निर्भया बलात्कार प्रकरणी दोषींना १ फेब्रुवारीला फाशी

0
49


नवे ‘डेथ वॉरंट’ जारी

नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व चार दोषींच्या फाशीची तारीख अखेर ठरली. १ फेब्रुवारी रोजी पहाटे सहा वाजता तिहार तुरुंगात या चारही दोषींना फाशी दिली जाणार आहे. यासंदर्भातले नवे डेथ वॉरंट दिल्ली हायकोर्टाने शुक्रवारी जारी केले. या चौघांपैकी एक दोषी मुकेश सिंह याने दयेचा अर्ज केल्याने आधी ठरलेली २२ जानेवारी ही फाशीची तारीख पुढे गेली होती. शुक्रवारी राष्ट्रपतींनी त्याचा दयेजा अर्ज फेटाळल्याने चौघांना फाशीवर चढवण्याचा मार्ग मोकळा झाला.

मुकेश सिंह याने राष्ट्रपतींकडे मंगळवारी दयेचा अर्ज केला होता. तत्पूर्वी त्याने आपल्याला ठोठावण्यात आलेली शिक्षा कमी करावी अशी विनंती सुप्रीम कोर्टाकडे केली होती. त्याची ही विनंतीही सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली होती. मुकेश सिंह याच्या या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी पतियाळा हाऊस कोटार्ने म्हटले होते की या प्रकरणातील दोषींना २२ जानेवारीला फाशी देता येणार नाही. दोषी मुकेश सिंह याचा दयेचा अर्ज प्रलंबित असल्याने फाशी देता येणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले होते. दयेचा अर्ज प्रलंबित असल्यानंतर डेथ वॉरंटवर आपोआप स्थगिती येते. त्यामुळे शुक्रवारी तिहार तुरुंग प्रशासनाला स्टेटस रिपोर्ट देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.

निमवैद्यकीय शाखेत शिकणारी २३ वर्षीय निर्भया हिच्यावर १६ डिसेंबर २०१२ रोजी रात्री सहा नराधमांनी चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. त्यावेळी त्यांनी तिला अत्यंत निर्घृणपणे मारहाणही केली होती. त्यात जबर जखमी झालेल्या अवस्थेत त्यांनी भर थंडीत तिला रस्त्याकडेला फेकून दिले होते. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. जखमी निर्भयावर आधी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर तिला सिंगापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला होता.

आरोपी पवनची सुप्रीम कोर्टात याचिका
निर्भया प्रकरणातील आरोपी मुकेश सिंह याची दया याचिका राष्ट्रपतींनी आज फेटाळली होती. त्यानंतर आता आणखी एक आरोपी पवन याच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात ते सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहेत. गेल्या २०१२ मध्ये जेव्हा हा गुन्हा घडला, तेव्हा आपण अल्पवयीन होतो. त्यामुळे आपल्यावर बाल न्याय कायद्यांतर्गत कारवाई केली जावी, अशी मागणी पवनने केली होती. १९ डिसेंबरला दिल्ली उच्च न्यायालयाने यावर निकाल देत त्याची ही याचिका फेटाळली होती. या निर्णयाविरोधात आपण आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे पवनच्या वकीलांनी स्पष्ट केले आहे.

दोषींना तीन क्रमांकाच्या तुरुंगात हलवले
निर्भया प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी २२ जानेवारीला होण्याची शक्यता धूसर असताना, चारही दोषींना तिहारच्या तुरुंग क्रमांक तीनमध्ये हलवण्यात आले. याच तुरुंगात या दोषींना फाशी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आत्तापर्यंत दोषींपैकी विनय शर्मा याला तुरुंग क्रमांक चारमध्ये, तर अक्षय सिंह, मुकेश सिंह आणि पवन गुप्ता या तिघांना तुरुंग क्रमांक दोनमध्ये ठेवण्यात आले होते.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here