गर्भाशयाच्या कर्करोगाचं थैमान

0
48


मधुरा कुलकर्णी

गर्भाशयाचा कर्करोग जगभरातच वाढत चालला असून, भारतही याला अपवाद नाही. जगभरातले एक पंचमांश रुग्ण भारतात आहेत. किशोरवयीन मुलींमध्ये या आजाराचं प्रमाण वाढत आहे. व्याधीचे वाढते प्रमाण आणि तिच्या प्रतिरोधाबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशींनुसार घेतलेला आढावा.

गर्भाशयाच्या कर्करोगाची वाढती समस्या, ही जगभरची गंभीर समस्या बनत चालली आहे. कारण, पूर्वी तीस वर्षापुढील वयोगटात ही समस्या आढळून येत असे. आता मात्र विशीतच हा कर्करोग आढळत आहे. गर्भाशयाच्या किंवा गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचं प्रमाण भारतातही वाढत आहे. जगातल्या या आजाराच्या रुग्णांपैकी एक पंचमांश रुग्ण भारतात आढळतात, एवढी ही चिंता वाटण्याजोगी बाब आहे. २०१५ मध्ये जगातल्या ३८ लाख महिलांना हा कर्करोग झाला होता आणि ९० हजार महिलांचा मृत्यू झाला होता. भारतात दर वर्षी सुमारे १ लाख ३० हजार नवीन रुग्ण आढळत आहेत. २०१५ पर्यंत गर्भाशयाचा कर्करोग झालेल्या महिलांची भारतातली संख्या सुमारे २,२६,००० असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आजार जीवघेणा असल्यामुळे याविषयीची भीतीही महिलांमध्ये पसरल्याचं आढळतं. मात्र, तरीही यासाठीची पॅपस्मिअर चाचणी वेळेवर करून घेतली जात नाही. त्यामुळे महिलांची मृत्यूची संख्या वाढत चालली आहे. २००२ मध्ये गर्भाशयाच्या कर्करोगानं ७४,११८ महिलांचा मृत्यू झाला होता, तर अलीकडे हा आकडा २ लाख ७० हजापर्यंत पोहोचला आहे. कर्करोगामुळे मुळातच मोठय़ा प्रमाणात मृत्यू होत असले तरी भारतात मरण पावणा-या एकूण कर्करुग्णांपैकी १० टक्के रुग्णांचा गर्भाशयाच्या कर्करोगामुळे मृत्यू होतो. भारतात स्तनाच्या कर्करोगाच्या खालोखाल महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग आढळतो. मात्र, याविषयी महिलांमध्ये पुरेशा प्रमाणात जागृती झालेली नाही.

हा गर्भाशयाच्या मुखाला आणि सर्वात खालच्या भागाला होणारा घातक आजार आहे. या कर्करोगात गर्भाशयातल्या पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात. गर्भाशयाच्या कोणत्याही पेशीची अनियमित वाढ होणं, हे या कर्करोगाचं प्राथमिक लक्षण आहे. यामुळे गाठ तयार होऊ शकते. यातून मासिक पाळी अनियमित होते किंवा लैंगिक संबंधांनंतर अगर रजोनिवृत्तीनंतर सातत्यानं योनीमार्गातून रक्तस्रव सुरू होतो. योनीमार्गातून इतर किंवा पांढरा स्रव बाहेर पडणं हे ही याचं एक लक्षण आहे. लघवी करताना त्रास होणं किंवा अडथळे आल्यासारखं वाटणं, अशी याची लक्षणं आहेत. ती दिसल्यास तातडीने ही चाचणी करावी लागते. अनेकदा या कर्करोगाला मानेच्या मणक्याचा कर्करोग समजला जाण्याची शक्यताही असते.

या कर्करोगाचे चार टप्पे असतात आणि ते बायोप्सी, छातीचा एक्स-रे आणि किंवा सीटी अगर एमआरआय स्कॅनद्वारे निश्चित केले जातात. पहिल्या टप्प्यात हा कर्करोग गर्भाशयाच्या बाहेरच्या आवरणात किंवा मधल्या आवरणात निम्म्यापर्यंत पोहोचलेला असतो. दुस-या टप्प्यात तो गर्भाशयाच्या सर्व्हिक्स या भागापर्यंत पोहोचतो, पण गर्भाशयाबाहेर पसरलेला नसतो. तिस-या टप्प्यात तो गर्भाशयाबाहेर पसरलेला असतो, पण ओटीपोटाच्या पलीकडे पोहोचलेला नसतो. चौथ्या टप्प्यात तो ओटीपोटाच्याही पलीकडे पसरतो. या कर्करोगाच्या निदानासाठी पॅपस्मिअर ही चाचणी करावी लागते. कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात असतानाच निदान झालं, तर महिला बरी होऊ शकते. मात्र, आजार तिस-या किंवा चौथ्या टप्प्यात पोहोचला की, बहुतेक महिलांच्या कर्करोगाचं निदान होतं आणि त्या वाचणं कठीण बनतं.

