भारत पुन्हा एकदा ‘सुपर’स्टार

0
34


टी-ट्वेन्टी मालिका: न्यूझीलंडवर सलग चौथा विजय

वेलिंग्टन : न्यूझीलंड दौ-यावरील भारताचा संघ भलताच फॉर्मात आहे. वेलिंग्टनच्या वेस्ट पॅक स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या सामन्यात ‘सुपर ओव्हर’मध्ये विजय मिळवत विराट कोहली आणि सहका-यांनी पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली. सलग दुस-या सामन्याचा निकाल ‘सुपर ओव्हर’मध्ये लागला. त्यात पाहुण्यांनी बाजी मारली.

‘सुपर ओव्हर’मध्ये प्रतिस्पध्र्याचे १४ धावांचे आव्हान भारताने एक चेंडू राखून पार केले. न्यूझीलंडने पुन्हा एकदा अनुभवी वेगवान गोलंदाज टिम साउदीकडे चेंडू सोपवला. लोकेश राहुलने पहिल्या दोन चेंडूंवर लेग साईडला षटकार आणि शॉर्ट फाईन लेगला चौकार ठोकताना इरादा स्पष्ट केला. तिस-या चेंडूवर राहुलला कुगेलिनद्वारे झेलचीत करण्यात साउदीला यश आले. मात्र, विराट कोहलीने पुढील दोन चेंडूंवर सहा धावा वसूल करताना विजयावर शिक्कामोर्तब केले. न्यूझीलंडला ‘सुपर ओव्हर’मध्ये १३ धावा जमवता आल्या होत्या.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. संजू सॅमसनला (८) संधीचे सोने करता आले नाही, तरी फॉर्मात असलेला सलामीवीर लोकेश राहुलने सातत्य राखताना २६ चेंडूंत ३९ धावा काढताना संघाला सावरले. कर्णधार विराट कोहलीसह (११) श्रेयस अय्यर (१) आणि शिवम दुबे (१२) लवकर बाद झाले. मात्र, राहुलनंतर मनीष पांडे भारताच्या मदतीला धावून आला. त्याने ३६ चेंडूंत ५० धावांची नाबाद खेळी करताना संघाला ८ बाद १६५ धावांची मजल मारून दिली. तळातील अष्टपैलू शार्दूल ठाकूर (१५ चेंडूंत २० धावा) आणि नवदीप सैनीने (९ चेंडूंत नाबाद ११ धावा) छोटेखानी; परंतु बहुमूल्य योगदान दिले. न्यूझीलंडकडून लेगस्पिनर ईश सोढीने (२६-३) प्रभावी गोलंदाजी केली. मात्र, त्याला अन्य सहका-यांची साथ लाभली नाही.

१६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात निराशाजनक झाली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने सलामीवीर मार्टिन गप्टिलला (४) लवकर माघारी धाडले. मात्र, दुसरा सलामीवीर कॉलिन मुन्रो (६४ धावा) आणि तिस-या क्रमांकावरील टिम सीफर्टने (५७ धावा) शानदार अर्धशतके झळकावतानाच दुस-या विकेटसाठी ७४ धावा जोडताना यजमानांच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. मधल्या फळीत रॉस टेलरने (२४ धावा) प्रतिकार कायम ठेवला तरी स्थिरावलेले फलंदाज बाद झाल्याने भारताने सामन्यावर वर्चस्व मिळवले. शेवटच्या दोन षटकात ११ धावांची गरज असल्याने न्यूझीलंडचे पारडे जड होते. त्यांच्या ७ विकेटही शिल्लक होत्या. मात्र, भारताच्या गोलंदाजांनी अचूक मारा केला. अंतिम षटकात जिंकण्यासाठी ७ धावांची आवश्यकता असताना कर्णधार विराट कोहलीने वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरकडे चेंडू सोपवला. त्याने टेलरसह मिचेलची विकेट घेत प्रतिस्पध्र्याना विजयापासून रोखले. शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी दोन धावा असताना मिचेल सँटनर केवळ एक धाव घेऊ शकला. धावसंख्या समसमान झाल्याने ‘सुपर ओव्हर’चा अवलंब करून निकालाची कोंडी फोडण्यात आली.

