वृक्षराजी तसेच इतर कामांसाठी अडथळे येत होते व त्यामुळे प्रदीर्घ कालावधी लागत असल्याने संबंधित ठेकेदारांना २०२० साल उजडूनही रस्ता पूर्णत्वास नेण्यात अपयश येत होते. त्यावेळी पनवेल-पळस्पे ते कासू आणि कासू ते इंदापूर असे कामाचे दोन टप्पे तयार करून ते दोन ठेकेदारांना देण्यात आले होते. मात्र, कामात दिरंगाई होत असल्याने कासू ते इंदापूर या मार्गातील खारढोम्बी ते सुकेळी खिंडीच्या अलीकडच्या भागापर्यंतचे काम दोन वर्षापूर्वी पनवेलच्या जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्र कंपनीकडे देण्यात आले आहे. या मार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर चालू असल्याने पनवेल ते सुकेळी हा नवीन महामार्ग मे महिन्यापर्यंत वाहतुकीस खुला होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

पनवेल ते सुकेळी या मार्गात इतर लहान पुलांबरोबर खारपाडा, पेण, निडी, वाकण आदी ठिकाणी मोठे पूल आहेत. पेण आणि निडी येथील पुलांवरून सध्या वाहतूक सुद्धा चालू करण्यात आली असून खारपाडय़ाचा पूल सुद्धा लवकरच पूर्ण होणार आहे व वाकणचा पूल सुद्धा दृष्टिक्षेपात आला असल्याने महिनाभरात तो पूर्ण होईल, असे स्पष्ट करण्यात आले. पळस येथील माती भरावाचे काम जवळपास पूर्ण झाले असून १५ फेब्रुवारीपासून हा नवीन रस्ता वाहतुकीस खुला केला जाईल, असे सांगण्यात आले.

येथील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलात ये-जा करणा-या विद्यार्थ्यांना सध्या महामार्ग ओलांडून जावे लागत आहे. महामार्ग आणि विद्यासंकुल यांच्यामध्ये रेल्वेमार्ग आहे व येथून पलिकडे जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून या ठिकाणी उड्डाण पूल उभारण्यात आला आहे. प्रस्तावित महामार्ग वाहतुकीस खुला झाल्यानंतर वाहने वेगात धावणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी ते आणखी धोकादायक ठरणार आहे. याबाबत विचारणा केली असता, महामार्गावरून रेल्वे उड्डाणपुलाला जोडणारा नवीन उड्डाण पूल बांधण्याचा कोणताही प्रस्ताव अद्याप उपलब्ध झाला नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

नागोठणे शहरालगतच्या कामत गोविंदा हॉटेल ते रमाई नगर आणि नागोठणे रेल्वे फाटक ते आयटीआय या मार्गात भराव असल्याने गाडय़ा वरून मार्गक्रमण करणार आहेत. नागोठणे शहरातून महामार्गावर जाणा-या पेण फाटय़ापर्यंतचा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याचे अखत्यारीत येतो. या रस्त्यावर मातीचा भराव येत असल्याने शहरातून वडखळ, पेण बाजूकडे जाणा-या एसटी बसेस तसेच इतर वाहनांना हा मार्ग राहणार असून शहरात येणा-या सर्व वाहनांना मिरानगर येथील पुलाखालून प्रवेश करावा लागणार आहे. लोकल एसटी बसेसना प्रत्येक गावाच्या ठिकाणी थांबण्यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक ठिकाणी सव्‍‌र्हिस रोड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here