सहसा हा कर्करोग ३० ते ४५ या वयोगटात म्हणजेच लैंगिकदृष्टय़ा सक्रिय असलेल्या महिलांमध्ये आढळतो.

१२ वर्षाच्या आधीच पाळी सुरू होणं, ५५ वर्षानंतर मेनोपॉज येणं, इस्ट्रोजेन उपचार करून घेणं, टाईप २ मधुमेह असणं, धूम्रपान, तंबाखूचा वापर, खालावलेला सामाजिक – आर्थिक स्तर आणि अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाण कमी असलेला आहार अशीही यामागची कारणं सांगितली जातात. शिवाय कमी वयात लैंगिक संबंध राखले जाणं, लठ्ठपणा, हार्मोनल गर्भनिरोधकांचा दीर्घ काळ वापर, गर्भधारणेचं जास्त प्रमाण आणि अस्वच्छता ही या कर्करोगाची काही प्रमुख कारणं आहेत. तसंच मुलं जन्माला न घालणा-या महिलांनाही हा कर्करोग होत असल्याचं आढळलं आहे. याखेरीज गर्भाशयाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असणं, हे ही एक महत्त्वाचं कारण आहे.

ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे एचपीव्ही विषाणूंचा संसर्ग झाल्यानंतर सुमारे वीस वर्षापर्यंत हा विषाणू सुप्तावस्थेत राहतो. त्यामुळे कर्करोग संसर्गानंतर २० वर्षानंतर उद्भवू शकतो. हा विषाणू लैंगिक संबंधांच्या वेळी एका व्यक्तीकडून दुसरीकडे संक्रमित होऊ शकतो. योग्य वेळी निदान झालं, तर या संसर्गातून सुमारे ९९ टक्के महिला मुक्त होऊ शकतात. पॅपस्मिअर चाचणी करून घेण्याविषयी बहुतेक महिलांना माहिती नसते. एकदा ही चाचणी करून घेतल्यानंतर दरवर्षी करावी लागत नाही. त्यानंतर दर तीन वर्षानी किंवा अगदी पाच वर्षानीही ती केली तरी संसर्ग झाला असल्यास समजू शकतं. पॅपस्मिअरबरोबर एचपीव्ही डीएनए चाचणीही उपयुक्त ठरते. पेल्व्हिक चाचण्या, अल्ट्रासाऊंड, बायोप्सी आदी चाचण्याही केल्या जातात. निदानाची खात्री करून घेण्यासाठी सीटी किंवा एमआरआय चाचण्या घेतल्या जातात.

लैंगिक संबंध राखताना वेदना होणं, पायांमध्ये किंवा योनीभागात वेदना होणं, थकवा येणं, वजन कमी होणं, भूक कमी होणं, एका पायाला सूज येणं ही या कर्करोगाची काही लक्षणं आहेत. शस्त्रक्रिया, रेडिएशन, हार्मोन उपचारपद्धती आणि केमोथेरपी असे यावरचे उपचार आहेत. केमोथेरपीद्वारे कर्करोगाच्या पेशी नष्ट केल्या जातात. केमोथेरपीची मालिका असते आणि दोन केमोथेरपी चक्रांदरम्यान विश्रांतीची गरज असते. एकदा उपचार घेतल्यानंतरही काही काळानं हा कर्करोग पुन्हा होऊ शकत असल्यानं उपचार पूर्ण झाल्यावरही ठरावीक कालांतरानं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुन्हा तपासण्या करून घेत राहणं आवश्यक असतं.

एचपीव्ही लसीकरण महत्त्वाचं
२००६ पासून एचपीव्ही प्रतिरोधक लसी सर्वत्र उपलब्ध झाल्या असून, विषाणूच्या किमान नऊ प्रजातींपासून संरक्षण करतात. एचपीव्ही १६ आणि १८ या प्रजाती गर्भाशयाच्या कर्करोगाला प्रामुख्यानं कारणीभूत असतात आणि या लसींमुळे या विषाणूंना प्रतिबंध होतो. तसंच सुमारे ८० टक्के गुदाशयाचे कर्करोग आणि ६० टक्के योनीमार्गाचे कर्करोगही या लसींमुळे प्रतिबंधित होतात. या लसींमुळे तोंडाच्या कर्करोगांनाही आळा बसतो, असं संशोधनांमधून स्पष्ट झालं आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here