‘नाईट लाईफ’च्या नावाखाली चंगळवाद संस्कृतीचे आक्रमण

0
42


मुंबईकरांच्या सुरक्षेला धोका, पोलिसांवरील ताण वाढणार

मुंबई : ‘मुंबई २४ तास’च्या नावाखाली मुंबईमध्ये चंगळवादी संस्कृतीला खतपाणी घालणा-या ‘नाईट लाईफ’ला अखेर महाविकास आघाडी सरकारने बुधवारी मंजुरी दिली. केवळ युवा नेत्याचा बालहट्ट पुरविण्यासाठी एका घरात दोन मंत्री पदे उपभोगत असलेल्या ठाकरे घराण्याने संपूर्ण सरकारलाच वेठीस धरले असून या निर्णयामुळे मुंबईकरांची सुरक्षा धोक्यात येणार आहे. याशिवाय आधीच तणावाखाली वावरत असलेल्या पोलीस कर्मचा-यांवरील ताणही कमालीचा वाढणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत मुंबईत २६ जानेवारीपासून चंगळवादी संस्कृतीला आमंत्रण देणारी ‘नाईट लाईफ’ सुरू करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या निर्णयाची माहिती दिली. रोजगार निर्मिती आणि महसूल वाढवण्याबरोबर लोकांना २४ तास सेवा मिळावी या उदात्त (?) हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘नाईट लाईफ’ म्हणजे केवळ पब आणि बार इतकेच नाही. बार आणि पबसाठी महसूलचे निर्णय आहेत. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पब आणि बार पूर्वीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंत सुरू राहतील, अशी मलमपट्टी करण्यात आली आहे.

मात्र, इतर हॉटेल्स, दुकाने आणि मॉल्स २४ तास सुरू राहतील. यात २४ तास दुकाने सुरू ठेवणे बंधनकारक नसून हे प्रत्येकावर अवलंबून असेल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

‘नाईट लाईफ’मुळे पोलिसांवर कोणताही ताण येणार नाही. तसेच, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे गृहमंत्र्यांनी सांगितले असले तरी पोलिसांचे पुरेसे संरक्षण नसेल तर मुंबईकरांच्या आणि महिलांच्या सुरक्षेबाबत चकार शब्द या नेत्यांनी काढला नाही. ‘नाईट लाईफ’मुळे मुंबईत गुन्हेगारी वाढणार असल्याचा आरोप या नेत्यांनी फेटाळून लावताना हा हा रोजगाराच्या संधी देण्याचा एक प्रयत्न असल्याची सारवासारव यावेळी करण्यात आली.

भाजपने सुरुवातीपासूनच ‘नाईट लाईफ’ला विरोध केला आहे. ‘नाईट लाईफ’मुळे मुंबईत दारू पिण्याची संस्कृती फोफावेल. त्यामुळे निर्भया प्रकरणासारख्या महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होईल. ही संस्कृती आपल्या देशासाठी योग्य आहे का, याचा विचार सरकारने करावा, असे भाजप नेते राज पुरोहित यांनी म्हटले होते.

कोणाचा बालहट्ट पुरवण्यासाठी ‘नाईट लाईफ’? : दरेकर
मुंबईत ‘नाईट लाईफ’ सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरीही मुंबईत बलात्काराच्या घटना थांबत नाहीत. सोमवारी रात्री कुर्ला येथे लोकमान्य टिळक टर्मिनस येथील महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. एकीकडे मुंबईत कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ढासळली असून मुंबईत बलात्कार, दरोडे, खून यासारख्या घटना घडत असताना आणि सामान्य जनेतेचे जीवन असुरक्षित असताना ‘नाईट लाईफ’चा घाट कोणाचे बाल हट्ट पुरविण्यासाठी घेतला जात आहे, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
मरिन ड्राईव्ह, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, लोअर परळ आदी उच्चभ्रू वस्तीत ‘नाईट लाईफ’ सुरु करण्याची सरकारची योजना असली तरीही यामुळे मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेवर ताण येणार आहे. महाराष्ट्र पोलिसांचे संख्याबळ आताच कमी आहे. पोलिसांवर आधीच नियमित कामाचा ताण-तणाव आहे, त्यातच नाइट लाइफ सुरु केल्यास पोलिसांच्या कामावर नक्कीच अधिक तणाव निर्माण होईल व त्याचा परिणाम मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेवर होईल अशी चिंताही दरेकर यांनी व्यक्त केली.

‘नाईट लाईफ’ नाही, ही तर ‘किलिंग लाईफ’
ही ‘नाईट लाईफ’ नसून ‘किलिंग लाईफ’ आहे. कमला मिल येथे आग लागली आणि त्यात १४ जणांचा मृत्यू झाला. मुंबईच्या ‘नाईट लाईफ’ला रक्तरंजित इतिहास आहे, हे निर्णय घेणा-यांना माहिती नाही का? असा सवाल करत भाजप नेते आणि आमदार आशीष शेलार यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. मोठय़ा भ्रष्टाचाराची सुरुवात ‘नाईट लाईफ’च्या माध्यमातून होईल. कमला मिलला आग लागली होती. अतिरिक्त एफएसआय घोटाळा झाला. हा भ्रष्टाचार पाठीशी घालण्यासाठी ‘नाईट लाईफ’चा निर्णय घेऊन टुरिझमच्या नावाखाली पडदा टाकण्याचे काम सत्ताधारी महापालिका आणि सरकार करत आहे, असा घणाघाती आरोपही शेलार यांनी केला आहे.

शेतकरी वा-यावर, श्रीमंतांना पायघडय़ा
राज्यात कर्जबाजारी शेतक-यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू आहे. कर्जमाफीची केवळ घोषणा करून शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. कर्जमाफी योजनेची अद्याप अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. कर्जबाजारी शेतक-यांचा सात-बारा कोरा करण्याची भाषा करत सत्तेवर आलेल्यांनी शेतक-यांना वा-यावर सोडून मात्र ‘नाईट लाईफ’द्वारे केवळ श्रीमंतांचे चोचले पुरवण्याला प्राधान्य दिले आहे. हे सरकार सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यात अपयशी ठरत असून त्यांना राज्यात ‘पेज थ्री’ संस्कृतीच्या माध्यमातून आपली घरे भरण्यात रस असल्याची टीका होत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here