Connect with us

ब्लॉग

मणिपूर हिंसाचाराच्या म्यानमार कनेक्शननं पुन्हा एकदा टेंशन वाढवलंय

Published

on

[ad_1]

भारताच्या ईशान्येकडील मणिपूर हे राज्य आगीत धुमसतंय. मणिपूरमधल्या मैतेई व कुकी या दोन समाजांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. या दोन समाजांमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत १६० हुन अधिक जणांना प्राण गमवावे लागले. इतका हिंसाचार झाल्यानंतर आता पुन्हा एकदा मणिपूरमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. मणिपूर या राज्याला म्यानमार या देशाची सीमा लागून आहे.

म्यानमारमधून होणारी अवैध घुसखोरी मणिपूरमधल्या मैतेई व कुकी या समाजांमध्ये नेहमीच तेढ निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरते.

आता म्यानमारमधून ७०० पेक्षा जास्त लोकांनी मणिपूरमध्ये अवैध घुसखोरी केलीये. या अवैध घुसखोरीमुळे मणिपूर सरकारचं टेंशन वाढलंय. अशांत असलेल्या मणिपूरमध्ये अजूनही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सुटलेला नाही. म्यानमारमधून अवैध घुसखोरी झाल्यानंतर मणिपूर सरकारचं टेंशन का वाढलंय ? मणिपूर हिंसाचाराचं म्यानमार कनेक्शन काय आहे ? ते आपण समजून घेणार आहोत.
मणिपूरमधला चंदेल हा जिल्हा भारत-म्यानमार सीमेवर वसलेला आहे. २२ जुलै रोजी चंदेल जिल्ह्याच्या लजांग या गावात २ पुरुष व ३ महिला ८ मुलांसह दाखल झाल्या. त्यानंतर बोन्स, न्यू समतल, न्यू लजांग या गावांमध्येही नागरिकांचे झुंड दाखल होत होते. २२ जुलै रोजी म्यानमारमधून भारतात घुसखोरी करणाऱ्यांची संख्या वाढून ३७० झाली. हे नागरिक नेमके कुठुन येतायेत असा प्रश्न मणिपूरच्या स्थानिक नागरिकांना पडला होता.

२३ जुलै रोजी म्यानमारमधून आलेल्या नागरिकांची संख्या वाढून ७१८ झाली होती.

यानंतर मणिपूरच्या स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाला म्यानमारमधून आलेल्या नागरिकांची माहिती दिली. त्यानंतर एकूण ७१८ जणांनी म्यानमारमधून भारतात अवैध घुसखोरी केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. सध्या या अवैध घुसखोरांवर आसाम रायफलचे जवान लक्ष ठेऊन आहेत. अवैध घुसखोरी केलेल्यांमध्ये २०९ पुरुष, २०८ महिला व ३०१ बालकांचा समावेश आहे.
आता या प्रकरणाला मणिपूर सरकारनं गांभिर्यानं घेतलं आहे. त्यानंतर तात्काळ मणिपूर सरकारनं आसाम रायफलला याबाबत माहिती दिली. भारताच्या व्हिसाशिवाय तसंच भारतात प्रवेश करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांशिवाय म्यानमारमधील नागरिकांना भारतात प्रवेश कसा व का दिला, असा प्रश्न मणिपूर सरकारनं आसाम रायफलला विचारला आहे. मणिपूरला लागून असलेल्या म्यानमार सीमेच्या रक्षणाची जबाबदारी आसाम रायफलकडे आहे. या प्रकरणी मणिपूर सरकारनं आसाम रायफलला नोटीस पाठवली आहे.
म्यानमारमधून आलेल्या नागरिकांना तात्काळ परत म्यानमारमध्ये पाठवण्याचे निर्देश मणिपूर सरकारनं गृहमंत्रालयाच्या एडव्हायसरीवरुन आसाम रायफलला दिले आहेत.
तसंच अवैध घुसखोरी केलेल्यांच्या हातांचे ठसे व फोटोग्राफ्स संग्रहीत करुन ठेवण्याचे आदेश मणिपूर सरकारनं चंदेल जिल्ह्याच्या पोलिस उपायुक्त व पोलिस अधिक्षकांना दिले आहेत. म्यानमारमधून आलेल्या अवैध घुसखोरांकडे शस्त्रे असण्याची शक्यता मणिपूर सरकारनं वर्तवली आहे. तसंच म्यानमारमधून मणिपूरात हिंसा भडकवली जाते, अशी शंका मणिपूर सरकारला आहे.
सध्या मणिपूर हिंसाचाराचं म्यानमार कनेक्शन असल्याची चर्चा सुरु आहे. त्याचं कारण म्हणजे मणिपूरमध्ये पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओत एका महिलेची जमावाकडून निर्घुण हत्या करण्यात आल्याचं दाखवण्यात येतंय. दरम्यान, व्हायरल झालेला व्हिडिओ हा म्यानमारमधील असल्याचं पोलिसांच्या निदर्शनात आलं आहे. सध्या म्यानमारमधून मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात फेक न्यूज पसरवल्या जातायेत, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
आता मणिपूर सरकार म्यानमारमधून आलेल्या अवैध घुसखोरांमुळे चिंतेत का आहे ते आपण समजून घेऊयात. मणिपूरमध्ये हिंसाचार होण्याचं आणखी एक मुख्य कारण होतं ते म्हणजे म्यानमार व बांग्लादेशातून मणिपूरमध्ये होणारी अवैध घुसखोरी. मणिपूरमध्ये मेजोरीटीत असणारा मैतेई समाज हा म्यानमार व बांग्लादेशातून होणाऱ्या घुसखोरीमुळे नेहमीच आक्रमक भूमिका घेतो. मणिपूरमधील कुकी समाजाचे लोक म्यानमारमधील अवैध घुसखोरांना आश्रय देतात, असा आरोप मैतेई समाजाचे लोक कुकी समाजावर करतात.
मणिपूरमधला चुराचंद्रपूर हा जिल्हा म्यानमारच्या सीमेवर आहे. चुराचंद्रपूरमध्ये कुकी समाज मेजोरीटीत आहे.
या आधी चुराचंद्रपूरमधील कुकी समाज म्यानमारच्या अवैध घुसखोरांना आश्रय देतो, अशी टीका मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी कुकी समाजावर केली होती. त्यामुळे मणिपूर हिंसाचारावेळी कुकी समाजात असंतोष पसरला होता. मणिपूरमधील हिंसाचार वाढण्याला मुख्यमंत्र्यांनी केलेली हि टीकाही कारण ठरल्याचं कुकी समाजाचे लोक सांगतात. म्यानमारच्या सीमेलगत असलेल्या चुराचंद्रपूर या जिल्ह्यात म्यानमारची आर्मी म्यानमारमधील कुकी समाजाच्या लोकांना अवैधरीत्या भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करते, असा आरोप मैतेई समाजाकडून केला जातो.

