महापालिकेचे तलाव व्हिजन फसले!

0
45


कोटय़वधींचा खर्च पाण्यात; देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष

दीपक देशमुख (नवी मुंबई) : तलाव व्हिजन मोहिमेंतर्गत महापालिकेने शहरातील तलावांचे कोटय़वधी रुपये खर्च करून सुशोभीकरण केले आहे; परंतु नियमित देखभाल व दुरुस्ती न केल्याने शहरातील तलाव अखेरच्या घटका मोजत आहेत. घणसोली, वाशी, रबाळे, जुहूगाव आणि ऐरोली गावातील तलावांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या तलाव व्हिजन मोहिमेचा फज्जा उडाल्याचे दिसून येते.

मनपा प्रशासनाकडून मागील पाच ते सहा वर्षापूर्वी तलाव व्हिजन मोहीम आखण्यात आली. एकूण १७ कोटी रुपये खर्च करून शहरातील २१ तलावांचे सुशोभीकरण करण्यात आले. मात्र, आजघडीला तलावांना नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे, तर काही तलाव हे धोबीघाटच बनले आहेत. दरम्यान, गणपती व नवरात्रोत्सवात तलावांचे तात्पुरत्या स्वरूपात सुशोभीकरण करण्यात आले. यावेळी निर्माल्य जमा करण्यासाठी कलश, गणपती विसर्जनासाठी खास सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या. मात्र, त्यानंतर तलावांची अवस्था पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे. तलावांवर सुरक्षा रक्षक नसल्याने ‘आवे जावे घर तुम्हारा’ याप्रमाणे कारभार सध्या सुरू आहे.

तसेच अनेक तलावांचे रूपांतर धोबिघाटात झाल्याने पाणीही दूषित झाले आहे. तसेच काही ठिकाणी तलावालगत कचरा टाकला जात असल्यामुळे मच्छरांचीही पैदास वाढली आहे. पाण्याला दरुगधी येत असल्यामुळे तलावानजीक राहणे दुरापास्त झाले आहे. कोपरखैरणे येथील मनसेचे शाखा अध्यक्ष चंद्रकांत डांगे यांनी कोपरखैरणे सेक्टर १९ मधील तलावाच्या समस्यांबाबत विभाग अधिका-यांना पत्र देऊन तलाव स्वच्छ करण्याची मागणी केली आहे.

शहरातील तलावांची लवकर स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात येईल. तसेच सुरक्षा रक्षक नेमण्यात येऊन गैरप्रकारांना आळा घातला जाईल.
– सुरेंद्र पाटील, शहर अभियंता, नमुंमपाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here