नवं राजकीय समीकरण जुळणार?

0
55


भागा वरखडे

मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाल्यानंतर मनसे आणि भाजप एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली. भाजपचे नेते एकत्र येण्याची शक्यता फेटाळत असले तरी मनसेचे नेते मात्र ‘काहीही घडू शकते’ असा सूर आळवत आहेत. मनसेने यापूर्वी इंजिनाची दिशा बदलली, आता झेंडय़ाचा रंग बदलला जाणार आहे. मात्र, यामुळे मनसेला उभारी मिळेल का, हा खरा प्रश्न आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांनी वेगवेगळे राजकीय कार्यक्रम ठेवले आहेत. राज्यात पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातली व्यक्ती मुख्यमंत्री झाली आहे. ठाकरे घराण्याचा पहिला आमदार झाला आणि मंत्रीपदाची झूलही त्याच्या गळ्यात पडली आहे. मनसेनंही अमित ठाकरे यांना राजकारणात आणण्याचं ठरवलं आहे. अन्य राजकीय पक्षांवर घराणेशाहीची टीका करता- करता युवकांना संधी देण्याच्या नावाखाली ठाकरे कुटुंबातल्या युवा पिढीला राजकारणात उतरवलं जात आहे. २३ तारखेच्या एका कार्यक्रमात उद्धव आणि आदित्य यांचा सत्कार होणार आहे, तर मनसेनं अमित ठाकरे यांच्या राजकारण प्रवेशाबरोबरच झेंडय़ांच्या रंगात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअगोदर राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. दोन महत्त्वाच्या राजकीय नेत्यांमधल्या भेटीत काय चर्चा झाली, त्यातून बेरजेचं राजकारण सुरू झालं का आणि झालं असेल, तर बेरीज कुणाची आणि वजाबाकी कुणाची, हा औत्सुक्याचा विषय होणं स्वाभाविक आहे. त्यातही या दोन नेत्यांच्या भेटीनंतर मनसेच्या नेत्यांनी राजकारणात काहीही घडू शकतं, असा सूर लावला.

राज यांच्यावर सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) बजावलेली नोटीस, त्यांना चौकशीसाठी बोलवण्याचा प्रकार आणि त्यानिमित्ताने राज यांनी भाजपवर केलेले प्रहार हा सारा घटनाक्रम आणि लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून देशाला वाचवण्याची राज यांनी केलेली टीका पाहिली, तर अवघ्या आठ महिन्यांमध्ये या दोन पक्षांतला कलगीतुरा जनतेच्या विस्मरणात गेला असेल का, असा प्रश्न पडतो. भाजपवर कुणी कितीही कठोर टीका केली, तरी राजकीय सोईसाठी तो कुणाशीही लगेच हातमिळवणी करू शकतो, असा संदेश अशा संभाव्य बेरजेच्या राजकारणातून जाऊ शकतो. त्यामुळेच फडणवीस आणि राज यांच्या भेटीतून लगेच दोन्ही पक्षांची युती होईल, असं नाही. शिवसेनेनं राज्यातील सत्तेसाठी दोन्ही काँग्रेसशी केलेल्या युतीमुळे मनसे आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पालघर जिल्ह्यातल्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र आले, त्याचा फायदा मनसेला झाला, तसाच भाजपलाही झाला; परंतु तरीही दोन्हीही पक्षांच्या जागा दखलपात्र नाहीत. महाआघाडीच्या यशाचा आलेख भाजप-मनसे युतीपेक्षा उंच आहे.

मनसेनं आता झेंडय़ाचा रंग बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेल्या रेल्वे इंजिनाची दिशा बदलली, तरीही मनसेला त्याचा फायदा झाला नाही. उलट, मनसेचा पाय खोल जात राहिला. हे असं का होतं, हे समजण्यासाठी मनसेच्या स्थापनेमागची कारणं आणि तिचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घ्यावा लागेल.

महाबळेश्वरच्या अधिवेशनात शिवसेनेचं पुढचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याचे स्पष्ट संकेत मिळाले, तेव्हापासून राज ठाकरे नाराज झाले. बाळासाहेबांचा राजकीय वारस आपणच असू, हे त्यांचं स्वप्न भंगलं. त्यानंतर राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नवा पक्ष स्थापन करून राजकारणात उडी घेतली. सुरुवातीला राज यांनी ज्या पद्धतीचं राजकारण सुरू केलं, उमेदवारांच्या निवडीसाठी परीक्षा, महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा यामुळे त्यांच्या पक्षाविषयी सामान्यांच्या मनात एक आपुलकी निर्माण झाली. रेल्वेच्या भरती प्रक्रियेत स्थानिकांना डावलल्यावरून घातलेल्या राडय़ावरून मनसेची वाटचाल शिवसेनेच्या मार्गावरून होते की काय, अशीही शंका यायला लागली होती; परंतु हे आंदोलन असेल अथवा टोलमुक्तीसाठीचं आंदोलन; युवकांना या पक्षाविषयी कुतूहल वाटू लागलं. पाणी, शेती, रोजगार आदी विषयांसाठी मनसेचा एक थिंक टँक होता. त्यामुळे हा पक्ष एक वेगळंच रसायन आहे, असं वाटलं नसतं तरच नवल. राष्ट्रवादीचा पाठीराखा असलेला युवक वर्ग त्या दशकात मनसेकडे ओढला गेला. इतर पक्षांपेक्षा मनसेची वेगळी ओळख निर्माण करण्यात राज यशस्वी झाले.

