कपडे आवरणे : एक कला

0
31


घर म्हटल्यानंतर कपडालत्ता आलाच. कपडे व्यवस्थित ठेवणे, हा घर स्वच्छतेचा एक भाग आहे. कपडे व्यवस्थित ठेवण्यासह त्यांचे आयुष्य वाढवण्यासाठी आटोपशीरपणा तितकाच महत्त्वाचा आहे. या आटोपशीरपणामध्ये शिस्तही दडलेली आहे.

अन्न, पाणी आणि घर याप्रमाणेच वस्त्र ही सुद्धा प्राथमिक गरज आहे. मात्र, सध्या अनेकांकडे गरजेपेक्षा जास्त वस्त्रे (कपडे) आहेत. घराघरातल्या कप्प्याकप्प्यांत कपडे ओसंडून वाहत असतात. कधी कोंबलेले, कधी नीट रचून ठेवलेले. घर पटकन आवरायची सर्वात सोपी गोष्ट म्हणजे कप्प्यांमध्ये सामान कोंबून ठेवणे. ‘आता नको, नंतर करू’ किंवा ‘वेळ मिळाला की बघू’ अशी तत्कालिक कारणे स्वत:ला देत आपण आजचे काम उद्यावर ढकलत असतो. कपडय़ांमध्ये घरात घालायचे कपडे, बाहेरचे कपडे, सणवारी घालायचे कपडे, खास ठेवणीतले कपडे, हवामानातील बदलांनुसार लागणारे कपडे, आजारपणातली विशेष सोय, असे अनेक प्रकार असतात. काम आणि वयानुसार कपडे कितपत मळतात, त्यावरदेखील नवीन कपडय़ांची खरेदी अवलंबून असते. मात्र, नव्या कपडय़ांचे प्रमाण वाढले की, कपाटे ओसंडून वाहू लागतात.

जुन्या कपडय़ांचे काय करावे, असा प्रश्न सर्वासमोर असतो. काही देशांमध्ये अनेक पॉन शॉप्स, कन्साइनमेंट शॉप्स असतात. तुम्ही गरीब असा की श्रीमंत, घरचे नकोसे कपडे इथे नीट धुवून तसेच त्यांना नीट शिवून होऊन विक्रीसाठी उपलब्ध केले जातात. आपण नेऊन दिलेल्या कपडय़ांनादेखील काही ठरावीक किंमत मिळते. तुमची आर्थिक, सामाजिक पत काहीही असली तरी तिथून जुने, वापरलेले कपडे घेऊन जायला कोणाला कमीपणा वाटत नाही. उलट वाढत्या वयातल्या मुलांसाठी, स्वस्तात मस्त कपडे शोधणा-यांसाठी ही सोय महत्त्वाची ठरते. मात्र आपल्याकडे तशी दुकाने (शॉप्स) नाहीत.

आपल्याकडे कपडे काय, चिंध्यासुद्धा किलोने विकत घेणारे लोक आहेत. जुन्या कपडय़ांवर भांडी अजूनही अनेक ठिकाणी मिळतात. अनेक घरांमध्ये जुन्या चादरी, कपडे हे पायपुसणी आणि फडकी म्हणूनदेखील वापरली जातात. नगाने जुने कपडे विकत घेणारे लोक त्यांच्या मर्जीनुसार त्याची किंमत सांगत असतात. अशावेळी एकदम मोठे गाठोडे देण्यापेक्षा थोडे-थोडे कपडे दिले, तर काही बरी किंमत मिळू शकते. कपडय़ांवर भांडे देणा-या मंडळींनादेखील त्यातल्या त्यात चांगल्या, नव्यासारख्या अशा गोष्टी हव्या असतात. त्यावर जरा चांगली किंमत येते. आपल्याकडील कपडे तसे असतीलच असे नाही. त्यात पुरुषांचा फुल शर्ट, कमी साईझ असलेल्या जीन्सला ब-यापैकी किंमत मिळते. पण, स्त्रियांच्या कपडय़ांना अपेक्षित किंमत मिळत नाही.

जुने कपडे विविध स्वयंसेवी संस्था किंवा गरजूंना देण्याचाही प्रघात आहे. मात्र, घरातला कचरा काढून फेकतोय, अशा थाटात मळके, फाटके, बटण तुटलेले, उसवलेले कपडे विविध संस्थांच्या दारात नेऊन टाकले जातात. जुनी वस्तू असली तरी देताना नीट धुऊन, दुरुस्त करून, वापरण्याजोगी करून, व्यवस्थित घडी घालून, गरजेनुसार इस्त्री करूनसुद्धा द्यायला हवी. अनेक वेळा फडकी म्हणूनही वापरता येणार नाहीत, असे जुने कपडे दिले जातात. त्यावर आपण किती थोर समाजकार्य केले, असे स्वत:ला समजावत असतो! काही ठिकाणी खरोखर जुन्या, जास्तीच्या आणि ब-या गोष्टींची गरज असू शकते. तिथे जरूर मदत करावी. पण, नकोसा झालेला, साठून राहिलेला कचरा काढून टाकल्यासारखे कपडे देणे, योग्य नाही.

कपडय़ांचा पसारा आवरायला आणखी एक उपाय आहे. तुमच्याकडच्या सगळ्या कपडय़ांमधले ऐंशी टक्के कपडे फारसे वापरात नसतात. वीस टक्के कपडेच आपण सातत्याने वापरत असतो. हे वीस टक्के कपडे नेमके कोणते आहेत? ते आपल्याला का आवडतात? तसेच त्या कपडय़ांमुळे आपली काय सोय होतेय त्याचा विचार करून तसेच कपडे खरेदी करावेत. म्हणजे नुसतेच पडून राहणारे, क्वचित वापरले जाणारे कपडे हळूहळू कमी होऊ लागतील आणि वापरात आहेत ते नीट वापरले जातील. कपडे घरात पडू द्यायचे नाहीत, हे एकदा ठरवले की, कपडय़ांची किती गरज आहे, याचाही शोध घ्यावा. जो आकडा येईल, त्यापेक्षा कमी, पण चांगल्या दर्जाचे कपडे कपाटात ठेवावे. काही जण नवा कपडा घेतला की, जुना एक कपडा काढून टाकतात. पण, ते जमतेच असे नाही. त्यापेक्षा एकदाच स्वत:ची गरज नीट ठरवून टाका. पडून असलेले सगळे कपडे नीट करून कुणाला द्यावे, विकावेत किंवा इतर गोष्टींसाठी वापरावेत. मोकळा झालेला वॉर्डरोब तसाच मोकळा ठेवायचा आहे, हे आधी स्वत:च्या मनावर बिंबवावे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here