पालिका कर्मचा-यांना विमा कवच!

2
58


३५४ रुपयांत १० लाखांचे अपघात संरक्षण

मुंबई : राज्य सरकारच्या समूह वैयक्तिक अपघात विमा योजनांतर्गत महापालिका कर्मचा-यांना वर्षाला फक्त ३५४ रुपयांत तब्बल १० लाखांचे अपघात विमा संरक्षण दिले जाते आहे. मागील २ वर्षात १ लाख २ हजार २१३ कर्मचा-यांपैकी केवळ ४० हजार ३४९ कर्मचा-यांनीच या योजनेत नावनोंदणी केली आहे. ज्यांनी नोंदणी केलेली नाही, त्यांना प्रशासनाने पुन्हा एक संधी उपलब्ध केली आहे. १० फेब्रुवारीपर्यंत कर्मचा-यांना या योजनेत सहभागी होता येईल, अशी माहिती महापालिकेचे सहआयुक्त मिलिंद सावंत यांनी दिली.

मुंबई महापालिकेच्या कर्मचा-यांना कमीत कमी खर्चात अपघात विमा संरक्षण मिळावे, या उद्देशाने राज्य शासनाच्या ‘समूह वैयक्तिक अपघात विमा योजने’मध्ये सहभागी होण्याची संधी महापालिका कर्मचा-यांना सन २०१८ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अंतर्गत वर्षाला केवळ रुपये ३५४ रुपयांत तब्बल १० लाखांचे अपघात विमा संरक्षण प्राप्त होत आहे. मात्र, गेल्या सुमारे २ वर्षात १ लाख २ हजार २१३ मनपा कर्मचा-यांपैकी केवळ ४० हजार ३४९ कर्मचा-यांनी या योजनेत नाव नोंदणी केली आहे, तर निम्म्यापेक्षा अधिक कर्मचा-यांनी अजूनही या योजनेत नाव नोंदणी केलेली नाही. जास्तीत जास्त कर्मचा-यांनी या योजनेत सहभागी होता यावे, यासाठी आणखी एक संधी महापालिका प्रशासनाने कर्मचा-यांना उपलब्ध करून दिली आहे.

गेल्या वर्षी दुर्दैवाने दोन महापालिका कर्मचा-यांचा अपघाती मृत्यू झाला; परंतु त्यांनी त्यांच्या पगारातून ३५४ रुपये कापण्यास संमती दिलेली नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांना या १० लाख रुपयांच्या अपघात विमा योजनेचा लाभ मिळाला नाही. तर दरवर्षी मार्च महिन्यात मिळणा-या पगारातून ३५४ रुपये कापण्यास संमती देणा-या कर्मचा-यांपैकी अपघाती मृत्यू झालेल्या दोन कर्मचा-यांचे कुटुंबीय हे या योजनेअंतर्गत १० लाखांच्या मदतीसाठी पात्र ठरले आहेत. शिवाय अपघातामुळे अपंगत्व आलेला एक कर्मचारी पाच लाख रुपये मदतीसाठी पात्र ठरला आहे.

सध्याच्या धकाधकीच्या, धावपळीच्या आयुष्यात कोणत्याही वेळी काहीही दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे भविष्यातील जबाबदा-यांच्या दृष्टीने कुटुंबीयांना अशी आर्थिक मदत आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेत सहभागी होण्याची संधी मुंबई महापालिकेच्या कर्मचा-यांना देण्यात आली आहे.

भविष्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिकाधिक कर्मचा-यांनी या समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेअंतर्गत नावनोंदणी करावी, असे आवाहन महापालिकेच्या सामान्य प्रशासन खात्याद्वारे करण्यात आले आहे. यासाठी केवळ वर्षाला फक्त ३५४ रुपये कापून घेण्यास माझी संमती आहे, असे संमतीपत्र देणे गरजेचे असल्याचे सावंत यांनी सांगितले.Source link

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here