विजयाचा ‘चौकार’ लगावताना भारताने पाच सामन्यांच्या मालिकेतील आघाडी ४-० अशी वाढवली. भारताचा अष्टपैलू शार्दूल ठाकूरला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा आणि अंतिम टी-ट्वेन्टी सामना रविवारी
(२ फेब्रुवारी) खेळला जाणार आहे.

राहुलच्या ४ हजार धावा पूर्ण
सलामीवीर लोकेश राहुलने सातत्य राखताना २६ चेंडूंमध्ये ३९ धावा केल्या. तसेच टी-ट्वेन्टी प्रकारात ४ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. केवळ ११७ डावांमध्ये राहुलने ‘चार हजारी’ मजल मारताना कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले.

न्यूझीलंडचा सहावा ‘सुपर’ पराभव
शुक्रवारचा पराभव हा न्यूझीलंडचा आजवरील सहावा पराभव आहे. २००८ ते २०२० या कालावधीत किवींच्या वाटय़ाला सात ‘सुपर ओव्हर’चे सामने आले. त्यात २०१०मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवता आला. अन्य सहा सामन्यांत पराभव झाला. त्यात वेस्ट इंडिज (२००८ आणि २०१२), श्रीलंका (२०१२), इंग्लंड (२०१९) आणि भारताविरुद्धच्या (दोन, २०२०) सामन्यांचा समावेश आहे.
टी-ट्वेन्टी क्रिकेट इतिहासात आजवर १४ सामन्यांचा निकाल ‘सुपर ओव्हर’मध्ये लागला आहे. त्यात सर्वाधिक सामने खेळण्याचा मान न्यूझीलंडला जातो. सर्वाधिक सामने खेळूनही सर्वाधिक पराभव त्यांच्याच नावावर आहेत. भारताने केवळ दोन सामने खेळले आहेत. तेही विद्यमान मालिकेतील आहेत.

‘सुपर ओव्हर’ने खूप काही शिकवले: कोहली
‘सुपर ओव्हर’मध्ये मिळवलेल्या लागोपाठ दोन विजयांनी मला संयम शिकवला, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले.
‘‘तिस-या आणि चौथ्या टी-ट्वेन्टी लढतींमधील सकारात्मक बाब म्हणजे केवळ सांघिक विजय नाही. संयम राखताना खेळपट्टीवर टिकून राहा. तसेच संधीचा पुरेपूर फायदा उठवताना सामन्यात कसे पुनरागमन करायचे, हे मी शिकलो. वर्षभरात एखादा ‘सुपर ओव्हर’ सामना समजू शकतो. मात्र, आमच्या वाटय़ाला सलग दोन ‘सुपर ओव्हर’चे सामने आले. त्यात विजय मिळवला, याहून आनंदाची बाब कुठली?,’’ असे कोहलीने सांगितले.
यावेळी विराटने सलामीवीर लोकेश राहुलसह मधल्या फळीतील मनीष पांडे तसेच अष्टपैलू शार्दूल ठाकूरचे कौतुक केले.

संक्षिप्त धावफलक
भारत – २० षटकांत ८ बाद १६५ (मनीष पांडे नाबाद ५०, लोकेश राहुल ३९, शार्दूल ठाकूर २०, ईश सोढी २६-३, हमिश बेनीट ४१-२) वि. न्यूझीलंड – २० षटकांत ७ बाद १६५ (कॉलिन मुन्रो ६४, टिम सीफर्ट ५७, शार्दूल ठाकूर ३३-२, जसप्रीत बुमरा २०-१).

निकाल : सुपर ओव्हरमध्ये भारताचा विजय. पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी. सामनावीर : शार्दूल ठाकूर.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here