‘बेस्ट’ कर्मचा-यांचा एल्गार

0
40


लाँग मार्च नाही, आता प्रत्यक्षात कृती : आ. नितेश राणे

मुंबई : मी गोड बोलायला आलो नाही, आता निवडणुका जिंकायच्या नाहीत. तीन वर्षापासून बेस्ट कामगार आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी लढा देत आहेत. भाजपचे सरकार होते म्हणून शिवसेना हात वर करत होती. आता मात्र शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, तरीही बेस्ट कामगारांचे प्रश्न का सोडवले नाहीत? असा सवाल करतानाच मराठी मराठी ओरड करायची, मते घ्यायची हीच शिवसेनेची नीती असल्याचा आरोप आ. नितेश राणे यांनी सोमवारी केला. दरम्यान, हक्काच्या मागण्यांसाठी किती वेळा लाँग मार्च काढत बसायचे, आता प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली आहे, असा इशारा देऊन नितेश राणे यांनी बेस्ट कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मुंबई महापालिकेशी दोन हात करण्याचा एकप्रकारे इशाराच दिला.

बेस्टचे खासगीकरण बंद करा, बेस्टमधील रिक्त जागांची भरती करा आदी मागण्यांसाठी बेस्ट कामगारांनी लाँग मार्च काढला. बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या वतीने दादर येथील वीर कोतवाल उद्यान ते वडाळा आगार या दरम्यान हा लाँग मार्च काढण्यात आला. या मोर्चात मोठय़ा संख्यने बेस्ट कर्मचारी सहभागी झाले होते. वडाळा आगाराजवळ या लाँग मार्चचे रूपांतर जाहीर सभेत झाले. या सभेला आ. नितेश राणे, बेस्ट वर्कर्स युनियनचे शशांक राव, बेस्ट कामगार संघटनेचे जगनारायण कहार, उदय भट, बेस्ट एम्प्लॉइज युनियनचे नितीन पाटील, समर्थ बेस्ट कामगार संघटनेचे खजिनदार विठ्ठल गवस, बेस्ट कामगार नेते अहिरे, बेस्ट कामगार युनियनचे भूषण सामंत यांनी संबोधित केले. बेस्ट कामगारांच्या मागण्या मान्य करण्याचे आवाहन यावेळी बेस्ट प्रशासन, महापालिका आणि राज्य सरकारला करण्यात आले. बेस्टमध्ये ३१ जानेवारी रोजी कंत्राटी वाहन चालकांसाठी निविदा उघडण्यात येणार आहे. बेस्ट प्रशासनाने हे पाऊल मागे घ्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी आ. नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे सरकारला ‘नाईट लाईफ’साठी वेळ आहे, पण बेस्ट उपक्रमातील मराठी कामगारांसाठी वेळ नाही. बेस्ट उपक्रमात काय चालले आहे, कामगारांची नोकरी जाण्याची वेळ आली आहे.

बेस्ट विकण्याचा डाव रचला जात आहे. बेस्ट अर्थसंकल्पाचे पालिकेच्या अर्थसंकल्पात विलिनीकरण होत नाही. आताचे सरकार गेंडय़ाच्या कातडय़ाचे आहे. त्यामुळे लाँग मार्च काढत बसायचे नाही, तर आता कृती करण्याची वेळ आली आहे, असा विश्वास त्यांनी उपस्थित कामगारांना दिला.

‘मातोश्री’वर २०१७ मध्ये कामगारांच्या प्रश्नांबाबत बैठक झाली. दोन वर्षे झाली, काय दिले शिवसेनेने? उलट कामगारांच्या हक्काचेच काढून घेतले जात आहे. २०१७ मध्ये ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बेस्ट कृती समितीची बैठक झाली, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनाची एक व्हीडिओ क्लीपही यावेळी कामगारांना ऐकवली. किती विश्वास ठेवायचा यांच्यावर. हे निर्लज्ज आहेत, असा घणाघातही नितेश राणे यांनी लगावला.

नवीन सरकारला ५५ दिवस झाले, पण बेस्ट कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी यांना वेळ नाही, असेही ते म्हणाले. बेस्टचे खासगीकरण सुरु आहे. बेस्ट समिती, सत्ताधारी व व शिवसेना यांचा बेस्ट विकण्याचा डाव कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही नितेश राणे यांनी यावेळी दिला.

बेस्ट कामगारांनी जानेवारी २०१९ मध्ये ९ दिवस संप केला, त्यावेळी महापौर निवासस्थानी बैठक घेण्यात आली. पण त्या बैठकीत उद्धव ठाकरे कामगारांच्या प्रश्नावर नव्हे, तर योगा करण्यावर बोलत होते, असे त्यावेळी उपस्थित बेस्ट कृती समितीच्या नेत्यांनी सांगितले. यावरून स्पष्ट होते की शिवसेनेला बेस्ट कामगारांचे काही पडलेले नाही. लाँग मार्च काढायचा, रस्त्यावर आंदोलन करायचे हे याआधीही केले, पण या सरकारला कामगारांच्या प्रश्नाशी काही घेणे देणे नाही, त्यामुळे आता कृतीत करण्याचीच वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. शशांक राव व अन्य नेते आम्ही पुढची दिशा ठरवत असून लवकरच निर्णय घेऊ असेही ते म्हणाले. नितेश राणे यांच्या आश्वासनानंतर वडाळा बस आगाराबाहेर ‘नितेश राणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

मागील वर्षी बेस्ट कामगारांनी केलेल्या संपातील काही मागण्यांवर अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेत विलिनीकरण झाला नाही. त्याशिवाय बेस्टमध्ये रिक्त जागा त्वरित भरण्याची मागणी यावेळी करण्यात आली. खासगी कंत्राटदारांच्या फायद्यांसाठी एसी गाडय़ा बेस्टच्या ताफ्यात आणण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शनिवार-रविवारी बेस्टच्या बस इतर दिवसांपेक्षा ४० टक्क्यांनी कमी धावतात. या दिवसांमध्ये आणि बेस्टच्या ताफ्यातील ३३३७ बस गाडय़ा प्रवाशांच्या सेवेत आणण्याची मागणी करण्यात आली. स्वस्त किफायतशीर दरात प्रवास करणे हा मुंबईकरांचा अधिकार असल्याचा मुद्दा या मोर्चात अधोरेखीत करण्यात आला. बेस्टच्या मालकीच्या जमीन बिल्डरांना देण्यास विरोध असून बेस्ट वाचवण्याची हाक या मोर्चात देण्यात आली.

मुख्यमंत्री आता पवारांचा सल्ला घेणार!
दरम्यान, आता आपल्या लाँग मार्चची माहिती मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे शरद पवारांना विचारतील, आता काय करायचे? असा चिमटा नितेश राणे यांनी काढला. या सरकारचा रिमोट शरद पवार यांच्या हातात असून मुख्यमंत्री त्यांच्या सल्ल्यानंतरच निर्णय घेत असल्याचे नितेश राणे यांनी यानिमित्ताने सुचविले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here