म्यानमारमध्ये एक चीन नावाचा प्रांत आहे. चीन प्रांतात कुकी-झोमी समाजाचे लोक मेजोरीटीत आहेत.

म्यानमारची आर्मी या लोकांना अवैधरीतीने भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करते, त्यानंतर भारतात आलेल्या या लोकांना चुराचंद्रपुरमधील कुकी समाजाचे लोक आश्रय देतात. त्यामुळे म्यानमारमधून अवैध घुसखोरी करणाऱ्यांविरोधात मणिपूरमधल्या मैतेई समाजात असंतोषाची भावना आहे. कुकी समाजाचे लोक सीमेपलिकडून मोठ्या संख्येने मणिपूरमध्ये दाखल होत असल्याने मैतेई समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. म्यानमारमधून आलेल्या ७१८ अवैध घुसखोरांमुळे मणिपूरमध्ये नव्याने तणाव वाढू नये, यासाठी मणिपूर सरकारने सुरक्षा व्यवस्था सध्या अलर्टवर ठेवली आहे. त्याचं कारण म्हणजे म्यानमारमधून नुकतीच झालेली ही घुसखोरी पुन्हा एकदा मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळण्याचं कारण ठरु शकते.

सध्या मणिपूर व मिझोराममध्ये म्यानमारमधून अवैधरितीने भारतात आलेले ४० हजारांपेक्षा जास्त रेफ्यूजी राहतात.

फेब्रुवारी २०२१ मध्ये म्यानमारमध्ये लष्करी उठाव झाल्यानंतर मोठ्या संख्येने म्यानमारचे नागरिक भारतातल्या मिझोराम व मणिपूर या दोन राज्यांमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर रोहिंग्या मुस्लिमही मोठ्या संख्येने ईशान्येकडील राज्यात दाखल झाले होते. आता मणिपूर सरकारने या रेफ्यूजींना परत म्यानमारमध्ये पाठवण्यासाठी पोप्यूलेशन कमिशनची स्थापना केली आहे. मणिपूरमधील दोन समाजांमध्ये होणाऱ्या संघर्षाला म्यानमारमधून होणारी घुसखोरी नेहमीच कारण ठरत आलीये. त्यामुळे मणिपूर सरकारने या प्रकरणावर विशेष लक्ष केंद्रीत केलंय. लवकरात लवकर या अवैध घुसखोरांना म्यानमारमध्ये परत पाठवण्याच्या हालचाली मणिपूर सरकार व आसाम रायफल्सने सुरु केल्या आहेत.

[ad_2]

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *