कोरोना व्हायरसचे सत्य जगासमोर आणणारा पत्रकार रहस्यमयरीत्या बेपत्ता

0
52


बीजिंग : कोरोना व्हायरसबद्दल सर्वात आधी चीन सरकारला इशारा देणा-या डॉक्टरच्या मृत्यूनंतर आता कोरोना व्हायरसचे सत्य जगासमोर मांडणारा पत्रकार बेपत्ता झाला आहे. चेन क्यूइशी असे या पत्रकाराचे नाव असून ते एक मानवाधिकार कार्यकर्ताही होते. गुरुवार रात्रीपासून त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही.

क्यूइशी यांनी कोरोना व्हायरसचे रिपोर्टिग करताना वुहानमधील परिस्थिती जगासमोर मांडली होती. त्यांनी अनेक व्हीडिओ पोस्ट केले होते. या व्हीडिओमधून त्यांनी चीन सरकार कोरोना व्हायरसकडे कशा पद्धतीने दुर्लक्ष करत आहे हे दाखवण्यात आले होते.

क्यूइशी यांच्या रिपोर्टिगमध्ये चीनमध्ये स्थानिक पातळीवर नेमकी काय परिस्थिती आहे हे जगासमोर आले होते. सरकारकडून सेन्सॉरशिप लावण्यात आल्यानंतरही क्यूइशी व्हीडिओ शेअर करत होते. क्यूइशी यांच्या कुटुंबाने केलेल्या दाव्यानुसार, ते आपल्या मित्रांसोबत गुरुवारी रुग्णालयात गेले होते. त्यानंतर ते पुन्हा परतलेच नाहीत.

क्यूइशी यांच्या आईने ट्विटर अकाऊंटला एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. या व्हीडिओत त्या सांगत आहेत की, मी क्यूइशी याची आई आहे. कृपया ऑनलाइन मित्र आणि खासकरून वुहानमध्ये आहेत त्यांनी क्यूइशी याचा शोध घेण्यात मला मदत करा. क्यूइशी यांच्या मित्रांनी मात्र प्रशासनाने त्यांना वेगळे ठेवले असल्याचा दावा केला आहे. दरम्यान क्यूइशी यांचा फोन सध्या अनरिचेबल आहे.

कोरोनाचा कहर सुरूच; एकाच दिवसात ९७ जणांचा मृत्यू
चीनमध्ये कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडणा-या नागरिकांच्या संख्येत वाढ होत आहे. रविवारी एकाच दिवशी तब्बल ९७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यातील सर्वाधिक ९१ जणांचा मृत्यू वुहान प्रातांत झाला आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याची आणखी ४००८ नवीन प्रकरणे समोर आली. यामध्ये २९६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक होती. तर, रविवारीच कोरोना व्हायरसच्या आजारातून धोका टळल्यामुळे ३२८१ जणांना रुग्णालयातून डिस्चार्च देण्यात आला. आतापर्यंत चीनमध्ये ४० हजारहून अधिक जणांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला असल्याचे उघड झाले आहे. तर, व्हायरसमुळे आतापर्यंत ९०८ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष काळजी घेण्यात येत आहे. विमानतळावर प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात येते. रविवारपर्यंत २१ विमानतळावर १८१८ उड्डाणांपैकी १ लाख ९७ हजार १९२ प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात आली असल्याची माहिती भारताच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here