भारताला सक्षम विरोधी पक्षाची गरज

0
43


अभिजीत बॅनर्जी यांचे मत

जयपूर : कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्ष हा लोकशाहीचे हृदय असतो. सत्ताधा-यांनाही सत्तेवर वचक राहावा, म्हणून चांगल्या विरोधी पक्षाची गरज असते. सध्याची परिस्थिती पाहता मला असे वाटते, भारताला चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे, असे मत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि नोबल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी यांनी व्यक्त केले.

जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये अभिजीत बॅनर्जी यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. देशाच्या सध्याच्या अर्थव्यवस्थेवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. अर्थव्यवस्थेच्या समस्येतून आपण लवकर बाहेर पडू, असे वाटत नाही. त्यासाठी बराच काळ लागेल. अर्थव्यवस्था सुधारेल एवढा पैसा सध्या आपल्याकडे नाही. बँकिंग सेक्टरमध्येही पैसा लावू शकू, अशी आपली परिस्थिती नाही. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी निरंतर प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही बॅनर्जी यांनी नमूद केले.

गरिबी ही कॅन्सरसारखी असते. कॅन्सरमुळे जसे विविध व्याधी जडतात तसे गरिबीचे असते. काहींचे शैक्षणिक दारिद्रय़ असते, काहींचे आरोग्याचे तर काहींच्याकडे संपत्तीचे दारिद्रय़ असते. त्यामुळे आपण काय गमावले, हे आपणच शोधले पाहिजे. कठोर मेहनत करून या समस्येवर तोडगा काढला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी देशवासीयांना धर्म आणि जातीच्या आधारे मतदान न करण्याचे आवाहनही केले आणि उत्तर प्रदेशातील त्यांच्या एका कॅम्पेनचा किस्साही सांगितला. आम्ही उत्तर प्रदेशात एक मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी लोकांना धर्म आणि जातीच्या आधारे मतदान न करण्याचे आवाहन केलं होतं. विकास आणि इतर मुद्दे लक्षात घेऊन लोकांनी मतदान करावे हा त्यामागचा उद्देश होता, असेही ते म्हणाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here