त्यामुळे स्थापनेनंतरच्या अवघ्या तीन वर्षामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना मिळालेली मतं आणि २००९च्या विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या १३ जागा पाहिल्या, तर हा पक्ष महाराष्ट्रासाठी अन्य पक्षांना एक चांगला पर्याय ठरेल, असं वाटत असताना नंतर मात्र मनसेची ज्या मार्गावरून वाटचाल झाली, तो निसरडा होता याचा अनुभव आला. राजकारण हे गांभीर्यानं करायचं असतं आणि लोकांच्या सुख-दु:खात सातत्यानं सहभागी व्हायचं असतं, त्यात फार धरसोड करून चालत नसतं, हे राज यांना उमगलंच नाही. राज यांनी गुजरातला जाऊन नरेंद्र मोदी यांच्या कारभाराची माहिती घेतली. त्यांनी मोदी यांचं कौतुक सुरू केलं. राज यांच्या पक्षानं टोलमुक्तीविरोधात सुरू केलेली आंदोलनं अचानक थांबली. आपल्यामुळे टोलमुक्ती झाली, असा दावा राज यांनी वारंवार केला असला तरी लोकांना त्यावर विश्वास नव्हता. विकासकामाची ब्ल्यू प्रिंट अखेपर्यंत निघालीच नाही. नाशिक महापालिकेत सत्ता आणि तीन आमदार निवडून येऊनही त्यांना विकास दाखवता आला नाही.

विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीत पक्षाला १३ आमदार मिळाले. खरंतर त्यानंतर राज यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढायला हवं होतं. पक्ष संघटन मजबूत करायला हवं होतं. मुंबई-नाशिक-पुणे पट्टय़ापुरता असलेला पक्ष राज्यस्तरावर न्यायला हवा होता; परंतु राज यांनी तसं केलं नाही. निवडणुकीच्या काळात पाच-दहा सभा घेऊन यश मिळत नसतं. आमदार त्यांना सोडून गेले. तरीही राज यांना आपल्या राजकारण करण्याच्या पद्धतीत बदल करावा वाटला नाही. ज्या मोदी यांचं ते वारेमाप कौतुक करत होते, त्यांच्यावरच ते टीका करायला लागले. पवार यांच्या मुलाखती घ्यायला लागले. त्यांना वारंवार भेटायला लागले. भाजपच्या दाव्यांची पोलखोल करायला लागले. विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मनसेनं एकत्र येण्याची तयारी केली होती; परंतु काँग्रेसमुळे ते शक्य झालं नाही. काही ठिकाणी राष्ट्रवादीनं मनसेला आणि मनसेनं राष्ट्रवादीला मदत केली, तरीही मनसेला गेल्या सलग दोन निवडणुकीतील एका आमदारापेक्षा जास्त आमदार निवडून आणता आले नाहीत.

राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं नाही. शिवसेना दोन्ही काँग्रेसबरोबर गेली. धर्मनिरपेक्ष पक्षाशी युती केल्यानं हिंदू मतं शिवसेनेपासून दूर जातील, असा कयास बांधून मनसेनं पूर्वीच्या झेंडय़ाचा रंग बदलून भगवा करण्याचा निर्णय घेतला. तसंच दोन हिंदुत्ववादी पक्षांनी एकत्र येण्याचे संकेत दिले. भाजपला न मिळणारी मतं शिवसेनेलाही न मिळता मनसेला मिळाली, तर त्यात आपलाच फायदा आहे, असा हिशेब करून भाजप मनसेला बरोबर घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. युती करून किंवा पक्षाचा झेंडा बदलून राजकीय यश मिळत नसतं. त्यासाठी राजकारण गांभीर्यानं आणि पूर्णवेळ करायचं असतं, हे त्यांनी आता पवारांकडून नव्हे, तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून समजून घ्यावं. २३ तारखेला राज पुढील दिशा ठरवणार आहेत. राज यांनी मोदी-शाह यांच्यावर केलेली कडवट टीका भाजपचे नेते विसरले तरी कार्यकत्रे कितपत विसरतील, यावर या दोन्ही मित्रपक्षांचं मनोमीलन किती यशस्वी ठरतं, हे कळेल.

वेगळा मतप्रवाह
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर फिरून पाय रोवावेत. एक पर्याय तयार करावा, पण ते जर कोणा एका पक्षाच्या आधाराला जाणार असतील, तर त्याचे तात्कालिक फायदे असतात, पण मर्यादा अनेक असतात. राज ठाकरे सोबत येणं भाजपसाठी फायद्याचं ठरणार नाही आणि राज ठाकरेंनी त्यांच्या भूमिकेत बदल केला, तर त्यात त्यांचं नुकसान आहे. त्यामुळे भाजप-मनसे युती होऊ शकत नाही, असाही एक मतप्रवाह आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here