कलेच्या किमयेतून उद्योगाकडे : ग्राफिक डिझायनर विद्या गोगटे

0
39


रोहन राऊळ

कलेची ओढ हाडाच्या कलावंताला कधीच स्वस्थ बसू देत नाही. आपल्या सर्जनशीलतेचा वापर करीत वेगवेगळ्य़ा कलाकृती साकार करण्यातच त्याला मनापासून आनंद मिळतो. बोटातील जादूच्या किमयेने विद्या गोगटे यांना आधी ग्राफिक डिझायनर आणि नंतर उद्योजिका बनवलं. अर्थात त्यासाठी त्यांना बराच प्रवासही करावा लागला.

विद्या गोगटे लहानपणापासून कलेच्या पुजारी. चित्रकला, आकृत्या, रंग दिसले की, त्या हरखून जात. एम.कॉमपर्यंतचं शिक्षण त्यांनी घेतलं असलं तरी त्यांना कारकुनी अजिबात करायची नव्हती. त्यांच्या नजरेसमोर केवळ नानाविध रंगच दिसत. त्यामुळे त्यांनी ग्राफिक डिझायनिंगचा डिप्लोमा केला. तो पूर्ण होताच ताज फ्रोझन फुड्समध्ये ज्युनियर ग्राफिक डिझायनर म्हणून नोकरी पटकावणं त्यांच्यासाठी फारसं कठीण नव्हतं. कलेवरील आपल्या प्रेमापोटी अशी आर्टिस्टची नोकरी मिळवल्याचं समाधान त्यांना होतं. या नोकरीतही रोज एक नवं आव्हान असायचं. अंगीभूत कलागुणांमुळे त्यांना दुसरीही संधी चालून आली. डिजिकेबल नेटवर्क इं. प्रा. लि. या कंपनीत त्यांना ज्युनियर ग्राफिक डिझायनर म्हणून पूर्णपणे वेगळ्य़ा स्वरूपाचं काम करायचं होतं. या प्रवासात क्रिएटिव्ह डिझायनर ते टेक्निकल डिझायनर असा बदल त्यांच्यात झाला. पुढे तर त्यांना टीव्ही चॅनेलसाठी इनहाऊस काम करण्याचीही संधी मिळाली.

याच दरम्यान त्या आई झाल्या आणि त्यांच्यावरील जबाबदारी अधिकच वाढली. मुलीसाठी वेळ देणं जास्त महत्त्वाचं होतं. पूर्णवेळ नोकरी करणं शक्य नव्हतं आणि अर्धवेळ नोकरी मिळणं शक्य नव्हतं. कामाचा आणि कमाईचा योग्य समन्वय राखणं आवश्यक होतं आणि तो राखता येत नव्हता. विशेष म्हणजे कलेच्या ऊर्मीचं काय करायचं, हाही प्रश्न होता.

याचा विचार करता-करता एक दिवस त्यांनी ठरवलं, काम तर करायचंच. पण, मग स्वत:चा उद्योग का नको? त्यांनी स्वत:च कामं घ्यायला सुरुवात केली. कामं येऊही लागली. कुणी तीनशे रुपयांचं, तर कुणी पाचशे रुपयांचं ग्राफिक डिझायनिंगचं काम करायला सांगे. मग काय? आत्मविश्वास वाढला आणि सप्टेंबर २०१५ मध्ये त्यांनी ‘आर्टलाईन’ या नावाने सोल प्रोप्रायटर म्हणून व्यवसाय नोंदवला.

‘आर्टलाईन’कडे आता वेगवेगळ्य़ा क्षेत्रातील कामं येतात. लोगो डिझायनिंग, व्हिजिटिंग कार्ड डिझायनिंग, बॅनर, वेब बॅनर, मॅगझिन कव्हर पेज डिझाईन, पॅकिंग डिझायनिंग, अ‍ॅड डिझाईन अशा वेगवेगळ्य़ा प्रकारच्या सेवा त्या उद्योजकांना पुरवतात. अगदी लहानापासून मोठय़ा उद्योगात पावलोपावली अनेक प्रकारच्या डिझाईनची आवश्यकता भासते. प्रत्येक उद्योगात, त्या उद्योगाची लोकांपर्यंत ओळख पोहोचवतो, तो म्हणजे त्या उद्योगाचा लोगो. ‘आर्टलाईन’ने आतापर्यंत प्रसिद्ध उद्योगांचे ४०हून अधिक लोगो बनवले आहेत आणि ते अतिशय लोकप्रिय झाले आहेत. वेगवेगळ्य़ा क्षेत्रातील उद्योजकांना त्यांच्या उद्योगवाढीसाठी आपल्या कलेचा उपयोग होतोय, याचा त्यांना अतिशय आनंद आहे. वेगवेगळ्य़ा लोकांबरोबर काम करताना भले-बुरे अनुभव येतात. त्यातूनच उद्योगजगताचे रोज नवनवीन पैलू त्यांना शिकायला मिळतात.

व्यवसायाची नोंदणी केल्याने आता केवळ एक डिझायनर म्हणून काम न करता इतरही अनेक बाबींकडे त्यांना लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे त्यांच्यातील वेगवेगळ्य़ा स्कील डेव्हलप झाल्या. आपल्या या व्यवसायातील मार्केटिंगच्या अनुभवाबद्दल त्या सांगतात,‘२०१६ साली माझ्या कानावर वेगवेगळ्य़ा बिझनेस नेटवìकगची माहिती येत गेली. त्यातून मी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट या बिझनेस प्लॅटफॉर्मची निवड केली. या चार वर्षात मी या माध्यमातून बरीच माणसं कमावली. व्यवसायासाठी जनसंपर्क हा जाहिरात आणि मार्केटिंग इतकाच महत्त्वाचा भाग असतो.
एकीकडे मुलीचं संगोपन आणि आर्टलाईन’ म्हणजे ‘स्वप्नातलं मूल’ अशी दुहेरी जबाबदारी सांभाळताना त्यांची तारेवरची कसरत होते खरी. पण, या सगळ्य़ा वाटचालीत पती आणि कुटुंबीयांची आपल्याला मोलाची साथ मिळाली, असं त्या आवर्जून सांगतात.

स्टार्टअप आंत्रप्रिनर म्हणून ‘आर्टलाईन’ची पहिली पायरी तर चढलो. पण, भविष्यात अजून खूप वेगवेगळ्य़ा पाय-या चढायच्या आहेत, असं सांगत त्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं त्या नमूद करतात. महिला उद्योजिका म्हणून होतकरू महिलांना त्या सांगू इच्छितात, ‘मैत्रिणींनो, स्वप्नं बघा आणि ती स्वप्नं खूप मोठी करा.

[email protected]

मोबाईल – ७०३९६९७२९१Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here