मराठीतून शिकल्याने नोकरी नाकारली, शिवसेनेला मराठीचेच वावडे

0
51


मुंबई : मराठीचा कैवार घेणा-या शिवसेनेची महापालिकेत सत्ता असतानाही प्राथमिक-माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातून घेतल्यामुळे १०२ उमेदवारांना पालिकेत नोकरी नाकारण्यात आली आहे.

महापालिकेच्या शाळांसाठी शिक्षकांची भरतीप्रक्रिया सुरू असून ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमांतून निवडलेल्या १०२ उमेदवारांना शेवटच्या क्षणी नोकरी नाकारण्यात आली. पालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी दहावीपर्यंतचे शिक्षण इंग्रजीतूनच हवे, अशी अट असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. मात्र या प्रकारामुळे मराठीतून शिकलेल्या या उमेदवारांची नोकरीची संधी हुकली आहे. इंग्रजी शाळांकडे पालकांचा कल वाढल्यामुळे पालिकेने काही वर्षांपूर्वी अर्ध इंग्रजी आणि संपूर्ण इंग्रजी माध्यमाच्या (मुंबई पब्लिक स्कूल) शाळा सुरू केल्या.

या शाळांसाठी भरतीप्रक्रिया सुरू असून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यात उत्तीर्ण झालेल्या १०२ उमेदवारांची महापालिकेच्या इंग्रजी शाळांसाठी निवड करण्यात आली. मात्र या उमेदवारांना त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठीत असल्यामुळे इंग्रजी शाळेत त्यांची शिक्षक म्हणून नेमणूक करता येणार नाही असे कारण देण्यात आले.

डावलण्यात आलेल्या या उमेदवारांचे पदवी आणि पदव्युत्तर बीएडपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातूनच झाले आहे. मराठीचा उदोउदो करणा-या शिवसेनेची महापालिकेत सत्ता असताना मराठी उमेदवारांना नोकरी नाकारल्यामुळे साहजिकच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा मुद्दा उचलून धरला आहे. त्यामुळे या मुद्दावरून शिवसेना अडचणीत सापडली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here