जेथे नाम, तेथे मी आहेच!

0
30


मला नामात पाहा, असे मी म्हणतो याचा अर्थ, मी देहात नसून माझी वस्ती नामातच असते. कारण, आपले मन जिथे असते, तिथेच आपण ख-या अर्थाने असतो. समजा तुम्ही यात्रेला गेला आहात, पण मन घराबद्दलच चिंतन करीत असेल, तर तुम्ही देहाने क्षेत्रात असलात तरी ख-या अर्थाने घरीच आहात असे नाही का होत? त्याप्रमाणे तुम्हाला जर कुणी विचारले की, ‘तुम्ही नेहमी कुठे असता’, तर आम्ही नेहमी विषयातच असतो, असेच सांगावे लागेल. ज्यांना जे जास्त आवडते त्यातच ते असतात, हे खरे ना? मग तुमचा गुरू कुठे आहे, असे जर कुणी विचारले, तर तो नामात आहे, असेच म्हणाल ना? म्हणून, जिथे नाम चालू आहे तिथे मी आहेच. जो नामस्मरण करतो त्याच्या मागे-पुढे मी उभा आहे.
शास्त्री-पंडित म्हणतात की, आमच्याकरिता ज्ञानमार्ग आहे. पण, त्यांच्या लक्षात येत नाही की, तो अत्यंत कठीण आहे. त्यात अभिमान नष्ट होण्याऐवजी वाढण्याचाच संभव जास्त असतो. ‘ब्रह्म सत्यं जगत् मिथ्या’ हे तत्त्व त्यांच्या बुद्धीला पटते, पण त्यांच्या अनुभवाला मात्र येत नाही. जग मिथ्या आहे, असे ते म्हणतात, पण आपल्या देहाला मात्र सत्य मानतात. नुसत्या विचाराने देहाने मिथ्यत्व अनुभवाला येणे अत्यंत कठीण आहे.
कर्मठ लोक म्हणतात की, ‘आम्ही आमच्या कर्ममार्गानेच जाणार. आमचा नामावर विश्वास नाही. आम्ही वेदांनी घालून दिलेली बंधने आणि नियम यांचे पालन करणार’; असे म्हणून ते बंधने आणि नियम यांचे इतके काही पालन करतात की, ते बंधनालाच सर्वस्व मानतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, ईश्वरप्राप्ती हे साध्य असून बंधने आणि नियम हे साधनरूप आहेत. साध्य साधण्यापुरतीच बंधने पाळायला हवीत. फुलझाडांची बाग रक्षण करण्यापुरतेच तिचे कुंपण सांभाळायला हवे. पण, ते कुंपणालाच सर्वस्व मानतात, त्याला खतपाणी घालून वाढवितात; आतल्या बागेकडे लक्ष देत नाहीत. वैदिक कर्माने चित्तशुद्धी होते, हे मी मान्य करतो; परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुद्धी करायची, त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्माना नसेल, तर कर्ममार्गाचे पर्यवसान कर्मठपणात होते.
– ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here